श्रीक्षेत्र शेणगाव एकमुखी दत्तमंदिर

श्रीक्षेत्र शेणगाव एकमुखी दत्तमंदिर
श्रीक्षेत्र शेणगाव देवस्थान

निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि याच कुशीत विहंगम वेदगंगा नदी किनारी ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री दत्त मंदिर यामुळे शेणगावची महती दिवसेंदिवस वाढत आहे. देवस्थानाबद्दल अनेक आख्यायिका आहेत. येथे येणाऱ्या भाविकांचेही स्वानुभव आहेत. देवस्थानच्या संग्रहित माहितीमधील लेखात श्री दत्तभक्त स्व. रामचंद्र पाठक यांनी केलेल्या उल्लेखानुसार, दत्तात्रयांनी प्रत्यक्ष दृष्टांत देऊन संकेत दिल्यामुळे शिल्पकार बालमभट्ट पैठणकर यांनी हुबळी (कर्नाटक) येथून चालत येऊन शेणगाव येथे नदीकिनारी या मंदिराची उभारणी केली. पैठणकर यांनीच या मंदिराच्या सर्व मूर्ती घडवल्याचा इतिहास सांगितला जातो. मंदिरातील सर्व व्यवस्था दत्त भक्त मंडळ, कुंभार समाज आणि देवस्थानचे पुजारी पाहतात. या मंदिराचा जिर्णोद्धार गंगाधर कुलकर्णी (गुरुजी) यांच्या योगदानामुळे झालेला आहे.

श्री दत्तभक्त संप्रदायाचे सर्व संकेत पूर्ण करणाऱ्या व अतिशय प्राचीन असणाऱ्या श्रीक्षेत्र शेणगाव येथील श्री दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा उत्सव शेणगावच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा आहे. श्री क्षेत्र शेणगावच्या श्री दत्त देवस्थानचा लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात श्री दत्त जयंती उत्सव साजरा होतो. त्याप्रमाणेच, शेणगाव येथील श्री दत्तजयंती उत्सवाची महती आगळी-वेगळी अशी आहे. हे जागृत देवस्थान आहे. वर्षाचे बाराही महिने येथे भाविकांची रिघ असते. प्रत्येक गुरुवारी तर या ठिकाणी भक्तीचा मेळा असतो. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी अनेक भाविक येथे नवस बोलतात. इच्छा पूर्ण झाल्या की नवस फेडतात. लाखो भाविकांना या देवस्थानच्या जागृतीची प्रचिती आलेली आहे. त्यामुळे देवस्थानची महती दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह परराज्यातूनही येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात. 

कोल्हापूरपासून ५५ किलमीटर अंतरावर असणारे हे श्री दत्त मंदिर वेदगंगा नदी तिरावर वटवृक्ष, औदुंबर आणि चिंच यासारख्या वृक्षांच्या गर्द छायेत वसले आहे. या मंदिरात अन्यत्र कोठेही नसलेली एकमुखी सहा कर (हात) असलेली श्री दत्त मूर्ती अत्यंत सुबक अशी आहे. या शिवाय मंदिरात षण्मुख अथवा कार्तिकेयस्वामी यांची उत्तर भारतात अभावाने आढळणारी मूर्ती आहे. महिलांना या मूर्तीच्या दर्शनाची परवानगी नसल्याने मंदिराच्या एका छोट्या झरोक्यातूनच या मूर्तीचे दर्शन व्हावे, अशी रचना केलेली आहे. 

भुदरगड तालुका

कोल्हापूर जिल्हा आणि या जिल्हाच्या पश्चिम भागातील भुदरगड तालुका पूर्णपणे सह्याद्रीच्या कुशीत आहे. प्रत्येक गाव किंवा वाडीला मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदा लाभलेली आहे. या भागात मोर, हर्नीबील यासारखे दुर्मिळ पक्षी, गवे, रानडुकर अशी श्वापदे आहेत. चोहोबाजूंनी असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा, समाधानकारक पाऊस, तितक्याच प्रमाणात थंडी, ऊस, भात, नाचणीची शेती या भागात आहे. डोंगर-दऱ्यांतून अवखळ वाहणारी वेदगंगा, भुदरगड, रांगणा यासारखे ऐतिहासिक किल्ले, दुर्मिळ-अतिदुर्मिळ वनस्पतींनी परिपूर्ण जंगल ही या तालुक्याची वैशिष्ट्ये आहेत. 

