सद्गुरू श्रीजंगलीमहाराज

सद्गुरू श्रीजंगलीमहाराज
सद्गुरू श्रीजंगलीमहाराज

जन्म: ख्रिस्ताब्द १८०३
आईवडिल: ज्ञात नाही
कार्यकाळ: १८०३-१८९०
गुरु: नाथपंथीय स्वरूपनाथजी 
समाधी: चैत्र शु.१४ दि.४-४-१८९० पुणे येथे

जन्म व बालपण 

महाराजांचा जन्म वैशाख शुद्ध ५ या दिवशी कर्नाटकात झाला. हुबळीजवळ एका खेड्यात त्यांचे वडील अध्यात्म चिंतनात आपला काळ घालवीत होते. ब्राह्मणोचित अशा आठव्या वर्षी त्यांचे उपनयन झाले. लवकरच माता व पिता यांच्या वियोगाचा प्रसंग त्यांच्यावर आला. तेव्हा आपल्या नातेवाईकाकडे ते राहू लागले. पण एका संध्याकाळी कोणी एक योगीपुरुष आला आणि त्याने महाराजांना घराबाहेर बोलाविले ते कायमचेच. त्यानंतर महाराज पुन्हा त्या घरातच काय पण गावातही गेले नाहीत. त्या पुरुषाने महाराजांना आपल्याबरोबर नेले. पदयात्रा करीत हे दोघेही माहेश्वर येथे गेले. 

विश्वरूपानंद महाराज नांवाचे एक मोठे योगी होते. त्यांच्या स्वाधीन महाराजांना करुन तो पुरुष अदृश झाला. श्री विश्वरूपानंद महाराज यांच्याकडे त्यांनी योगाभ्यास केला. त्यात त्यांना पूर्णत्व आल्यावर श्री महाराजांनी नर्मदा प्रदक्षिणा केली. केवळ एक वस्त्र व कमंडलु हे त्यांचे या यात्रेतील सहायक होते. नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ते हिमालयात गेले. तेथे १२ वर्षेपर्यंत त्यांनी वास्तव्य केले. त्याचवेळी त्यांनी नाथसंप्रदायाची दीक्षा घेतली. तेंव्हा त्यांचे दीक्षा नाव ‘जागरनाथ’ असे ठेवले गेले. त्यानंतर त्यांनी नाथसंप्रदायी लोकांबरोबर बराच प्रवास केला.

सद्गुरू श्रीजंगलीमहाराजांचा जन्म ख्रिस्ताब्द १८०३ मध्ये बडोदे येथील झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्या तांबे घराण्याशी संबंधित असलेल्या जहागीरदार घराण्यात झाला असेही काहींचे मत आहे. लहानपणापासून त्यांना व्यायामाची आवड असल्याने तरूणपणात त्यांनी चांगली शरीरसंपदा मिळविली होती. 

महाराज पुण्यात असतांना ते वारंवार देहू-आळंदी येथे जात. देहू येथे त्यांनी एक धर्मशाळाही बांधलेली आहे. प्रतिवर्षी दासनवमीस ते सज्जनगडास जात. ‘सच्चिदानंद सद्गुरू’ असे दासस्मरण नेहमी त्यांच्या मुखी असे. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी व महाराज यांचा स्नेह होता. त्यामुळे नृसिंह सरस्वती स्वामी पुणे येथे येवून महिना महिना महाराजांच्याजवळ रहात असत. त्यांचे महाराजांचे नेहमी एकांतात बोलणे होई. ते खूप उंच असल्याने व त्यांची प्रकृती सुदृढ असल्याने ते भरभर चालत. त्यांचे बरोबर इतरांना चालणे जमत नसे. 

सद्गुरू श्रीजंगलीमहाराज
सद्गुरू श्रीजंगलीमहाराज

चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १८१४, दिनांक ४-४-१८९० या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ते समाधिस्थ झाले. त्यांच्या दर्शनार्थ हजारो लोक जमले व रोकडोबा मंदिरापासून समाधी स्थानापरयंत त्यांची प्रचंड मिरवणूक निघाली. 

१८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात एक सैनिक म्हणून त्यांनी कार्य केले. स्वातंत्र्य समरात पराभव झाल्यानंतर संन्यास घेऊन सर्व भारतात त्यांनी परिभ्रमण केले. महाराष्ट्रात आल्यावर ते कृष्णेच्या काठी कऱ्हाडजवळील रेठरेहरणाक्ष या गावी स्थायिक झाले. तेथे गावाजवळ असलेल्या नदीतीरावरील शंकराचे मंदिरात प्रतिदिनी सकाळी ५-६ तास ध्यान करीत. नंतर गावात भिक्षा मागून नदीच्या वाळवंटात भोजन करीत. कृष्णेला पूर आला म्हणजे पाण्यावर घोंगडे टाकून व त्यावर बसून ते परतीराला जात. ह्याचे तेथील जनतेला आश्चर्य वाटे. त्यांचे भक्त औंध येथील कृष्णराव कदम यांची भेट रेठरे या गावी झाली हे श्री कदम यांनी लिहून ठेवले आहे. 

रेठरे येथून महाराज पुणे येथे आले व त्यांनी भांबुर्ड्यात रोकडोबाचे मंदिर बांधून तेथे वास्तव्य केले. प्रतिदिनी नियमाने ते रोकडोबाचे दर्शन घेत व पहाटे नदीवर स्नान करुन पाताळेश्वराजवळील टेकडीवर निवडुंगाच्या बनात ध्यान करीत. माध्यान्हपर्यंत त्यांचे ध्यान संपवून ते भांबुर्डे गांवात येत व भिक्षा मागून चरितार्थ चालवीत. त्यांची योग्यता कळल्यावर लोक त्यांना रोकडोबाच्या मंदिरातच प्रतिदिनी भोजन आणून देत. दोन प्रहरी थोडी विश्रांती घेतल्यानंतर दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आदि गंथांचे वाचन ते करीत. त्यावेळी ते लोकांच्या शंकांचे निरसन करीत. ते अधूनमधून बाहेरगावी प्रचारालाही जात. त्यांची किर्ती ऐकून दूरदूरचे लोक धार्मिक विषयावर त्यांच्याशी संवाद करण्यास येत. त्यामुळे रोकडोबाचे धर्मशाळेत भाविकांची सतत रीघ लागलेली असे. प्रसिद्धीचा त्यांना तिटकारा असे. यामुळे ते स्वत: जे अभंग करीत ते लिहून घेण्यास त्यांचा विरोध असे. त्यांचे अभंग एकदा एक शिष्य कागदावर लिहून घेत असता त्यांनी तो कागद त्याच्या हातातून घेऊन पेटत्या पणतीवर जाळून टाकला. कित्येक छायाचित्रकारांनी त्यांची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.

त्यांनी प्रचार कार्यार्थ ठिकठिकाणी हिंडून कारजगे, रेठरे आदि गावी मठस्थापना केली. एकदा ते मिरज येथे गेले असता रखमाबाई गाडगीळ या नांवाच्या एका बाईंनी आपणास महाराजांनी शिष्य करून घ्यावे अशी विनंती केली. तेंव्हा महाराजांनी त्या बाईस संसारत्याग करुन मिरजेत भिक्षाटन करण्याची आज्ञा दिली. अशा तऱ्हेने सतत बारा वर्षे त्या बाईंनी मिरज येथे भिक्षाटन केल्यावर महाराजांनी त्यांना गुरूपदेश दिला. त्यानंतर रखमाबाई पुण्यास येऊन राहिल्या. तरी आठवड्यातून एक दिवस त्यांना भिक्षाटन करून आपला चरितार्थ चालविण्याची महाराजांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या जन्मभर आचरण करीत. रखमाबाई पुण्यात आल्या तेंव्हा त्यांच्या बरोबर महाराजांचे शिष्यत्व पत्करून दुसऱ्या बाई आल्या, त्यांचे नांव तुळसाक्का, महाराज जेंव्हा समाधिस्त झाले तेंव्हा त्यांचा संप्रदाय चालविण्याची योग्यता असलेल्या रखमाबाई व तुळसाक्का या दोघींनी त्यांचे कार्य त्यांच्यानंतर दहा वर्षे चालविले. रखमाबाईंनीच खटपट करून रोकडोबा मंदिरासमोर राम मंदिर बांधून घेतले व रामाचा उत्सव, पारणे नऊ दिवस पहारा, कथाकीर्तन आदि कार्यक्रम सुरु केले. रखमाबाईंना गावातले लोक आईसाब म्हणत. रखमाबाईंच्या मृत्यूनंतर तीनच दिवसांनी तुळसाअक्काने देह ठेवला. रोकडोबा मंदिराच्या समोरील राममंदिराचे आवारात या दोघींच्या समाध्या आहेत. 

