श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज

श्री केशवानंद सरस्वती
श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज

नाव: केशवानंद सरस्वती (पूर्वाश्रमी सखाराम तांबे)
जन्म: कृष्ण द्वितीया शके १८१५ (इ. स. २५.११.१८९३) / मृत्यू १८.८.१९४८
आई/वडील: सौ भागीरथी / श्री रामचंद्र. 
जन्मगाव: खरगोण, मध्यप्रदेश         
गुरू: प. पु. वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी 
वेदाध्ययन: नरहरी लळीत

श्री दत्त परंपरेमधे लीन स्वत: दत्तावतारी श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे मुळीच प्रसिध्दी नको असणारे शिष्य म्हणजे इन्दूर येथील यति संन्याशी श्रीमत्परमहंस परिब्राजकाचार्य श्री केशवानंद सरस्वती तांबे स्वामी महाराज. ह्या गुरु शिष्याची समरूपता अशी काही तरी विशिष्ट असावी की कोण श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहे व कोण श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज आहे हे कळेना असेच आहे. 

श्री तांबे स्वामींचा जन्म कार्तिक कृष्ण व्दितीया शके १८१५ तद्‌नुसार इ. स. १८९३ (२५/११/१८९३) खरगोण येथे झाला. खरगोण हे ह्याच आजोळ, वडील् श्री रामचन्द्र व मातोश्री भागीरथी. मूळ हा परिवार कोंकणाकडील होता. वडील श्री रामचन्द्र भटजी वैदिक व धार्मिक प्रवृत्तीचे होते. वडील श्री रामचन्द्र भटजी वैदिक व धार्मिक प्रवृत्तीचे होते. हे इन्दूरला राहत. बरेच विद्यार्थी ह्यांच्याकडे वेदाभ्यास करण्यास येत. रामचंद्र् भटजी रात्री समईच्या उजेडातदेखील वेदाचा अभ्यास करत असत. मातापितांनी तांबे स्वामींचे नाव सखाराम ठेवले होते. त्यांना दोन मोठ्या बहिणी होत्या. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी ह्यांचा व्रतबंध संस्कार केला व पुढे हे दशग्रंथी ब्राह्मणच झाले. घरी वडिलांकडून ह्यांच्याकडून सखोल वेदाभ्यास करवुन घेत असत. इन्दूरात श्री नरहरी लळीत ह्यांच्याकडून वेदशाळेत वेदाभ्यास सुरू झाला. हे दूर सोळ्यात आसनावर बसत तर दूसरी मुले त्यांना हसायचे तर नरहरी गुरु म्हणायचे "अरे पोरांनो त्याला हसू नका तो मोठा होऊन फार नामांकित यती होणार.''

सुमारे त्या काळातच श्री टेंबे स्वामी इन्दूरला आले. लहान सखाराम त्यांच्या दर्शनास गेले, नुसत्या त्यांच्या दर्शनाने सखाराम इतके प्रभावित झाले की आपण पण श्री स्वामी महाराज (श्री टेंबे स्वामी) सारखाच आचार धर्म स्वीकारायचा व श्री टेंबे स्वामीच आपले सद्‌गुरू हा संकल्प केला. पुढे तांबे स्वामींच्या वडीलांना स्वर्गवास झाला. हे अमीनसाहेब लघाटे ह्यांच्या वाड्यात मातोश्रीसह राहण्यास आले. शिक्षणानंतर चरितार्थ चालवण्यास हे शास्त्रशुध्द पौरोहित्य करत असत. त्रिकाळकालस्नान, संध्या, पाच घरची भिक्षा, नित्य पार्थिवपूजा करीत मगच भोजन करीत असत. त्याच काळात ह्यांच्या एका बहिणीचे पति वारले. मातोश्रींनी ह्यांना म्हंटले की बहिणीकडे जाऊन तिच्या दु:खाचे शमन करावे व त्यावर हे म्हणाले की तिने विधवाधर्माचे निष्ठेने पालन करावे. पण ह्या घटनेने त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. ह्यांनी स्वत: विवाह न करण्याचा निर्णय घेतला. मातोश्रींनी फार समजवले. मग मातोश्रींनी नरहरीगुरुस मध्यस्थी करायला विनंती केली परंतु नरहरी गुरु म्हणाले की हा फार वेगळा मुलगा आहे. विवाहाचा विषय इथेच थांबवावा. पुढे प्लेगमुळे मातोश्री ही स्वर्गवासी झाल्या. मातेचे उत्तरकार्य करून आता संन्यासधर्म स्वीकारायचा हा त्यांचा दृढ निश्चय झाला. आदि शंकराचार्यांसारखा ब्रह्मचर्याश्रमातून थेट संन्यासाश्रमात पदार्पण केले. देहशुद्धीसाठी गायत्री पुरश्चरण केले व चंद्रायणाचे व्रत केले.