श्रीक्षेत्र शेणगाव एकमुखी दत्तमंदिर देवस्थान
श्रीक्षेत्र शेणगाव एकमुखी दत्तमंदिर

निसर्गाच्या कुशीतील देवस्थान

महाराष्ट्राची भक्ती परंपरा जितकी मोठी तितकीच ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्री दत्तभक्ती मार्ग हा तर महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय. 
श्री दत्तात्रयांची उपासना स्थळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. प्राचीन मंदिर म्हणून दत्तसंप्रदायात ओळख असणारे श्रीक्षेत्र शेणगाव येथील दत्तमंदिर हे फक्त दत्तभक्त संप्रदायाच्या संकेताप्रमाणे असणारे मंदिर नाही. निसर्गाच्या कुशीतील स्वर्गीय आनंद देणारे हे देवस्थान आहे. 

पवित्र वेदगंगा आई

हे तीर्थक्षेत्र ज्या नदीतिरावर आहे, त्या नदीचे नाव 'वेदगंगा' आहे. वेद म्हणजे पावित्र्य, मांगल्याचे मूर्तीमंत प्रतिक तर गंगा म्हणजे प्रत्यक्ष देवदेवता, ऋषीमुनींच्या स्पर्शाने किंवा वास्तव्याने पावन झालेली नदी. गंगा म्हणजे हिंदू धर्मियांचे पंचप्राण. या सर्व गोष्टींचा संगम म्हणजेच वेदगंगा. या नदीतिरावर वेदांचे अखंड जयघोष होत असत. अशी पवित्र पावन नदी या भूतलावर अन्यत्र कोठेही नसावी. डोंगर-दऱ्यांतून हिरव्याकंच वनराईतून अवखळपणे वाहत येवून शेणगावपुढे आपले बालरूप सोडून प्रौढपणाचे रूप धारण करीत संथ गतीने वाहणारी, वेदगंगा आणि याच वेदगंगेच्या तिरावरील प्राचिन दत्त मंदिर म्हणजेच शेणगावचे वैभव आहे. 

भक्तीचे तरंग

कोल्हापूरच्या पश्चिमेस ५५ कि. मी. अंतरावर व गारगोटी या तालुक्याच्या ठिकाणापासून ५ कि. मी. अंतरावरील शेणगाव येथील वेदगंगेच्या तिरावर असणारे पुरातन दत्तमंदिर दत्तभक्त संप्रदयात प्रसिद्ध आहे. वेदगंगेचा दक्षिणोत्तर वाहणारा शांत प्रवाह व देवालयाच्या समोरच अथांग डोह, नदी तळाचा ठाव घेण्याची अभिलाषा करणारा घडीव दगडाचा प्रशस्त घाट, दुतर्फा असणारी हिरवीगार शेती, भुदरगड किल्ल्याचा पायथा, किल्ल्याचे विहंगम दृष्य, देवालय परिसरातील औदुंबर, पिंपळ, फणस, चिंच व अनेक  वटवृक्षांची वनराई आणि या सर्वांच्या छायेत असणारे दत्त मंदिर, या पुरातन दत्त मंदिरातील नयनरम्य मूर्ती व निर्गुण पादुका भक्तीचे तरंग निर्माण करतात.

श्रीक्षेत्र शेणगाव एकमुखी दत्तमंदिर
श्रीक्षेत्र शेणगाव मंदिरातील एकमुखी
 दत्तमूर्ती

श्रीमूर्तीचे वैशिष्ट्य

मंदिरातील दत्तमूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण एकमुखी व सहा हात असणारी अशा स्वरूपाची मूर्ती अन्यत्र कोठेही नाही. नारायणपूर (पुणे) येथे असणारी मूर्ती एकमुखी आहे पण अलिकडेच बनवण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र शेणगाव येथील मूर्ती प्राचीन आहे. ग्रामीण संस्कृती, परंपराचे हे श्री दत्त मंदिर प्रतीक आहे. या परिसरात सदैव भाविकांची वर्दळ असते. मंदिराच्या मागे पुजारी निवास मंदिर आहे. जवळच असणाऱ्या गिरीगोसावी समाजाच्या वस्तीत असणाऱ्या मठात धुम्रगिरी महाराजांची समाधी अन्य बुवांच्या समाध्या या संपूर्ण परिसराची भव्यता अधोरेखीत करतात. शेणगावातील कोणत्याही शुभकार्याचा शुभारंभ या मंदिरातूनच होतो. येथे येणारा प्रत्येक भाविक हा आपल्या शुभकार्याचे मनोगत देवाजवळ भक्ती भावाने व्यक्त करतो. देवही ते पूर्ण करतो. येथील दत्त मंदिराची बारकाईने पहाणी केली असता दत्त संप्रदायाचे सर्व संकेत पूर्ण करणारे हे क्षेत्र आहे. नदीतिरावर दत्त मंदिर असावे हा एक संकेत आहे. तो येथे पूर्ण होतो. त्याप्रमाणे दत्त क्षेत्र हे वटवृक्ष, औदुंबर यासारख्या वृक्षांच्या छायेत असावे असे अनेक संकेत येथे पूर्ण होतात. संकेताना पुरेपुर उतरणारे तिर्थ क्षेत्र म्हणून याची ख्याती दूरवर पसरली आहे.