महाराज हे योगातील अधिकारी पुरुष होते. त्या बाबतीत त्यांनी पुष्कळ चमत्कार केले आहेत. एकदा महाराज आजारी पडले असता मिरजेच्या राजेसाहेबांनी त्यांना औषध देण्यासाठी, यांची प्रकृती तपासण्यासाठी आपल्या राजवैद्यास पाठविले. ते राजवैद्य आले तेंव्हा महाराजांनी समाधि लावली. वैद्यबुवांना वाटले की अशक्तपणामुळे महाराजांना ग्लानी आली आहे. म्हणून त्यांनी महाराजांना तपासण्यास प्रारंभ केला. परंतु नाडीचे ठोके, ह्र्दयाचे ठोके यांचा त्यांना पत्ताच लागेना. तेंव्हा वैद्यराज व महाराजांची शिष्यमंडळी चिंतातुर झाली. इतक्यात महाराजांनी समाधि उतरविली व हसून वैद्यराजांना म्हणाले, काय रोगनिदान झाले का? वैद्यराजांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवून आपला अधिकार फार मोठा आहे असे त्यांना सांगितले. एखाद्या सुगंधित फुलाचे अस्तित्व जसे त्याचा सुगंध दाखवून देतो तसेच त्या सिद्धपुरुषाचेही झाले.

कोणीतरी एक सिद्धपुरुष, एक अवलिया ह्या जंगलात रहायला आला आहे ही गोष्ट हळूहळू प्रगट झालीच. काहींनी शोध घेतला तेंव्हा एका सिद्धाचे अस्तित्व त्यांना दिसून आले. कोणी एक बाबा जंगलात येऊन राहिला आहे अशी वार्ता अशिक्षितांत पसरली. त्यांनी शोध घेतला. त्यांनाही तो सिद्धपुरुष दिसला. ती भाविक अडाणी जनता वैराग्यशील सिद्धाला ‘महाराज महाराज’ म्हणू लागली. जंगलात राहणारा महाराज म्हणून जंगलीमहाराज असे नांव त्या भाविक जनतेकडून त्या सिद्धाला मिळाले आणि आजतागायत तेच नांव लोकप्रिय होऊन बसले आहे. 

आज पुण्यात, पुण्याबाहेर, उभ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सर्वत्र श्रीजंगलीमहाराज यांचे असंख्य भक्त आहेत. वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही सारखेच प्रिय असे हे दैवत आहे आणि या गोष्टीचा मागोवा घेतला तर जंगलीमहाराज हिंदु होते का मुसलमान होते हा उपस्थित होणारा प्रश्न मागे पडतो आणि आजही दोघांनाही प्रिय अशा पंथाचे अशा संप्रदायाचे म्हणजे ‘नाथपंथाचे-नाथ सांप्रदायाचे’ ते होते.

नाथपंथीय योग्याबद्दल हिंदू आणि मुसलमान दोन्ही जमातींना सारखाच नितांत आदर वाटत असतो. मुसलमानात सुफी या नांवाचा जो पंथ आहे त्याचे तत्त्वज्ञान तर हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाशी बहुतांशी मिळते जुळते असेच आहे असे म्हटले तर फार अतिशयोक्ती होणार नाही. भारतात वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके एकत्र राहणाऱ्या या दोन जमातींच्या पिढ्यान पिढ्या इथेच जन्माला आल्या आहेत-येणार आहेत. इथेच वाढलेल्या आहेत-वाढणार आहेत आणि शेवटी याच भूमित विसावल्या आहेत-विसावणार आहेत. काही स्वार्थसाधू मंडळींच्या मुळे वितुष्ट निर्माण झाले आणि अशी मंडळी हे वितुष्ट जोपासण्याचे कार्य करीत असली तरी हे वितुष्ट नष्ट व्हावे म्हणून उभय जातींच्या साधू संतांनी अंत:करणपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. अद्यापही तसे प्रयत्न होत आहेत हे नाकबूल करता येत नाही.

श्री गुरुचरित्रात सद्गुरूंनी आपल्या यवन भक्तांना दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. असेच भक्त कबीर हे यवन संत प्रभू रामचंद्राचे कट्टर उपासक होते ही गोष्ट सर्वश्रुत अशीच आहे. संत एकनाथ महाराज यांच्या बालपणी त्यांचे गुरु जनार्दनस्वामी यांनी एकनाथांना श्री दत्तात्रयांचे दर्शन देण्यासाठी खुलताबाद जवळील शूलभंजन पर्वतावरील अरण्यात नेले असता त्यांना श्री दत्तात्रयांचे प्रथम दर्शन मलंग वेषातच झाले ही हकिगत एकनाथी भागवत ग्रंथात नमूद केलेली आहे.  अकबर बादशहाने सुद्धा या दोन्ही जमातींच्या धर्मग्रंथामधून चांगल्या निवडक गोष्टींचे एकत्रीकरण करून मदिने इलाही’ या नांवाचा एक धर्म प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तत्कालिन विचारवंतांच्या सहाय्याने व सहकार्याने केला होता. हिंदु-मुसलमानांच्या ऐक्याबद्दल वरील गोष्टीत जशी आपुलकी दिसून येते तशीच आपुलकी सद्गुरु श्री जंगलीमहाराज यांच्याही अवतारकार्यात दिसून येते. म्हणून या दोन्ही जमातींना प्रिय असा जो नाथपंथ तोच त्यांनी स्वीकारला. सांगावयाचे तात्पर्य एवढेच की पीर ही जरी मुसलमानांची गुरूवाचक संज्ञा असली तरी नाथपंथात तशीच परंपरा अद्यापि सुद्धा चालू आहे. 

कोणी म्हणतात जंगलीमहाराज बडोद्याच्या बाजूचे तर कोणी म्हणतात साताऱ्याकडील रेठरे गांवाचे तर कोणी म्हणतात विजापूर नजीकच्या बागलकोटचे. ते नेमके कुठले या वादात पडू नये. त्यांचा जन्म कुठलाही असो, ते अचानक भांबुर्ड्याला आले आणि अलौकिक कार्य करुन समाधिस्त झाले हे सत्य आहे. 

दोन अडीच दिवसांचा सातारा येथील नाथपंथीच्या मुक्काम हलवून झुंड पुढील मुक्कामासाठी निघाली. तेंव्हा झुंडीत अचानकपणे पन्नाशी उलटलेला एक अत्यंत तेजस्वी पुरुष दिसून आला. सर्वांना त्या पुरुषाकडे पाहून आश्चर्य वाटले. कारण एक तर तो पुरुष सातारच्या मुक्कामात कोठेही नव्हता आणि दुसरे म्हणजे साताऱ्याला झुंड येण्यापूर्वीही तो बरोबर कधीही नव्हता.

अचानक आलेला तो पुरुष होताही तसाच अलौकिक. पन्नाशी उलटलेले वय, पण अंगपिंडाने सशक्त, उंचनिंच, देखणा, गोरा, अपूर्व तेजाने चमकणारे डोळे ही तर वैशिष्ट्ये होतीच पण चटकन नजरेत भरणारे वैशिष्ट्य म्हणजे विशाल कान आणि अजानुबाहुत्व. एक अवतारी पुरुष म्हणूनच माझे डोळे त्या अचानक आलेल्या पुरुषाला ओळखू लागले. अंगावरची वेशभूषाही तशीच विचित्र. रामदासी म्हणावा तर रामदासी नव्हे, फकीर बैरागी म्हणावा तर संन्यासीही नव्हे. त्याहूनही आश्चर्यात भर टाकणारी आणखी एक गोष्ट आणि ती म्हणजे त्यांच्या उजव्या पायात असलेला सोन्याचा तोडा राजघराण्याशिवाय पायात सोन्याचे तोडे घालण्याचा अधिकार कुणालाही नसतो. राणी लक्ष्मीबाई हिच्या तांबे घराण्याशी महाराजांच्या घराण्याचा नातेसंबंध होता. झुंडीतील सर्वजण त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहू लागतो. पण कोणीही त्यांच्याशी बोलले मात्र नाही. 

झुंड दीड मैल पुढे गेली. तो अलौकिक पुरुषही झुंडीबरोबरच होता. मग मात्र पात्रदेवतेबरोबर असणाऱ्या पाच योग्यांनी हास्यमुखाने त्यांना आपल्यात सामावून घेतले. नाथपंथाची झुंडीत वागण्याची पद्धति त्यांनी हातोहात आत्मसात करून घेतली. झुंडीचा मुक्काम विश्रांतीसाठी एका डेरेदार वृक्षांखाली पडला असतांना राजे स्वरूपनाथजी यांनी त्यांना समोर बोलावून आम्हा सर्वांसमक्ष त्यांच्या नांवा-गावाची चौकशी केली. प्रथमत: ते काहीही बोलायला तयार नव्हते. पण जेंव्हा खोदून खोदून आपण कोण, काय, कुठले असे प्रश्न विचारले. तेंव्हा मात्र थोड्या फार निरिच्छेने ते जे काही बोलले ते केवळ अपूर्व होते. 