संन्यास धर्म स्वीकारायच्या आधी मातृभूमीचे दर्शन घेतात म्हणून हे इन्दुरहून ८० मैल पायी खरगोणला जाऊन दुस-याच दिवशी पायी परतले व सोबत ग्रंथांची लाकडी गाडा घेऊन खेचत नेले आणले. लघाट्यांच्या वाड्यात सर्वजण थक्कच झाले. तांबे स्वामींच्या दिव्यशक्तीची लोकांना जणू जाणीव झाली.

इन्दूरातील वासुदेव बागे ह्या क्षेत्रात स्वयं महाराजांचे वास्तव्य झाले होते व् इथेच त्यांनी श्रीमंत इंदिरामॉंसाहेब होळकरांना स्वहस्ते आपल्या पादुका दिल्या होत्या म्हणून इथे ब्राह्मवृंदांसमोर ह्या पवित्र् स्थळी संन्यास स्वीकारला. घरून येताना ह्यांनी स्वयंच एक मंत्र् लिहून आणला होता तोच पादुकंवर ठेवून गुरुमंत्र् जणु स्वामी महाराज समोर बसले आहेत ह्या विचारांनीच संन्यास घेतला व केशवानंद सरस्वती हे नाव पण स्वीकारले. 

संन्यास घेतल्यावर आपण गरुडेश्वरी स्वामी महाराजांच्या दर्शनास जावे ह्या विचारांनी प्रवासाला निघाले. वाटेत उज्जेनला नाशिककरांच्या दत्त मंदिरात तीन दिवस मुक्काम केला. ह्याच मंदिरात श्री नारायणनंद स्वामींनी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना दण्ड दिला होता. तांबे स्वामींना एक दण्डीसंन्याशी येऊन म्हणाले की आम्ही तुम्हास दण्ड देण्यास आलो आहे. दण्ड दीक्षा करूूू मगच पुुढेजा या असे म्हणून त्यांना दण्ड देऊन ते संन्याशी निघुन गेले. तांबेस्वामी मग भिक्षा करण्यास निघाले. भिक्षा घेऊन परत येताना एक भिक्षुक येऊन म्हणाला की मला भूक लागली आहे त्यावर ह्यांनी आणलेली भिक्षा त्याला दिली. असे तीन दिवस घडले. त्यावेळेपासून ह्यांनी फक्त गुरु दाणेच खाऊन रहायचे असा निश्चय केला असे करत नीमच मार्गी हे गरुडेश्वरास पोहोचले.

गरुडेश्वरास स्वामी महाराजांच्या समाधीपाशी हे महापुजा करत तीन दिवस राहिले. तिस-या दिवशी समाधीपाशी बसले होते. तिथल्या पुजा-याला म्हणाले की स्वामी महाराजांची इतकी विशाल लेखणी आहे तर त्यातील मला काही तरी प्रसाद म्हणून द्या. पुजारींनी लगेच त्यांना दत्त् मंदिराच्या ठिकाणात घेऊन आले व म्हणाले की स्वामी महाराज समाधी घेण्याआधी ह्या पोथीतील कागद त्यालाच दे, जो स्वत:हुन मागेल. व काल रात्री परत स्वप्नात येऊन सांगितले की हा कागद आलेल्या स्वामीस द्यावा. कागदात तोच मंत्र् लिहिला होता जो तांबे स्वामींनी स्वत: संन्यास दीक्षेच्या वेळेस गुरुमंत्र् म्हणून स्वीकारला होता. कागदावर स्वामी महाराजांच्या अक्षरात तो मंत्र् बघून तांबे स्वामी धन्य झाले जणु स्वामी महाराजांनी एका आईप्रमाणे माया करावी.