दक्षिणोत्तर वेदगंगा

महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब येथे सांगाविशी वाटते. वेदगंगा पूर्व-पश्चिम दिशेने वाहते. मात्र या तीर्थक्षेत्राच्या परिसरापुरती नदी दक्षिणोत्तर वाहते आणि त्यामुळेच येथे शुक्लतीर्थ आहे. यामुळे दत्त तीर्थक्षेत्री शुक्लतीर्थ असावे हा संकेत पूर्ण होतो. मंदिराची उभारणी अंदाजे २०० ते २५० वर्षांपूर्वी झालेली असावी. मंदिर प्राचीन असल्याने निश्चित कालखंड सांगता येत नाही. येथील काही दगडांवर १८२७ सालाचा उल्लेख आढळतो तर काहींवर फक्त खाणाखुणा आढळतात. वेळोवेळी झालेल्या सुधारणा व जिर्णोद्वार यांची नोंद असल्यामुळे कालखंड समजत नाही. 

श्रीगुरुंचे निद्रास्थान

शेणगावचे प्राचीन नाव शयनग्राम होते. आख्यायिका अशी आहे की दृष्टांत झाल्यामुळे श्री दत्तभक्त बालमभट्ट पैठणकर हुबळीहून सहकुटुंब शेणगावपर्यंत चालत आले. पैठणकरांना दृष्टांतात दत्तगुरुंनी आज्ञा केली की तू जेथे दक्षिणोत्तर नदी वाहते व गर्द वनराई आहे. तेथे माझे स्थान आहे तेथे तू जावून माझी सेवा कर. त्याप्रमाणे ते सहकुटुंब चालत चालत अशा क्षेत्रांची पहाणी करत असताना श्रींनी सांगितलेले क्षेत्र आढळले ते म्हणजे शयनग्राम (म्हणजेच शेणगाव) होय. येथे पैठणकर यांनी अखेरपर्यंत वास्तव्य केले. त्यांची समाधीही मंदिराच्या दक्षिणेस आहे.  येथे येवून त्यांनी मंदिरातील सर्व दगडी मूर्ती स्वतः घडविल्या. मंदिरातील कार्तिक स्वामींची मूर्ती महाराष्ट्रातील प्रमुख स्थानांपैकी एक असल्याने या मंदिराचे महात्म्य अलौकिक आहे. सुमंगल क्षेत्र म्हणून परिचित असणारे क्षेत्र हे दत्तगुरुंचे निद्रास्थान म्हणूनही ओळखले जाते. माहूरगडावर जन्म, गिरनार येथे संचार, काशीक्षेत्री स्नान, करवीर क्षेत्री भिक्षा, शयनग्रामी (शेणगावी) निद्रा अशी दिनचर्या श्री दत्तगुरुंची असते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे या क्षेत्राची महती अलौकिक आहे. 

श्रीक्षेत्र शेणगाव एकमुखी दत्तमंदिर
श्रीक्षेत्र शेणगाव एकमुखी दत्तमंदिर

मंदिरातील उत्सव

सूर्योदयापूर्वी मंदिरात धार्मिक विधी सुरू होतात. संध्याकाळी शेजारती झाल्यानंतर विधी पूर्ण झाल्यानंतर श्रींचे दर्शन बंद होते. पौर्णिमेला पालखी उत्सव सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांची आवर्जून उपस्थिती असते. गुरुद्वादशी, श्री दत्तजयंती, कार्तिकस्वामी दर्शन सोहळा हे येथील प्रमुख उत्सव आहेत. गुरुद्वादशी दिवशी मोठी यात्रा भरते. श्री दत्तजयंती दिवशी नामस्मरण, किर्तन, भजन, प्रवचन यासारखे विविध कार्यक्रम असतात. खास प्रवचनासाठी दिग्गज किर्तनकारांची उपस्थिती असते. 

घाटावर दशक्रिया विधी

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी प्रमाणेच शेणगाव येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त मंदिर परिसरातील घाटावर मृतात्म्यांना शांती मिळावी, यासाठी अंत्यविधी नंतरचे धार्मिक विधी (दशक्रिया) येथे केले जातात. सदर दत्त मंदीर हे प्रासादिक व भक्तजनांचे श्रद्धास्थान आहे. अनेक दत्तभक्त येथे येऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन धन्य झाल्याचे आवर्जून सांगतात. प्रत्येक  दत्तभक्ताने येथे जाऊन दर्शन घेऊन महाराजांचे चतुर्वीध पुरुषार्थ प्राप्तीचे आशीर्वाद घ्यावेत. मंदिरात अनेक सुधारणा कामे चालू आहेत.