एखाद्या दीक्षाप्राप्त योग्याप्रमाणे राजे स्वरूपनाथजी यांना आदेश करून ते निर्भयपणे म्हणाले, “एखाद्या लहान मुलासारखे पन्नाशी उलटलेल्या मला आपण नावागावाचा प्रश्न विचारता यांचे मला नवल वाटते. करायची काय ती नावागावाची उपाधी? ज्याकरिता परमेश्वराने जन्म दिला ते कार्य तर अजून दूरच आहे. ते कार्य हातून व्हावे म्हणून हा देह आजपर्यंत झिजवला. भारतभर भ्रमण करून निरनिराळे, अनुभव घेतले. या भारतभर केलेल्या भ्रंमतीत अनेक प्रदेश पाहिले. अनेक प्रकारची माणसे पाहिली, त्यांचे आचारविचार, रीतिरिवाज पाहिले, अनेक जाती, अनेक पंथ यांचा अभ्यास केला. त्या भ्रमंतीत विचारवंत तत्त्वज्ञानी भेटले तसे कर्तव्यपराङमुख पाखंडीही भेटले. ध्येयाकरिता अहोरात्र तळमळणारे भेटले तसे धर्मभोळे, अडाणी आणि भोळसटही भेटले. प्रसंगोचित स्वीकारलेल्या अज्ञातवासात अनेक साधू, संत, फकीर, बैरागी यांच्या भेटी होऊन सहवासही लाभला. त्यात खरे सच्छील वृत्तीचे भेटले तसे भोळ्या भाबड्या जनतेला फसवून स्वार्थ साधणारे भेटले. हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन, जैन सर्वांची विचारसरणी अध्ययन करण्याची संधी लाभली. त्या अध्ययनात काही दिवस घालविल्यानंतर विचारांची उकल होण्याऐवजी गोंधळ मात्र वाढला. मतामतांच्या गलबल्याचा गोंगाटच अधिक झाला. एकाग्रतेवर भर देऊन त्या गोंगाटातून निष्कर्षाचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला, पण हवा तो शोध लागला नाही. मनाचा संदेह मिटला नाही. मी कोण आहे? मी कोठून आलो? का आलो? ज्याने मला जन्म देऊन पोसले, जन्माआधी मातेच्या उदरात संरक्षिले त्या परमेश्वराची जवळीक मला लाभेल का? जीवनात तो परमेश्वर भेटल का? आणि भेटला तर कसा भेटेल? कुठे भेटेल? कधी भेटेल? हे सगळे काही समजावून घेण्यासाठीच मी आपणांस शरण आलो आहे.

तो तेजस्वी पुरुष म्हणाला, योगी स्वरूपनाथजी यांच्याबरोबर हिमालयात गेल्यानंतर माझ्या सेवेवर संतुष्ट झाल्यामुळे तेथे मला नाथपंथीय योगदीक्षा मिळाली आणि तेव्हापासून नाथपंथीय या देहाला ‘योगी जागरनाथजी’ ही संज्ञा प्राप्त झाली, हेच जंगली महाराज. त्यावेळी त्या अलौकिक पुरुषाचे डोळे हिऱ्याप्रमाणे चमकले आणि काही वेळा त्यांची अवस्था देहातीत झाली. त्या वेळी तो दिव्य पुरुष महान योग्याच्या अनिर्वाच्य अवस्थेप्रत जाऊन पोहोचला. देहभान विसरून गेला. 

मानेवरून कमरेपर्यंत रुळणारा पिंगट काळसर जटाभार, अर्धोन्मीलित दृष्टी, दणकट आणि सतेच देहयष्टि, कंबरेला फक्त लंगोटी आणि गुडघ्याच्या खाली पोहचतील असे उभय बाहुदंड असे ते स्वरूप आताही माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसते. पण त्यांना ‘योगी जागरनाथजी’ असे नांव दिले गेले. अत्यंत कमी निद्रा ही एक योगातील स्थिती आहे. अत्यंत कमी निद्रेमुळे दिवसच्या दिवस आणि रात्रीच्या रात्री म्हणजे जवळ जवळ सदैव जागृत अवस्थेत धुनीपुढे बसून ध्यानमग्न राहणे ही महान योगसाधना आहे. अशा अवस्थेला पोहोचणारे फारच थोडे असतात. तो तेजस्वी पुरुष त्यापैकीच एक होता आणि म्हणूनच त्याला ‘योगी जागरनाथजी’ असे नांव मिळाले. 

अलाहाबादच्या मुक्कामात ती हकिगत जागरनाथजी यांच्याकडून समजली. आता पुढील योजना काय? या माझ्या प्रश्नाचे उत्तर देतांना जागरनाथजींनी सांगितले की, ‘योगाच्या पुढील अभ्यासासाठी मी काय करावे’ असा प्रश्न मी योगी स्वरूपनाथजींना विचारला असता त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात पुण्यापासून नऊ-दहा मैलांवर आळंदी येथे सद्गुरू ज्ञानेश्वर माउली यांची समाधी आहे तेथे जा. त्यांच्या करवीच आता तुला पुढील योगसाधना प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच त्या आज्ञेप्रमाणे ते इकडे आले. 

श्री ज्ञानेश्वर माउलीकडून योगमुद्रेची कृपा व्हावी म्हणून हिमालयात वास्तव्य करून राहिलेले चोचीस्वामी नावाचे एक योगी जागरनाथजी यांच्याबरोबर इकडे आले होते. त्या उभयतांचा मुक्काम आळंदीत सिद्ध बेटावर कित्येक दिवस होता. तेथे योगावस्थेतील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जागरनाथजींचा निरोप घेऊन चोचीस्वामी हिमालयाकडे निघून गेले आणि कर्नाटक वगैरे भागाची यात्रा करून जागरनाथजी पुन्हा पुण्यात आले. आज ज्या ठिकाणी जंगली महाराज मंदीर आहे हा बराचसा भाग सुधारलेला आहे. पण काही वर्षापूर्वी हा भाग खरोखरच जंगलमय होता. जसे या ठिकाणी बोरी, बाभळी आणि निवडुंग यांचे प्रस्थ होते तशीच उंच उंच डेरेदार झाडे खूप होती. जागरनाथजींनी ही जागा अशासाठी पसंत केली की एक तर लोकवस्तीपासून ही जागा थोडी फार दूर आहे. दुसरे म्हणजे थोडे फार का होईना घनदाट जंगल आणि काट्याकुट्यांनी भरलेले म्हणून वर्जित असे स्थान होते. थोड्याच अंतरावर स्नान जपादि नित्यकर्म करावयास रम्य असा नदीकाठ आहे. ध्यानधारणेला अत्यंत उपयुक्त अशी निवांत एकांताचा लाभ देणारी पांडवलेण्यासारखी गुंफा आहे आणि त्यातल्या त्यात विशेष गोष्ट म्हणजे याच कंटकमय घनदाट जंगल भागातून ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या पालख्या जाण्यायेण्याचा व त्यामुळे साधुसंताच्या सत्संगाचा लाभ मिळण्याची संधी आहे म्हणूनच हा तिवठा किंवा तिकटीवरील थोड्याशा उंचवट्यावरील ही जागा त्यांनी पसंत केली. 

एका सिताफळीच्या झाडाला खाकेतील झोळी अडकवून एका जुनाटशा कांबळीवर ते बसत असत. समोर अखंड धुनी प्रज्वलित असे. प्रातर्विधी आणि स्नान याशिवाय आपली जागा सोडून ते फारसे कोठे जात नसत. श्री रोकडोबा मंदिर आणि टेकडी ही त्यांची आवडती दोन स्थाने होती. त्या तिकटीवरील ती उंचवट्याची जागा ऊर्फ टेकडी श्री जंगलीमहाराज यांनी का पसंत केली ह्या योगी हरिनाथजींनी निवेदन केलेल्या माहितीला पुष्टि देणारा असा एक अनुभव व त्या अनुभवावरून काढलेला निष्कर्ष सांगण्यासारखा आहे.

पुण्याच्या सोमवार पेठेतील बरके आळीत पॉवर हाऊसच्या अलीकडील सारस्वत कॉलनीच्या रस्त्यावर हल्ली मोटारचे जुने पाटे विकले जातात. याठिकाणी पूर्वी बखळीसारख्या रिकाम्या पडीक जागेत एका औदुंबर वृक्षाच्या आसपास टांग्याचे घोडे बांधलेले असत. त्याठिकाणी सियाजीनाथ माळी या नांवाचे एक सश्रद्ध भाविक रहात असत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय टांग्याचाच होता. बऱ्याच वर्षांच्या नित्योपासनेनंतर त्या औदुंबर वृक्षाखाली त्यांना दृष्टांत झाला की याच जागेत एका नाथपंथीय योग्याची समाधि व पादुका आहेत. त्या दृष्टांताप्रमाणे थोड्या परिश्रमानंतर खरोखरीच एक समाधि व पादुका त्यांना सापडल्या. त्या समाधीचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांच्या जीवनात अपूर्व बदल घडून आला आणि ते ‘माळी महाराज’ झाले. 