यानंतर हे इन्दुरला परतले. थोड्याच काळात हे इन्दूरच्या पळासा क्षेत्रात शौचे ह्यांच्या बागेत कुटीत राहण्यास गेले. कितीही कुणालाही न कळवता राहीले तरी ह्या कुटीत उच्च् कोटीचे दण्डीसंन्यासी राहतात ही वार्ता सर्वत्र् पसरली. मंडळी धीरे धीरे स्वामींच्या दर्शनास येऊ लागली. गुरुपोर्णिमा, श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी मंडळी मिळून मिसळून स्वामींच्या सानिध्यात साजरी करू लागली.

स्वामी त्रिकाळकालस्नान संध्या करत. एकदाच आसन भिक्षा घेत असत. भिक्षेत गुळ-दाणे क्वचित भाजलेले बटाटे व रताळे घेत असत. भिक्षेत आपल्या गुरुंसारखे फक्त 8 घास मोजून खात असत. एका छोट्या भांडभर पाण्यावर पार्थिव पुजा करून तेवढेच भांडभर पाणी त्यांना दिवसभर पुरत असे. जोशी, डॉ. भागवत, नाना आपटे, नाना दंडे, शिणोलीकर, डॉ. देव, करमळकर, भिसे बंधु, बाबुलाल अशी बरीच मंडळी नित्यनेमाने दर्शनास येऊ लागली. तसेच कोरान्ने मास्तर कथा पुराण करण्यास येत असत तर विष्णुपंत वैद्य भजन करण्यास येत असत. अमृतलाल वैद्य संस्कृत शिकण्यास येत असत तर कुणी पंचदशी शिकण्यास येत तर कुणी संध्या शिकत तर कुणी वेद पढत. पुरुषांना पॅंट शर्टात कुटीत आत येण्यास मनाई होती, विहिरीवर स्नान करून धोतर नेसून मगच यात यायचे, एकदा दर्शनास येणा-या स्त्रियांपैकी एका स्त्रीने ह्यांच्या नावाखातर दुस-यांकडून पैसे गोळा करून दुराचार केला त्यावेळेपासून ह्यांनी स्त्रीयांना दर्शन देण्यास नाकारले परंतु नंतर एक दिवस दिवस पुर्वाश्रमीची बहिण स्वामींच्या दर्शनास आली पण दर्शन मिळेना म्हणून लाहेर विहिरीपाशी रडत बसली त्या घटनेनंतर सर्वांच्या विनंतीमुळे स्वामी चतुर्थीला फक्त् स्त्रियांना दर्शन देऊ लागले. एकदा एक भजनी मंडळ आले होते. स्वामी दूर आसनावर विराजमान होते सर्वांना असे वाटले की आसना खालती उंदीर वळवळतो आहे. स्वामी स्नानास उठले तेव्हा आसन सरकवून बघितले तर साक्षात नाग जणु स्वामी आज शेषासनावर बसले होते.

नकळत हे लीला करत. प्रत्येक भक्ताच्या समस्यांवर समाधान करत असत. दुसरं महायुद्ध चालु होते. एक दिवस स्वामी आपल्या साधनेत लीन होते तीन्हीसांजेची वेळ होती. एक फार आक्राळविक्राळ देहआकृती स्वामींसमोर येऊन बसली व म्हणाली की दुस-या महायुद्धाबद्द्ल तुमच काय मत आहे तर स्वामी म्हणाले माझं त्याबद्दल काही मत नाही माझ फक्त् माझ्या सद्‌गुरुंच्या साधनेच कर्तव्य आहे, हे म्हणता क्षणी ती देह आकृती नाहीशी झाली. ह्या घटनेवर असे टिपण आहे की जणु तांबे स्वामींच्या भक्तीची परिक्षा पाहण्यास स्वत: स्वामी महाराज आले होते.

