श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे (श्री वासुदेवानंत सरस्वती स्वामी महाराज)

श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे
श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे

जन्म: १४ नोव्हेंबर १८८३
आई/वडील: लक्ष्मीबाई/नारायणराव
संन्यासानंतरचे नाव: श्री सद्गुरू वासुदेवानंत सरस्वती महाराज
संप्रदाय: स्वरूप संप्रदाय
कार्यकाळ: १८८३ -
गुरू: प. पू. रामानंद बिडकर महाराज

प. पू. बाबामहाराजांचा जन्म एका धार्मिक व संस्कार संपन्न कुटुंबात १४ नोव्हेंबर १८८३मध्ये कर्नाटकातील हुबळीत झाला. त्यांचे रामचंद्र नावाने नामकरण झाले. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनीअरींगला प्रवेश घेतला. इंजिनीअरींगची पदवी (LCE) घेतल्यानंतर त्यांनी PHD १९०९मध्ये नोकरी घेतली. त्यांना कामानिमित्त पेण, महाड, रत्नागिरी, पनवेल, नागोठणे येथे बदल्या झाल्या. १९२३ला ते मुख्य स्थापत्य विषारदाचे PA म्हणून लागले.

इ.स. १९०६मध्ये प. पू. बिडकर महाराजांकडून त्यांना शक्तिपात दिक्षेचे कृपादान मिळाले आणि त्यांचे जीवनच अंतर्बाह्य बदलले. त्यांची विचाराची दिशा बदलली. दिक्षादानानंतर महाराज विदेही स्थितीतच राहू लागले.

घरच्या लोकांच्या दबावाकारण श्रीबाबांनी विवाह केला. पण त्यांची संसारात संपूर्ण विरक्ती होती. बऱ्याच वेळा सरकारी नोकरी असतानाही बाबांच्या पत्नीस स्वयंपाकास लाकडासही पैसे नसत. ते पूर्णतया विरक्त होते. एकदा पगार झाला व घरी जाण्यास निघाले. ऑफिसच्या बाहेर एक भिकाऱ्याला पाहून पगाराचे पाकिटच त्याला देऊन खाली हाताने घरी आले. खरे पाहता नोकरीत त्यांच्या ज्ञानास व सत्प्रवृत्तीस दादच मिळे. अखेर १९२८मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व धुमाळ बिल्डिंग नारायण पेठ, पुणें  येथे येऊन राहिले. त्यांचे गुरु श्री बीडकर महाराजांचा मठ शनवारात जवळच होता. येथे वास्तव्यास आल्यानंतर बाबामहाराज दिवसातून किमान ३ वेळा श्री बिडकर महाराजाच्या समाधी मठात जात असत. त्यांनी आपली तपस्या आणखीन कठीण केली. प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी ध्यानधारणा व उपासना चालूच ठेवली. एके प्रसंगी अंगात १०५ ताप असतानाही ही उपासना पूर्णत्वास नेली. सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केवळ उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे एकटक पहाण्याची उपासना त्यांनी २१ दिवस केली. आपले सर्व आयुष्य त्यांनी गुरुचरणी अर्पण केले कारण या विश्र्वाचे आधिपती करते सवरते हे सर्व आपले गुरूच आहेत अशी ठाम धारणा होती.

इ. स. १९४५मध्ये त्यांची पत्नी निवर्तली. मग त्यांचे जेवण बाहेरून येऊ लागले. काही वेळास भक्तही आणून देत. बऱ्याच वेळा ते अन्न असेच पडून दिसे. काहीवेळेस ते त्यातील पुन्हा थोडेसे खात व बाकीचे भक्तांना वाटून देत. पण त्याहीवेळी भक्तांना ते अत्यंत ताजे लागे. भक्तवर्गात याबाबत नेहमी चर्चा होई. जे भगवत्प्रेमात गुंतले त्यांचा योगक्षेम भगवंत चालवतो हेच खरे. त्याच्याकडे अनेक भक्तजन संसारीक आध्यात्मिक समस्या घेऊन येत असत. अनेकांना मार्गदर्शन करून त्यांनी चिंतामूक्त केले. परमार्थातील मुमुक्षांना मोक्षाचा मार्ग दाखविला. अनेक भक्तांच्या त्यांच्या मार्गदर्शनाने उद्धार झाला. ते भक्तांना सांगत आकाशाकडे पहा, ताऱ्यांकडे पहा व साधनेत रत रहा. जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत ध्यानमग्न रहा. मला पुनश्र्च सत्ययुग आणायचे आहे.

प. पू. बाबा महाराजांचे अनेक सत्पुरूष सन्मान देत त्यात मुख्यत्वे करून शंकरमहाराज, मेहरबाबा, योगी अरविंद सद्गुरू लेले महाराज हे सत्पुरूष होते. १९५३मध्ये बाबा महाराजांनी श्री. विष्णु गणेश जोशी यांच्यावर अनुग्रह केला. पुढे ते दिगंबरदास नावानेच प्रसिद्धीस आले. त्यांनाच सद्गुरूंनी स्वरूप संप्रदायाच्या प्रचाराची धूरा सोपवली.

इ. स. १९५४ साली त्यांनी आपला देह पुणे येथे निर्गुण परब्रह्मात विलीन केला. त्यांची समाधी चतुश्रुगी रस्त्यावर जाताना श्री. प. पू. बाबामहाराज समाधी मठ या नावाने आहे. तो परिसर त्यांनी अत्यंत पवित्र आणि धार्मिक असा जपला आहे. तेथेच एक मोठी वेद पाठशाळा ही आहे. सातत्याने या वास्तुत अनेक अनुष्ठाने, पाठ उपासना चालूच असते. पुण्यनगरीतील हे धार्मिक व अध्यात्मिक केंद्रच आहे. पवित्रता हाच येथील केंद्रबिंदू आहे.

महाराजांनी भक्तांना अभिवचन दिलेली १००० वर्षेपर्यंत या समाधी मंदिरात राहून भक्तजनांच्या कामना पूर्ण करतील.

गुरुपरंपरा

श्री स्वामी समर्थ
    ।
श्री रामानंद  बिडकर
    ।
श्री वासुदेवानंत सरस्वती महाराज (बाबा महाराज सहस्त्रबुद्धे)

|| अनंतावधी जाहले अवतार || || परी श्री गुरुदत्त सर्वांत थोर || || त्वरें कामना कामिकां पूर्णहारी || || तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||८|| 
|| श्री दत्तस्तुती ||