असाच काहीसा प्रकार जंगलीमहाराज यांच्या बाबतीतही झालेला असावा. माउलीच्या कृपेसाठी नित्य आळंदीला जाणे येणे असल्यामुळे माउलीची कृपा होऊन वरील दृष्टांताप्रमाणे दृष्टांत झालेला असावा. कारण तिकटीवरील उंचवट्याच्या जागेवरही अशीच एक पुरातन समाधि असून ती जंगलीमहाराज यांनी समाधि घेण्यापूर्वीची आहे ही गोष्ट भांबुर्ड्यातील कित्येक जुन्या मंडळींना माहित आहे. इतकेच नव्हे तर या समाधीचा जीर्णोद्धार खुद्द जंगलीमहाराज यांनीच केलेला आहे, असेही कित्येक जुन्या मंडळींचे मत आहे. अशाच प्रकारचा स्पष्ट उल्लेख श्री नारायण बळवंत पुरोहित यांच्या हस्तलिखित वहीत सुद्धा आढळतो. या समाधीवर शिवलिंग आहे ही गोष्ट आजही समक्ष पहावयास मिळते. या समाधीला कुणी कुणी राजबक्ष यांची समाधी म्हणतात. मात्र ही समाधी कुणातरी नाथपंथीय योग्याची असावी असे वाटते. समाधीच्या जीर्णोद्धारानंतर माळी महाराजांच्या जीवनात असा अपूर्व बदल घडून आला तसाच प्रकार या समाधीच्या जीर्णोद्धारानंतर जंगलीमहाराज यांच्याही जीवनात घडलेला असावा. म्हणूनच माउलींच्याकडून दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी हीच जागा पसंत केली असावी. 

उंचवट्यावरील त्या जागेत धुनी प्रज्वलित करून कोणीतरी एक बाबा येऊन राहिला आहे ही गोष्ट हळूहळू भांबुर्डेगांवात राहणाऱ्या काही मंडळींच्या लक्षात आलीच आणि ती गोष्ट खरी आहे असे समजल्यानंतर भांबुर्ड्यामधील अनेक स्त्री-पुरुष मंडळी त्यांच्या दर्शनासाठी जाऊ-येऊ लागली. त्यात श्री बळवंत बाबाजी तांबेकर (सध्याच्या विश्वस्तांचे पूर्वज) व श्री शिरोळे नित्य दर्शनासाठी जात असत. त्यांच्याकरवी किंवा अन्य इतर भक्तांच्या करवी उपजीविकेची तरतूद जागच्या जागी होऊ लागल्यामुळे जागरनाथजीही सहसा कोठे जात नसत. तरी पण संध्याकाळच्या वेळी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुरोधाने जागरनाथजी असे प्रतिपादन करीत की ऐकणारी मंडळी मंत्रमुग्ध होऊन जात. हळूहळू ही नित्य प्रवचनाचीच वेळ होऊन बसली. ही प्रवचने रोकडोबाच्या मंदिरातही होत असत. अधिकार तैसा करु उपदेश अशी त्यांची पद्धती होती. त्यामुळे आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, अशिक्षित-सुशिक्षित आणि जातनिरपेक्षता यामुळे सर्वांच्या अंत:करणात त्यांनी आदराचे स्थान प्राप्त करून घेतले. त्यामुळे त्यांचा भक्तगणही खूप वाढला. 

काही शिष्यांच्या आग्रहावरून ते त्यांच्या घरीही जात असत. श्री बळवंत बाबाजी तांबेकर यांच्या भवानी पेठेतील तंबाखुच्या पेढीवर ते जात असत. त्यांचेकडे त्यावेळी महाराजांनी एक पितळी पेटी व एक गाठोडे प्रसाद म्हणून दिले व त्यांची नित्यनेमाने पूजा करावयास सांगितली. त्याप्रमाणे आजतागायत श्री तांबेकर यांच्याकडे त्या पेटीची व गाठोड्याची नियमित पूजा अर्चा होते. 

अशिक्षित पण काही भाविक मंडळी त्यांना बाबा म्हणत तर काही महाराज म्हणत. जंगलात राहणारा बाबा किंवा महाराज म्हणून त्यांचे नाव जंगलीबाबा किंवा जंगली महाराज असेच पडले. त्यांच्या नावासंबंधी जर कुणी तशी खास चौकशी केलीच तर ते आपले नांव ‘जागरनाथजी’ असेच सांगत. ते नाथपंथीय महान योगी होते ही गोष्ट आजही फारच थोड्या मंडळींना माहित असेल.

गुरूकृपेने नाथपंथीय दीक्षा प्राप्त झाल्यानंतर जागरनाथजींनी सुद्धा आपल्या उजव्या पायातील सोन्याच्या तोड्याचा विनियोग त्याच अर्धकुंभ मेळ्यासाठी जमलेल्या सर्व साधूसंतांना प्रीतिभोजन देण्यासाठी आमच्या समक्ष केला. तेंव्हा ते कृतार्थपणे म्हणाले, मी नव्या नवसाचा मुलगा म्हणून पूर्वजांनी राखून ठेवलेला सोन्याचा तोडा माझ्या आईवडिलांनी माझ्या पायात घातला होता. आज त्याचा सदुपयोग झाल्यामुळे अत्यानंद झाला. मी कृतकृत्य झालो….धन्य झालो. 

विजापूर मुक्कामात शमसुद्दीन काकांच्या वडिलांनी जंगलीमहाराजांची मन:पूर्वक सेवा केली होती. त्या सेवेवर संतुष्ट होऊन महाराजांनी असाध्य रोगावरील काही औषधींची माहिती त्यांना दिली होती तसेच त्यांच्याकडून काही माहिती करून घेतली होती. त्या हकीम पितापुत्रांनी महाराजांची अधिक जिज्ञासेने चौकशी केली असता मी पुण्याला भांबुर्ड्यात जवळजवळ जंगलात राहतो म्हणून मला सर्वजण जंगलीमहाराज म्हणतात. पण नाथपंथीय या देहाला जागरनाथजी अशी संज्ञा असल्याचे त्यांनी सांगितले होते. शमसुद्दीन काकांच्याकडून समजलेली ही अत्यंत विश्वसनीय अशी माहिती आहे. विजापूरात त्यांचा मुक्काम पंधरावीस दिवसापेक्षा जास्त नसावा, कारण पुन्हा एके दिवशी ते भांबुर्ड्यात आपल्या नेहमीच्या जागी सर्वांना दिसून आले. 

शमसुद्दीन काका व त्यांचे वडील या हकीमद्वयांची कीर्ति ऐकून औरंगाबादेतील काही मुसलमान मंडळी औषधोपचारासाठी विजापूरात त्यांच्याकडे गेली असतांना जंगलीमहाराजांनी दिलेली औषधी त्या हकिमांनी त्या मंडळींना दिली. पण आणखी पुण्याला जाऊन महाराजांचे दर्शन करुन येण्याचा सल्लाही दिला. त्याप्रमाणे रोगमुक्त झालेली ती मुसलमान मंडळी पुण्याला आली व त्यांनी जंगलीमहाराज ऊर्फ योगी जागरनाथजी यांचे दर्शनही घेतले. औरंगाबादला परत गेल्यानंतर त्या मंडळींनी त्या पितापुत्र हकीमांना जी पत्रे लिहिली ती उर्दू भाषेत लिहिलेली असून त्या पत्रात आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही पुण्याला जाऊन जंगली महाराज ऊर्फ जागरनाथजी यांचे दर्शन घेऊन पावन झालो असा स्पष्ट उल्लेख केला आहे. 

जंगली म्हणजे काय?

जंगलात राहतात म्हणून जंगलीमहाराज असे नांव ठेवले गेले असे लोक समजतात, पण ते बरोबर नाही. योगामध्ये जांगल नांवाचा एक पंथ असून त्याचे काही विशिष्ट आचार आहेत. त्यात एक आचार असा आहे की या पंथाचे लोक आच्छादन असलेल्या कोणत्याही स्थलात रहात नाहीत. ऊन, वारा, पाऊस ही सहन करुन उघड्यावर राहण्याचा यांचा सांप्रदाय आहे व तो ते अत्यंत कडक रितीने पाळतात. म्हणून या पंथाला प्रतिक्षेची पराकाष्ठा करावी लागते. योगातील या पंथाचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. श्री जगद्गुरू भगवान पूज्यपाद श्री शंकराचार्य महाराज यांनी आपल्या योगतारावली या स्तोत्रात नमस्काररूप मंगल करीत असतांना ‘जांगलिक’ असा उल्लेख केला आहे. तो जांगलिक पंथ हाच आहे. त्याच पंथाचे अनुयायी महाराज होते म्हणून त्यांना प्राकृत भाषेत जंगली असे म्हटले जात होते.