बरीच वर्ष ह्या कुटीत निघुन गेले. सुमारे इ. स. १९४४ उजाडले. आता इथे बागेच्या बाजुस काही बकाल वस्ती होऊ लागली म्हणून आता स्थानांतर केले पाहिजे असे तांबे स्वामींना वाटले. सर्व मंडळींचे नगरात बगीचे होते म्हणून बरेच जण आमच्या बागेत राहण्यास चला असा आग्रह करू लागले. शेवटी इन्दूरच्या पश्चिमेकडे जोशींच्या बागेत राहण्याचा निर्ण्य झाला. ही जागा एकांतवासाकरता उत्तम व हवामान ही छान होते. स्वामी म्हणाले की माझ्या सद्‌गुरुंच्या आज्ञेप्रमाणे तिथे येण्यास दिवस विहित करेन.

फाल्गुन शुद्ध अष्टमीचा दिवस होता. तोच दिवस नेमला गेला होता. गुरुवारचा होता. बागेत चुन्याची कुटी तयार केली गेली. इन्दूरच्या ह्या पळासा भागातून दूर पश्चिमेकडील भागात शेताशेतातून पाई चालत स्वामी आपले देव, दण्ड्, कमंडलू घेऊन कुटीत येऊन उभे राहिले. बरोबर बरीच मंडळी दिगंबरा दिगंबरा…चा जप करत टाळ, झांझ वाजवत आली होती. बरेच सामान मंडळींनी सायकलीवर आणले. अति आनंदमय वातावरण झाले. लवकर इथेदेखील स्वामींच दर्शन घेणा-यांची गर्दी होऊ लागली. जवळजवळ इथे स्वामींना पार्शी लोक आपल्या समस्या घेऊन येत. स्वामी त्यांच्या समस्येचे समाधान नकळत करून देत असत. कोण आणि काय समस्या घेऊन येणार हेसुद्धा स्वामींना माहित असत. भरपुर् मंडळी वेद शिकण्यास येऊ लागली. स्वामींनी ह्या बागेच्या चहु दिशेस औदुंबर, आवळा, अशोक पिंपळा सर्व वृक्ष् लावली. बागेच्या चहु दिशेस शंकराच्या लिंगांची स्थापना केली व चारी लिंगाची बिल्वेश्वर, गरुडेश्वर, नर्मदेश्वर व विश्वेश्वर अशी नावे ठेवली गेली. ज्यांची ही बाग होती आबा जोशी बरेचदा इथे स्वामींच्या सानिध्यात राहत. विहिरीपाशी स्वामींच्या स्नानाची सोय केली गेली. नवी जुनी सर्वच मंडळी इथे जमू लागली. गणेश अथर्वशिर्षाचे ही पाठ नित्यनेमाने होऊ लागली व दत्त् जयंती पण साजरी होई. गरूडेश्वरहुन आणलेली वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती इथे देवघरात पुजेस आली.

नित्यक्र्म चालू असता स्वामींच्या देहालाही भरपूर भोग होता पण आपल्या गुरुंप्रमाणे हे देखील कधी औषध न घेता भोग भोगूनच संपेल हाच नियम असे. एकदा त्यांना निमोनिया झाला. अती अशक्त्पणा आला. हिवाळ्यात कुटी अति गार झाली. संन्याशाला अग्निस्पर्श नाही तरी ही भक्तांनी मुळीच न ऐकता कुटीत दूर एका कोप-यात शेकोटी पेटवून ठेवली, म्हणजे थोडी उब राहील पण एका रात्री ग्लानीमुळे स्वामी शेकोटी जवळ पडले. गुडघा, छाती भाजली गेली. गुडघ्यातून तर आंब्याएवढ्या मासाचा गोळा लटकून बाहेर आला. अशा स्थितीतही स्वामींचे अनुष्ठान, भजन, पूजा, त्रिकाळस्नान चालूच असे. भक्तांना बजावून ठेवले होते की कुणीही मला औषध पुडी घेण्यास हट्ट धरायचा नाही. गुडघ्याच्या जखमेत मुंग्या-मुंगळे लागले शेवटी, तरी स्वामी म्हणत "पहा हा जीव माझी जखम भरत आहे". हळूहळू औषध न घेता ज्या जखमा बऱ्या झाल्या. स्वामी प्रत्येकाशी अती प्रेमळपणाने वागत. प्रत्येकाला  बाळ म्हणूनच संबोधित करत असत. सतत आपल्या मुखी सद्‌गुरुंचे स्मरण व आत्मा ह्या परमपिता परमेश्वराच्या आधीन, ब्रह्मानंदात लीन असत. बरेचदा आबा जोशी ह्यांच्या सोबत् कुटीत निजे तेव्हा त्यांना वाटे स्वामी झोपेत घोरतात पण लक्षपूर्वक ऐकल्यावर कळले की प्रत्येक श्वासात सोऽहंचा नाद असे.