महाराजांची शरीराकृती ही मुळातच दिव्य होती. ते आजानुबाहू होते तसेच योग्याची दिव्य लक्षणे जन्मत: त्यांचे अंगी होती. हिमालयात दुसऱ्या यात्रेच्या निमित्ताने ते हिंडत असतांना त्यांची व श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची भेट झाली. नानासाहेबांनी आपल्या स्वातंत्र्य युद्धाची अंधुक कल्पना श्री महाराजांना दिली होती पण आपण साधू आहोत तेव्हा आपण काय मदत करू शकणार असे महाराज म्हणाले तेंव्हा नानासाहेबांनी आशिर्वाद मागितला. तेव्हा आशिर्वाद देण्याचे माझे सामर्थ्य नाही पण मी आपणास योगाने सहाय्य करीन असे त्यांनी सांगितले.

प्रत्यक्ष युद्धाचा वणवा पेटल्यावर महाराज नानासाहेबांचे सेनापती श्री तात्या टोपे यांना भेटले व त्यांनी सैनिकांना अन्न पुरविण्याचे काम हाती घेतले. आपल्या शिष्याकडून व आपण स्वत: ते अन्नाची रसद सैनिकांना पोहचवीत असत. कित्येक प्रसंग असे आले की तात्यांच्या फौजेचा पराभव होऊन त्यांच्याकडील सर्व सामग्री इंग्रज पक्षीय लोकांनी लुटून नेली तरी दुसरे दिवशी तात्यांचे सैनिकांना अपेक्षित अन्नसामग्री मिळालेली दिसत होती. याचे आश्चर्य इंग्रज पक्षीय लोकांप्रमाणेच तात्यांच्या लोकांना वाटत असे. महाराजांनी स्वत: शस्त्र हातात घेतले नाही. पण अनेक युद्धात ते जातीने अगदी महत्त्वाच्या ठिकाणी उपस्थित असत. त्यामुळे तलवारीचे कितीतरी वार महाराजांच्या अंगावर झाले होते. चार महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना गोळ्या लागल्या होत्या. तीन महिने त्यांनी हे काम पूर्ण केले. त्यानंतर तात्यांना त्यांनी एका विशिष्ट ठिकाणी तू पायांनी चालत जा असे सांगितले. तात्यांचे शरीर थकून गेले होते. तात्यांनी तो आदेश पाळण्याचा प्रयत्न केला. पण तो पूर्णपणे पाळला गेला नाही. म्हणून तात्या इंग्रजांना सापडले. पण तात्यांवरील हे संकट टळावे म्हणून त्यांनी १० तरी तात्यांसारखे लोक निर्माण करून इंग्रजांची खोड मोडली होती. श्रीमंत नानासाहेबांनी तो आदेश पाळल्यामुळे नानासाहेब इंग्रजांच्या हाती कधीच सापडले नाहीत. 

सैनिकांना अन्नपुरवठा करतांना त्यांनी शिधासामग्री कोठून आणली याचा थांगपत्ता कोणालाच लागला नाही. फक्त ते कामात श्री जगद्गुरु श्रीशंकराचार्य महाराज यांचा कनक-धारा  या स्तोत्राचा अहर्निश पाठ करीत असत. यापेक्षा त्यांच्या या उद्योगाची माहिती कोणासही लागली नाही. महाराजांच्या जीवनातील हा मोठा चमत्कार नाना व तात्या या दोघांनाही विस्मयकारक वाटत होता. याची जाणीव नानांनी नेपाळ-नरेशांना करून दिली होती. तेव्हा अशा साधुचे दर्शन व्हावे अशी नेपाळ नरेशांची इच्छा होती. त्यांनी नानांना साधूचा पत्ता विचारला पण नानांना तो नीट सांगता आला नाही. 

श्री क्षेत्र काशी येथील विश्वेश्वर मंदिरात पुण्याच्या साधूने एक सोन्याचा तोडा अर्पण  केला आहे अशी नोंद आहे. हा साधू कोण याचा शोध घेतला असतांना तो श्री जंगलीमहाराज होते असे दिसून येते. या तोड्यासंबंधीतला इतिहास असा आहे की एका साधूसंमेलनात आताचे साधू हे नामधारी असून त्यांचे सामर्थ्य नष्ट झाले आहे. सर्वच लोक ढोंगी आहेत असे विवेचन एकाने केले. त्यावर महाराज म्हणाले साधू ढोंगी नाहीत यासाठी आपणास काय प्रमाण देऊ? त्यावर प्रथम वक्ता म्हणाला ही समोर बाई बसली आहे तिच्या पायात चांदीचे तोडे आहेत ते आपण सोन्याचे करा. त्याबरोबर ठीक आहे असे म्हणून त्या बाईला उभे राहण्यास सांगितले. त्याबरोबर तिच्या पायातील तोडे सोन्याचे झाले. सर्व सभा चकित झाली. 

त्या बाईने त्यातील एक तोडा महाराजांना अर्पण केला. त्यांनी तो काही दिवस वापरलाही व शेवटी विश्वेश्वरास अर्पण केला. महाराजांची ही कीर्ति नेपाळ नरेशांच्या कानावर गेली तेव्हा नाना सांगत होते तो हाच तर साधू पुरुष नाही ना असा त्यांना संशय आला व त्यांनी शोध करण्यास प्रारंभ केला. पण महाराजांची गाठ पडली नाही. तेव्हा नेपाळ नरेशांना फार मोठे दु:ख झाले. एके दिवशी स्वप्नात त्यांना असा आदेश मिळाला की आपल्याकडे अनेक साधु येतात तेव्हा आपण त्यांना फक्त तीन दिवसच आपल्या नगरात राहू द्यावे. तीन दिवसांनी नगराबाहेर घालवून द्यावे. अशांमध्ये जो साधू बाहेर पडतांना आपली पेटलेली धुनी आपल्या वस्त्रात गुंडाळून नेईल तोच नानांनी सांगितलेला साधू असे तुम्ही समजा असे त्यांना सांगितले. अलिकडे नेपाळ नरेशांची साधुवर वक्रदृष्टी झाली असून तेथे साधूंचा अवमान होत आहे असे महाराजांच्या कानावर आले व त्यांनी नेपाळला जाण्याचा निश्चय केला. ते नेपाळला गेले, तेथे उतरले. तीन दिवस झाल्यावर राजाज्ञेप्रमाणे त्यांनी नगरी सोडावी असा आदेश झाला. साधूचे महत्त्व राजाला कळले नाही हे ध्यानात यावे म्हणून महाराजांनी आपली धुनी भरली, ती कापडात बांधली व ते घेऊन निघाले. राजाने आपल्या सेवकांना सूचना देऊनच ठेवली होती. त्यांनी ताबडतोब राजाला हे वृत्त कळविले. नेपाळचा राजा सर्व लव्याजम्यासह महाराजांना सामोरा गेला व महाराजांचे स्वागत केले व आपण आपल्या भेटीसाठी ते सर्व घडविले होते व त्यासाठी झालेला स्वप्नदृष्टांता त्यांनी सांगितला व त्याप्रमाणे गेली तीन वर्षे मी आपली वाट पाहिली. त्याकाळात माझ्याकडून साधूंना जो त्रास झाला त्याची मला क्षमा करा म्हणून विनंती केली. महाराजांचा सत्कार केला व एक रत्नजडित हार महाराजांना अर्पण केला. महाराजांनी आपण साधू आहोत, आपणास हा काय करावयाचा आहे म्हणून प्रसादरूपाने परत केला. तेव्हा नेपाळ नरेशाने प्रार्थना केली की महाराज हा हार आपण कोणत्याही देवाला आमच्यासाठी अर्पण करा त्याप्रमाणे तो हार महाराजांनी पंढरपूरच्या विठोबाला अर्पण केला. 

काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेत त्यांची गोरक्षनाथांबरोबर प्रत्यक्ष भेट झाली व गोरक्षनाथांनी त्यांना असा आदेश दिला की आपल्या संप्रदायांपैकी एक मोठा भाग श्रीज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रात चालवीत आहेत. तेथे त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बसले आहेत तेव्हा त्यांच्या सान्निध्यात आपण आता पुढील वास्तव्य करावे म्हणून महाराजांचे वास्तव्य पुण्यास झाले. 