सुमारे इ. स. १९४८ च वर्ष् उजाडले. गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा झाला. श्रावण मासात स्वामींच्या शरीराला ज्वराने आपले घर केले. पोटात असह्य मुरड येत असे तरी नित्यक्र्म चालूच होता. दर्शनास ही लोक येत असत. कुण्यापर्यंत जाऊन स्नानसंध्या करत. स्वामींना बराच थकवा येई. आबा जोशी म्हणत स्वामी आता कुटीतच तुमच्या स्नानाची सोय करू त्यावर स्वामी म्हणत की मी सांगेन त्याच दिवशी कुटीत स्नानाचे सोय करावी. आबा जोशी, भागवत तिथेच स्वामींच्या सेवेस तत्पर राहत. डॉक्टर आले तरी स्वामींनी काही स्वत:ची तपासणी होऊ दिली नाही.

अखेरीस इ. स. १९४८ (१८/८/१९४८) शके १८७०. आज स्वामींनी आबास पुजा व कुटीत त्यांच्या स्नानाची सोय करायला सांगितली. आबांनी पुजा करून स्वामींना तीर्थप्रसाद दिला. स्वामी उत्तराभीमुख होऊन बसले व दिगंबरा दिगंबर म्हणू लागले. आबा म्हणाले की तुमचा बाळ आहे मला काही उपदेश करावा त्यावर स्वामी म्हणाले सतत भजन चालू असू द्या. स्वामी आता हरे हरे म्हणू लागले. हळूहळू उच्चार कमी होऊन नाहीसा झाला. आबांना जोरदार हुंदका लागला पाहतात तर स्वामी सोडून गेले होते. लौकरच नगरात ही दु:खद बातमी पसरली. स्त्रीपुरुष सर्व जण जमू लागली. फारच उदासवाणी परिस्थिती ओढवली होती. आबा जोशीच आता स्वामींचे उत्तरकार्य करणार हे सर्वांनी मिळून ठरविले. 

स्वामींच्या देहाला रूद्राभिषेक केला गेला. दण्डाचे तीन तुकडे करून दंड कमंडलू चे गाठोडे तयार केले गेले. त्यांच्या देहाला मोटारीत बसवून ष्ढवाह च्या नर्मदा किनारी नेण्यास तयारी झाली. त्यांच्या मोटारीमागे इतर मंडळी वेगवेगळ्या वाहनात झांझ, टाळ, मृदुंग वाजवत दिगंबरा दिगंबराचे भजन करीत निघाले. ही मिरवणुक नर्मदेच्या किनारी आली. इथे परत नर्मदेकिनारी स्वामींच्या देहाची पुजा केली गेली. शंखनाद झाला. शेवटपर्यंत स्वामींचा देह ताठ नव्हता झाला. मऊ सूत होता व एक विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळत होता. अखेरीस आता हा पवित्र देह नर्मदा मातेच्या कुशीत सोपवला गेला. मंडळी मध्यरात्रीपर्यंत भजन करीत परतली व पुढे कित्येक दिवस वेद पारायण, भजनांचा सप्ताह गणेश अथर्वशिर्षाचा पाठ करीत होते. पुढे शंकराचार्य चातुर्मासात आले. त्यांची कुटीत मंडळींनी भिक्षा केली व त्यांनी मंडळींनी असेच मिळून मिसळून राहा असा उपदेश केला.