महाराज योगी होते तसेच ते मंत्रशास्त्रार्थातही निष्णात होते. जांगलिक पंथातील लोकांना विषारी प्राण्याचे विष नष्ट करण्याचे व विष उतरविण्याचे मंत्रज्ञान असते. पण महाराजांनी मंत्रशास्त्राचाही अभ्यास करुन ते शरीरातील योगिनी व शक्ती यांचा संयोग घडविणारे अनेक प्रयोग करू शकत होते. शरीर अतिशय हलके करण्याच्या वेळी ते अदृश्य करणे किंवा अतिशय जड करणे ही क्रिया ते सहज करीत असत. मंत्रशास्त्राचे ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यवर्गाला करून दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिष्यात या परंपरा अद्याप चालू आहेत. 

महाराजांची दिनचर्या

महाराज ब्राह्म मुहुर्तावर उठून आपले शरीर हलके करीत व योगमार्गाने ते काशीस जात असत. तेथे मनकर्णिका घाटावर स्नान करुन गुप्तशिवलिंगाचे दर्शन घेत. भैरवाचेही दर्शन घेत असत. रोज एक बिल्वदल वाहण्याचा त्यांचा नियम होता. येतांना एक निर्माल्यदल ते घेऊन परत येत असत. कलशाचे दर्शन करुन त्र्यंबकेश्वरास जात. तेथे त्र्यंबकेश्वर भगवंताचे व निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन आळंदीला श्रीज्ञानेश्वर महाराज व श्री नरसिंह सरस्वती महाराज येथे अदृश्य रूपानेच राहत असत. त्यानंतर विविध भक्तांच्या उद्धाराचे कार्य ते दिवसभर करीत असत. ही त्यांची दिनचर्या ध्यानात घेतल्यावर महाराज कोण व त्यांचा सांप्रदाय व आचार काय हे सहज ध्यानात येते व त्यांच्या संबंधीच्या सर्व विपरित भावना आपोआप विरून जातात. 

तीर्थयात्रा

नित्यक्रमाप्रमाणे कधी कधी ते दूरदूरच्या तीर्थानाही पुन्हा पुन्हा जाऊन येत असत व त्यासंबंधीच्या गोष्टीही सांगत. विशेषत: गरुड व हनुमंताच्या युद्धाची माहिती ते फार रसभरित अंत:करणाने वर्णन करीत असत. पूर्वी केलेल्या पदयात्रेप्रमाणे ते पुण्यास राहून पुन्हा पुन्हा यात्राही करून येत असत. 

एक गंमतीदार प्रसंग

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात एक प्रसंग असा आला की, महाराज इंग्रज विभागाच्या सैनिकांच्या हाती सापडले. हा विचित्र मनुष्य पाहून त्यांना नैनिताल येथील दाट अरण्यात सोडण्यात आले. कारण त्यांच्यावर तलवारीचे घाव घातले. बंदुकीच्या गोळ्या मारल्या पण शरीरावर काहीच परिणाम होईना. तेव्हा निबिड अरण्यात सोडण्यावाचून दुसरा उपाय नाही म्हणून असे करण्यात आले. पण त्याच वेळी महाराजांना अश्वत्थाम्याचे दर्शन झाले व त्यांनी महाराजांना मार्गदर्शन केले. नेपाळ यात्रेच्या वेळी त्यांना हनुमंत व परशुराम यांचे दर्शन झाले. परशुरामांनी महाराजांना श्रीविद्येचा उपदेश केला आणि सिद्ध श्रीविद्यापासनेप्रमाणे ते ध्यानस्थ बसले असतांना त्यांच्या मस्तकावर स्पष्ट गुरूपादुका दिसत असत व भक्तिमार्गाची दीक्षा त्यांना प्रत्यक्ष हनुमंतांनी दिली होती. त्यामुळे योगविद्या, श्रीविद्या व भक्तिविद्येचे ते सिद्ध आचार्य होते व त्यांचा प्रचार त्यांनी जन्मभर केला. त्यांचे योगी शिष्य ह्र्षिकेश येथे होते व श्रीजंगलीमहाराजांना आपले गुरू मानीत असत. महाराजांच्या समाधीनंतर त्यातील काही योगी पुण्यास येऊन गेले होते.

एकाच वेळी विविध ठिकाणी त्याच देहाने दर्शन देणे हा जो एक योगप्रकार आहे त्याची ही प्रचिती श्रीजंगलीमहाराज यांच्यासंबंधी आलेली होती. कारण ते एका देहाने पुण्यास दिसत त्याच वेळी त्यांच्या कृष्णाकाठीही वास होत असे. 

श्रीमहाराज एकदा कृष्णाकाठी फिरत असतांना कुरूगड्डीला गेले होते. येथे श्रीपाद वल्लभांची समाधि असून बेटासारखे होऊन कृष्णेचे दोन प्रवाह झाले आहेत. तेव्हा कृष्णेचा प्रवाह ओलांडल्याशिवाय समाधीच्या दर्शनाला जाता येत नाही. येथे बाजांना भोपळा लावून बाजेवरुन नदीपार करण्याची पद्धत आहे. दुर्दैवाने ज्या दिवशी नावाड्याच्या बाजेचे भोपळे फुटले होते तेव्हा पलिकडे कसे जावे हा प्रश्न निर्माण झाला. महाराजांनी नावाड्यांना बाज प्रवाहात टाकावयास सांगितले पण नावाडी तयार होईना. तेव्हा महाराजांनी आपल्या हाताने बाज उचलून पाण्यात टाकली. बाज प्रवाहाबरोबर वाहू लागली तेव्हा नावाडी फार दु:खित झाले. हे पाहून महाराजांनी पाण्यात उडी घेतली व बाज आणली व नावाड्यांना त्यात बसावयास सांगितले. भोपळ्यावाचून बाज कशी तरंगणार याची चिंता नावाड्यांना होती. पण महाराजांनी आपला हात लावला व बाज तरंगू लागली.  अशाच स्थितीत दुसऱ्या काठाला नाव गेली. आता पुन्हा परत कसे जावयाचे हा प्रश्न नावाड्यांपुढे होता. महाराजांनी कमंडलुमधील पाणी शिंपडले व बाज परत घेऊन जा असे सांगितले व ते कार्य पूर्ण झाले. 

कुरगड्डी येथे विंचू व साप यांचा फार उपद्रव होता. महाराज तेथे गेले त्या दिवशी पुजाऱ्याच्या भाच्याला विंचू चावला व तो फार विव्हळत होता. महाराजांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्याच्या वेदना नाहीशा झाल्या. महाराजांनी मी येथे असेपर्यंत कोणत्याही सापाने किंवा विंचवाने कोणास दंश करू नये अशी आज्ञा केली व त्याचप्रमाणे महाराज तेथे असेपर्यंत कोणासही दंश झाला नाही. या आज्ञेवरून महाराजांचे सामर्थ्य सर्वांच्या ध्यानात आले. कन्यागतामध्ये कृष्णेला महत्त्व येते. त्या वेळी साधुंच्या स्नानासाठी कृष्णा नदीच्या तीरावर महाराजांनी पुष्कळ सोयी केल्या आहेत. नरसोबाच्या वाडीला महाराज आरतीच्या वेळी अनेक वेळा प्रकट होत व अदृश्यही होत याची प्रचिती बऱ्याच जणांना आली आहे.

हे एक अत्यंत पवित्र व जागृत असे अध्यात्म केंद्र आहे. त्याच बरोबर ते सहज सुलभ पुण्यनगरीत मध्यवर्ती ठिकाणी आहे. प्रत्येक भक्तगणांनी येथे जाऊन नतमस्तक व्हावे व श्रींचा कृपाशिर्वाद घ्यावा.

जंगली महाराजांची आवडती स्थाने

श्री क्षेत्र नरसोबाची वाडी व श्री क्षेत्र गाणगापूर ही दोन श्री सद्गुरू जंगली महाराजांची अत्यंत आवडती ठिकाणे. महाराजांचे गुरु श्री स्वमी समर्थ हे श्री नृसिंहसरस्वती महाराजांचे अवतार. श्री नृसिंहसरस्वतींचा पूर्ण कृपाशीर्वाद महाराजांना लभलेला होता.

नरसोबची वाडीत नृसिंहसरस्वती महाराज चे वास्तव्य एक तपाहून अधिक झालेले होते. त्यांच्या तपाने पवित्र झालेल्या तपोभूमीचे व नृसिंहसरस्वतीनी केलेल्या चमत्कारचे महाराजांना विलक्षण आकर्षण असायचे.

गाणगापूर येथे संगमावर महाराज दिवस न दिवस अनुष्ठानात घालवित असत. अत्यंत बारकाईने पहिल्यास श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या जीवनाचा संपूर्ण पगडा श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या जीवनात आढळून येते. ब्राम्ह मुहूर्तावर उठणे, स्नान शुचिता, सूर्यादयापासून मध्यान्ही पर्यत अनुष्ठान, दुपारी मधुकरी मागणे, विश्रांती, चर्चा, उपदेश, भक्तांच्या अडचणी सोडविणे, तीन वेळा आरती, मृतदेह उठविणे, एकाचवेळी अनेक रुपे धारण करणे, विविध चमत्कार करणे, धातुचे सोने करणे, अडलेल्या भक्तांना साधकांना तीर्थयात्रे च्या निमित्ताने मार्ग दाखविणे, नामवंत सिद्ध तयार करणे, अनेक ठिकाणी वास्तव्य करुन तेथे जणू तीर्थ क्षेत्रच करणे, समाधीला पुष्पांच्या विमान आसनातून जाणे या व असे अनेक प्रसंग समान वरशाची अनुभूती देवून जातात.

वाडीला महाराज आरतीच्या वेळी अनेक वेळा प्रकट होत व अदृश्यही होत याची प्रचिती ही बऱ्याच जणांना आली. तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे श्री नृसिंहसरस्वतीस्वामी यांच्या आरती वेळी श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या प्रेरणेने केलेले श्री गुरुदेवदत्तावरील भजन (पद) आजही म्हणतात. श्री दत्त भजनमाला व करुणा त्रिपदी या आरती संग्रहात सदरचे भजन (पद) आढळते.

श्री सद्गुरू जंगली महाराज, महासमाधी सोहळा!

शुक्रवार ४ एप्रिल १८९० चैत्र शुद्ध चतुर्दशी रोजी सायंकाळी ५•३० वाजले होते. महाराजांनी अष्टांगयोग धरणेच्या साधनेत डोळे मिटून अत्यंत गहन ध्यान लावले आणि नाडी बंद झाली. महाराज समाधिस्थ झाल्याच्या तारा सगळीकडे पाठवण्यात आल्या ही वार्ता सर्वत्र वाऱ्या सारखी पसरली हजारो भाविक आपल्या या साक्षात्कारि आजानुबाहु संताच्या अखेरच्या दर्शनासाठी येऊ लागले पुष्पांचा खच पडला. पुष्पहारांना आणखीनच टवतवी येऊ लागली. गुलाल, बुक्का हजारोच्या मुठीनी उधळला जावू लागला. "श्री सद्गुरू जंगली महाराज की जय" अशा जायघोषांनी दिशा निनादून गेल्या. भांबुर्ड्यातला प्रत्येक जण पोरका होऊन म्लान मुख करून महाराजांकडे पाहत होता. 

भावी तयारीसाठी आम जनते कडून सुवासिक वस्तुंचा, अंबीर, बुक्का कापुर वगैरे वस्तुंचा पाऊस पडू लागला. एक सुंदर असे भव्य पुष्पांकित विमान तयार करण्यात आले. टेकडी वरील समाधीची जागा महाराजांनी पूर्वीच शिष्य मंडळाना दाखवून ठेवली होती. सायंकाळ पासून लोकांनी दर्शन घेता घेता दूसरा दिवस उगवला. त्या नंतर तयार केलेल्या विमनातून समाधी कडे नेण्यासाठी महाराजांची स्वारी मठातून बाहेर पडली. पुष्कळ भजनाच्या दिंडया कर्तव्यकर्मात निमग्न होत्या. पुष्कळ मिस्लिम बांधव पवित्र कुराण वाचत होते. पाऊल ठेवण्यास रस्ता कोणास मिळेना. इतकी गर्दी झाली असून कुणी लोक सोन्या-रुप्याची फुले, कोणी चवल्या पवल्या, खारीक खोबरे असे उडवीत होते. भजनाच्या दिंडया व कुराण वाचन एकाचवेळी चालू होते. विमानासा सर्व जातीचे लोक खांदा देत होते. पुष्पांचे सडे पडत होते. मठातून समाधी टेकडी जवळ असता पोचण्यास ५-६ तास लागले. हिन्दू-मुस्लिम धार्मिक विधी व भजन, पठण आशा रितीने शिष्यानी महाराजांना गुहेत जड अंत:कारणाने ठेवले. प्रकाश झोत इतके तळपत होते की, रात्र का दिवस हेही कळत नव्हते. गुहेत आच्छादना साठी ८ पल्ले अंबीर, ४ पल्ले कपूर चारी बाजूस दाटीने अंथरण्यात आले. समोर पोथी ठेवली. दोन्ही बाजूस समया लावून ठेवण्यात अल्या. "श्री सद्गुरू जंगली महाराज की जय" असा जयघोषणा करून व आरती करून शिष्य मंडळी गुहेच्या बाहेर आली. त्या नंतर गुहेचे दार बंद करण्यात आले. महाराज निजानंद निमग्न झाले.

चैत्र शुद्ध चतुर्दशी हा महाराजांचा समधीचा दिवस. महाराज समाधिस्थ झाले त्या वेळी विमानपुष्पातून महाराज राहत असलेले मठ (रोकडोबा मंदिर) येथून टेकडी पर्यत नेहण्यात आले. आजही या दिवशी रात्री ८-९ वाजता महाराजांच्या रोकडोबा मंदिरात असलेल्या गादी मंदिरातील पादुका पालखीत ठेवून पालखी सोहळा काढण्यात येतो. महाराजांनी चालू केलेले भजन आज महाराजांच्या नावाने श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ हे मोठ्या श्रद्धेने, भावयुक्त अंत: कारणाने भजन करीत असतात. सोहळा हळूहळू पुढे सरकत असतो. पुणे व सबंध महाराष्ट्रातील भक्तजन या सोहळ्याला उपस्तिथी लावतता. सोहळा भजन करीत करीत समाधी मंदिरात साधारणता मध्य रात्री १-२ च्या सुमारास येतो. पालखीत असणाऱ्या महाराजांचे वस्त्र गलफ शाल, संदल, पुष्पांची जाळी, हार बुक्का, अंबीर या सर्व पूजा साहित्य ने महाराजांची षोडषोपचार पूजा करण्यात येते. यावेळी प्रचंड मोठे भजन चालू असते. भजनातून महाराजांनी रचलेली पदे, संवाद, फकिरके सवाल, अनेक प्रकार अत्यंत भारदस्त भजने होतात. पहणाऱ्यांचे व ऐकणाऱ्यांच्या कानाडोळ्याचे पारणेच फिटून गेल्याशिवाय राहत नाही. त्या नंतर पहाटे ५ सुमारास आरती होऊन पालखी पुन्हा रोकडोबा मंदिरात येते. ही प्रथा तेव्हा पासून आजतागायत गावातील भजनी मंडळ, भक्तमंडळीनी चालू ठेवली व या पुढेही ती तशीच राहील.

मातोश्री निजानंद स्वरुपी
मातोश्री निजानंद स्वरूपी रखमाबाई गाडगीळ (आई साहेब)

श्री सद्गुरु जंगली महाराजांच्या मुख्य शिष्या मातोश्री निजानंद स्वरूपी रखमाबाई गाडगीळ (आई साहेब)

समाधी काल-शके माघ वाद्य षष्ठी १८२४ सन १७ फेब्रुवारी १९०३

कुरुंडवाडच्या राजदरबारी ख्यातनाम असणारे श्रीमंत विष्णुभट गाडगीळ यांचे चिरंजीव रामचंद्र यांच्या रखमाबाई गाडगीळ (आई साहेब) त्या पत्नी होत्या. लग्न झाल्या वर गर्भवती असतानाच त्यांच्या पतीचे देहांत झाले. पतीच्या निधना नंतर त्यांना मुलगा झाला जंगली महाराजांच्या दर्शनाला त्या दोन तीन वर्षाच्या धोंडो या त्यांच्या मुलाना घेऊन जात असत महाराजांच्या पुढे उभे राहताच अष्टसात्विक भाव उमलुन येत व कृतज्ञतेने हात जोडून पायी मस्तक लीन होत असे. एके दिवशी दर्शनाला आल्या असताना त्यंचा मुलगा धोंडो हात सोडून नदीच्या घाटावार गेला व घसरून नदीत पडला व मृत्यू पावला. महाराज लोकांच्या समाराधनेत गर्क होते. त्या वेळी रखमाबाई आपल्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन महाराजान कडे आल्या व ओक्साबोक्शी रडू लागल्या, महाराज त्यांना सांगत होते रडू नकोस! माझे गुरु तुझे रक्षण करतील! महाराज अंतरज्ञानी होते. महाराजांनी डोळे मिटून गुरुचे स्मरण केले श्री दत्त गुरुना प्रर्थाना केली. मग पुटपुटून अंगावर तीर्थ शिंपडले. धोंडो जागा झाला आई कडे धावत जाऊन मिठी मारली. आईला रडू आवरत नव्हते. समोरील जनताही स्फुंदत होती. सर्वान समोर घडलेला तो चमत्कार! रखमाबाई नी महाराजांचे चरण घट्ट धरले व म्हणाल्या 'महाराज आता हे चरण मी कधी सोडणार नही, माला आपल्या बरोबर घेऊन चला. आजन्म मी आपल्या चरणसेवेशी रहीन'. ईशीत सिद्धिच्या जोरावर महाराजांनी ओळखले होते की याच स्त्री पुढे आपल्या पट्टशिष्य होणार. 