स्वामी होते तोवर फोटोग्राफर वर्मा कधीच कुटीत दर्शनास नव्ह्ता आला, तरी न बघता त्यांनी स्वामींचा मोठा फोटो तयार करून दिला व तो कुटीत दुरूनसुद्धा स्वामींच दर्शन होईल असा स्थापित केला. पुढे ह्या कुटीजवळ अण्णा भाट्यांना स्वप्नात स्वामींच्या आज्ञेप्र्माणे श्री दत्त् मंदिराची उभारणी केली. पुढे सुमारे इ. स. १९९२ श्री अवधूत जोशी ह्यांनी ह्या मंदिराची व्य्वस्थितरित्या बांधणी केली. त्यांच्यावरही स्वामी महाराजांचे भरपूर आशिर्वचन होते. त्या साली ह्यांनी कुटीत स्वामी महाराजांच्या पेंटिंगपाशी बसून सतत बावन्न् गुरुचरित्राचे पारायण केले. आज ह्यांच्यामुळेच ह्या परिसरात इतके सुंदर मंदिर देखील स्थापित आहे.

आज इन्दूरच्या पश्चिमभागात वैशाली नगर मुख्य रस्त्यावर हे पावन, रम्य, शांत स्थळ आहे. ह्या बागेच्या चहुबाजुस भरपूर वस्ती झाली आहे तरी हे रम्य स्थळात मुख्य दारातून आत गेल्यावर समोर श्री दत्त् मंदिर आहे. गर्भगृहातून श्रीदत्ताची सुंदर, पांढरी तेजस्वी संगमरवरी मूर्ति आपल्या भक्तांकरता हसत समोर विराजमान आहे. मूर्ति काय साक्षात श्रीदत्त्महाराज आपल्या भक्तांकडे मायेने पाहत उभे आहेत. मंदिराच्या मागच्या बाजुस मोठ्या औदुंबर व पिंपळाच्या सावलीत ही कुटी आहे. ह्या कुटीला आसा "स्वामींची कुटी'' असे म्हणतात. ह्या कुटीत स्वामी महाराजांचे मोठे पेंटिंग, देवघरात श्रीस्वामी महाराजांची मूर्ती व तांबे स्वामींचा मोठा फोटो आणि पादुका आहेत.
    
जसे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी कठोर संन्यासधर्माचे पालन केले पण आपल्या भक्तांशी अतिप्रेमळपणाने वागले. श्री तांबे स्वामींनी आपल्या गुरुंप्रमाणे काटेकोरपणाने संन्यासधर्माचे पालन केले. देहाची माया कधीच ठेवली नाही व भक्तांवर आपल्या मायेचा ओलावा सदैव ठेवला. म्हणूनच श्री तांबे स्वामींना श्री टेंबे स्वामींची प्रत असे म्हणतात.

तांबे स्वामींनी फार एक्रागतेने, तन्मयतेने अतिप्रेमळपणाने फार उच्च कोटीची श्री टेंबेस्वामींची भक्ति केली. त्यांची नामसाधना केली, सतत त्यांना आळवले, सतत त्यांचीच उपासना केली. आणि ह्याच वर्तनाची ह्याच वागणुकीचा, ह्याच भक्तिचा ठेवा ह्यांनी पर्णकुटीत ठेवला. हे सदेह ह्या कुटीत असताना एखाद्या भक्तानी जर ह्यांना अर्पण करण्यास एखादे फूल किंवा पेढे वगैरे नैवेद्य म्हणून आणला तरी स्वामी तो नैवेद्य स्वामी महाराजांपाशी अर्पण करण्यास सांगत. ह्या कुटीत त्यांच्या परवानगीशिवाय काही घडण अशक्य आहे म्हणून आजही काही कुटीबद्दल छोटा मोठा निर्णय घेण्यापूर्वी इथली गणमान्य मंडळी चिठ्ठी टाकून श्री तांबे स्वामींची परवानगी घेतात. 

ही असली दत्तावतारी थोर सत्पुरुषांच दैहिक यात्रा संपवण नुसती एक सूचना घटना असते. पण ह्यांचे वास्तव्य ह्यांच्या कार्यस्थळी सतत सदैव असतं व निरंतर हे आपल्या भक्तांचा सांभाळ करत असतात. आणि म्हणुनच ह्या चैतन्यमयी पर्णकुटीत, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपाछत्रात, श्री केशवानंद सरस्वती तांबे स्वामी महाराजांच्या मायेच्या सावलीत भक्त्तांना ह्यांचा अनुभव व प्रचिती लाभत असते.

।। निखिल दृश्य सतत स्वामी दिसो ।।

वैशाली मुळे इंदूर