महाराज रखमाबाईना आई म्हणून हाक मारू लागले. जन्म जन्मांतरीची तयारी पाहून पूर्णत्वाला नेण्याचा निश्चय केला. सुमारे बारा वर्षा पर्यन्त अनेक साधनांती उपदेश करून न कळत त्यांना साधन चतुष्टय संपन्न बनविले व आपुले समान करून टाकले. महाराजांची आई सहेबांनी खूपच एक निष्ठेने व मनोभावी सेवा केली होती. महाराज त्यांच्या वर खूप प्रसन्न होते. महाराजांनी त्यांची सर्व मालकी, समानसुमान व देखभालीचे अधिकार आईसहेबांना दिले. माघ वाद्य षष्ठी शके १८२४, फेब्रुवारी सन १९०३ रोजी आईसहेबांनी आपला देह ठेवला.

जंगलीमहाराज मंदिर कसं निर्माण झालं

अक्कलकोट गुलबर्गा रोडवर अक्कलकोट पासून ७-८ किलोमीटरवर होनमुर्गी नावाचं एक गाव आहे. तिथे अल्लाबक्श हा मांत्रिक व जंगलिशा अहमदशा हा त्याचा चेला लोकांची काही किरकोळ कामे करून त्यावर गुजराण करीत असत. स्वामी समर्थ जसे अक्कलकोटात आले तसा यांचा धंदाच हळूहळू बसला. आता काय करायचं ? गुजराण कशी करायची ? या स्वामीचा काटा काढल्याशिवाय धंदा सुरळीत बसणारा नाही म्हणून जारणमारणाचा मंत्र टाकून अल्लबक्षने जंगलिशाची मूठ वळवून घट्ट केली व इस स्वामी का काम तमाम कर देते है अब असं म्हणत ती कापडात बांधलेली हाताची घट्ट मूठ घेऊन जंगलिशा तडक अक्कलकोटात आला. वो स्वामी कहाँ है असं विचारत चोळाप्पाच्या घरी स्वामी आहेत असं कळल्यावर तिथं आला. स्वामी अंथरूणावर पहुडले होते ते पाहून जंगलिशाने कापड सोडवून मूठ स्वामींचे दिशेने मारली तो काय ? वीज चमकावी तसं स्वामींनी जंगलिशाकडे क्षणभर चमकून पाहिलं व परत निवांत पडले. मूठ जंगलिशावरच उलटली. त्याला जागचा हलता येईना की पापणी हलवता येईना की थुंकी गिळता येईना. अर्घा तास तसाच गेल्यावर जंगलिशा भयंकर घाबरला. त्यानं मनातल्या मनात स्वामीची माफी मागितली व म्हणाला, स्वामी मेरेकू बचाव. स्वामींना ते अंतर्द्न्यानाने कळलं. स्वामींनी त्याला मनातच उत्तर दिलं मैने कुछ नही किया. ये तो दत्तमहाराज की किमया है. मग जवळची चिमूटभर माती घेऊन त्याचे दिशेने फेकताच जंगलिशा मोकळा झाला. पुढे जवळपास वर्षभर स्वामींची दिवसरात्र स्वामींची मनोभावे सेवा केली. एक दिवस पहाटे जवळ बोलावून स्वामींनी डोक्यावर वरदहस्त ठेवला तसा जंगलिशा देहभान विसरला व संपूर्ण अवस्थेत आला. स्वामींची आज्ञा घेऊन तिथून निघाला व अल्लाबक्षला भेटला. त्याला काही उपदेश केला. आता दोघांना जादूटोण्याची गरजच उरली नव्हती. 

जंगलिशा तिथून निघाला तो फिरत फिरत सांगलित नदीकिनारी येऊन बसला. तिथे घाटावर जवळच एक रखमाबाई गाडगीळ नामक विधवा बाई कपडे धुत होती व तिचा एकुलता एक मुलगा छोटा मुलगा वरखाली वरखाली धावत खेळत होता. खेळता खेळता एका उंच ठिकाणावरून तो खाली पडला व जागीच गतप्राण झाला. हे पाहून रखमाबाईचा धीर सुटला व तिनं हंबरडा फोडला. जवळपासच्या बायकापुरूषांनी तिची पुष्कळ समजूत घातली पण व्यर्थ. मग एकजण म्हणाला की तिथे कोणी अवलियासदृष्य मनुष्य बसलाय त्याकडं जा. हो नाही करता करता लेकराचं कलेवर घेऊन ती माय जंगलिशासमोर आली. हे जग नश्वर आहे त्याचा पाश तोड असं पुष्कळ तत्वज्ञान ऐकवलं पण रखमामाय ऐकेना. मला मुलगा देत असाल तर द्या तत्वज्ञान नको असं म्हणाली. 

जंगलिशाने स्वामींचे स्मरण करून मुलाला उठायची आज्ञा करताच झोपेतून उठल्यागत उठून बसला व भूक लागली म्हणाला. जवळपासच्या लोकांनी जयजयकार केला. रखमा म्हणाली मला आता संसार नको. सेवा करायची आहे. जंगलिशा तिला म्हणाले आता मुलगा जिवंत झालाय. आता त्याचं सर्व कर, मग मी येईन. ही बातमी लगेच राजवाड्यावर पटवर्धनांचे कानी गेली तसे राजेसाहेब स्वतः अदबीनं घाटावर येऊन जंगलिशाची वाड्यावर मुक्कामी यावं म्हणून विनवणी करू लागले. तसं काही दिवस पटवर्धनांचे वाड्यावर काही दिवस मुक्काम केल्यावर आशीर्वाद देऊन स्वारी सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक गावी आली. तिथे काही दिवस राहिल्यावर एकाजणाचा खून झाल्यावर उदास होऊन ते गाव सोडले व पुणे पलिकडील नदीतीरी भांबुर्डा गावठाणात येऊन राहिले. रोकडोबाचे नंदिरात मागे बसत असत. 

पुढे या रखमाबाई गाडगीळही तेथे आल्या. त्या ज्ञानेश्वरीवर रोकडोबा मंदिरात उत्तम प्रवचन करीत असत. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यांचे अंगाखांद्यावर येऊन बसत असत. रोकडोबाचे समोरील राम मंदिर रखमाबाई गाडगीळांनी वर्गणी व कर्ज घेऊन बांधले. आजही प्रदक्षिणा मार्गावर डावीकडे दत्ता पाध्येचे घरासमोर या रखमाबाईंची व त्यांच्या सेवेकरीणीची समाधी आहे. जंगली महाराजांनी गावठाणातील अजाबलीची प्रथा बंद केली. दारूच्या नशेत बुडालेल्या गावाला त्यातून बाहेर काढले व देहूहून भजनीमंडळाला बोलावून जंगलिमहाराज भजनी मंडळाची स्थापना केली. गाव सुधारलं. दुपारी गावात भिक्षा मागत असताना फक्त शिरोळेंच्या गृहिणी न चुकता भिक्षा घालत. 

एकदा शिरोळेंच्या बाजूचे दोन वाजे आगीत भस्म झाले व ज्वाळा वाड्याच्या दिशेनं पसरल्या तसे महाराज समोर बसून सोटा आपटत राहिले. शिरोळ्यांच्या वाड्याचा वासाही काळा झाला नाही. पुढे राममंदिरावरचे कर्ज शिरोळ्यांनी सोडवले. तशी शिरोळे घराण्यावर महाराजांचा वरदहस्त कायम राहिला. तो आजही आहे. 

१८९० मध्ये महाराजांनी देह ठेवल्यावर हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण झालं. हिंदू म्हणाले अंत्यविधी हिंदू पध्दतीने तर मुस्लिम म्हणाले त्यांच्या पध्दतीने. यावर परत देहात प्रवेश करून उठून बसले. म्हणाले सर्व विधी हिंदू पध्दतीने व चौथरयाचा दगड मुस्लिम पध्दतीने व परत झोपले. त्याप्रमाणे सर्व करण्यात आले. ही बातमी त्यावेळच्या केसरीत आली होती. शिरोळ्यांपैकी एकांनी १९२१ मध्ये महाराजांना पहायचं म्हणून दगड बाजूला सारला तर देह आतच ठेवलाय असा होता. मग पूजा प्रार्थना केल्यावर डोळे उघडले आशीर्वाद दिला व परत कोणीही कधीच दगड हलवायचा नाही ही आज्ञा दिली. पुढे मंदिर बांधताना पाया मिळेना तसे शिरोळ्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले पाया मिळणार नाही कारण ही नैसर्गिक टेकडी नाही तर बाजूची लेणी कोरताना जो दगडभुसा निघाला त्यानी बनलिय म्हणून साधं बांबूच्या बांधणीचं मंदिर बांधायला सांगितलं. ते आजतागायत तसंच आहे. असो.