नाव: श्री शंकर नारायण साटम
जन्म: मालवण तालुका बांदिवडे, १८७२ ते १८७७ दरम्यान
माता / पिता: लक्ष्मीबाई / नारायण
गुरू: बाबा अब्दुल रहमान
महाराष्ट्रात अनेक नामवंत सत्पुरुष झाले. दाणोलीचे सदगुरु श्रीसमर्थ साटम महाराज हे त्यापैकीच एक होत! समर्थ म्हणजे साक्षात परमात्मा, अव्यक्त ईश्र्वराचे व्यक्त स्वरूप. "अशक्य ते शक्य केले । म्हणूनी जने विश्र्वासले। अपारची प्रेम केले। ईश्र्वररूप मानुनीया।'' असा त्यांचा महिमा! सदगुरु श्री समर्थ साटम महाराज पंचमहाभूतावर अमर्याद सत्ता असणारे व रिद्धी-सिद्धींवर नियंत्रण असणारे असे थोर योगी.
समर्थांचे नांव शंकर नारायण साटम, त्यांचा जन्म मालवण तालुक्यातील बांदिवडे या गावाशेजारील मसुरे-कोहीळ गावी झाला. समाधीपूर्वी त्यांचे वय ६०-६५ वर्षांचे असावे असे त्यांच्या शरीरयष्टीवरून वाटे. त्यांचे जन्म साल १८७२ ते ७७ चे दरम्यान होते. महाराजांचे आई वडिलांचे नांव लक्ष्मी नारायण होते. नावाप्रमाणेच ती दोघे साक्षात लक्ष्मी नारायणासारखी होती. शिवाच्या साक्षात्काराने लक्ष्मीबाईंना हे द्वितीय पुत्र झाले म्हणून माता पित्यांनी त्यांचे नांव शंकर ठेवले. मूल दोनचार वर्षांचे झाल्यावर आईबाप पोटापाण्यासाठी मुंबईस जाऊन राहिले. पुढे मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्याचे लग्न करुन दिले. महाराजांच्या पत्नीचे नांव काशीबाई; तिला माहेरी जनाबाई म्हणत. महाराजांचे मन संसारात रमले नाही. ते हुडपणे वागू लागले. त्याचा परिणाम मातापित्यांवर होऊन ती दोघे मनाने खचली आणि निधन पावली. मुंबईत प्लेगची साथ सुरू झाली त्यात त्यांचा भाऊ आणि भावजय गेली. आधीच संसारातून त्यांचे लक्ष उडाले होते. त्यातून आईवडिल आणि वडिलधारी माणसे गेल्याने ते अगदीच उदासीन झाले. कशातच लक्ष लागेना ज्यामुळे त्यांची बायको त्यांना सोडून माहेरी गेली ती पुन्हा आलीच नाही. त्यांची पूर्ण निराशा झाली, त्यांच्याजवळ त्यांचे माणूस कोणीही उरले नाही. हे असे का झाले, का होते आहे, इतका मी हतबल का? माझ्या पाठीशी प्रारब्ध इतके हात धुवून का लागले आहे? याचे उत्तर त्यांना मिळेना! आपण नि:ष्पाप असुनही आपणांस कोणीच कसे समजून घेत नाही, अगदी देव सुद्धा. याचे त्यांना आश्र्चर्य वाटले. सत्याचा आणि वस्तुस्थितीचा कोंडमारा झाला होता. जगात ईश्र्वर आहे की नाही या विचाराने त्यांचे डोके सुन्न झाले. अशा विमनस्क मन:स्थितीत ते इकडे तिकडे भटकू लागले. एवढ्यात त्यांची गाठ बाबा अब्दुल रहमान या नाथपंथी सिद्ध पुरुषाशी पडली. अब्दुल रहमान हे मुस्लिम मोहल्यात वस्तीला होते. लोक त्यांना वरील नावाने ओळखत परंतु त्यांचे खरे नांव जात-पात, धर्म याची कोणालाच काही माहिती नव्हती.
श्री सदगुरु समर्थ साटम महाराज त्यांच्या सहवासात येताच "परिसाच्या संगे लोह बिघडला। लोह बिघडला। सुवर्णाची झाला' अशी महाराजांची स्थिती झाली. बाबाने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला व त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत केली. त्या दिव्य स्पर्शाने त्यांना विदेहावस्था प्राप्त झाली. या स्थितीत ते मुंबईबाहेर पडले, भ्रमंती सुरू झाली. अन्न, वस्त्र, निवारा यांचे भान हरपले. त्यांना इंद्रियांचे कोणतेही विषय आकर्षित करू शकत नव्हते. ते सदगुरु स्पर्शाने ज्ञान संपन्न झाले होते परंतु एखाद्या अज्ञानी माणसाप्रमाणे संचार करीत फिरत होते. अजगर हा प्राणी पोटासाठी धडपड करीत नाही उलट आपल्याच ठिकाणी राहून जे भक्ष्य आपल्यासमोर येईल त्याचा स्विकार करतो. अगदी अशी अवस्था महाराजांची झाली होती. याला शास्त्रात अजगर व्रत म्हटले आहे. असा सत्पुरूष कधी उत्कृष्ट मंचकावर शयन करतो तर कधी नुसत्या भूमिवर पण निजतो. एखादेवेळी मौल्यवान वस्त्रही परिधान करतो तर एखादेवेळी वल्कलेही धारण करतो.
महाराजांचे पूर्व जीवन पाहिले तर असेच काहीसे होते. ते साक्षीभूत परमात्म्याप्रमाणे बंधमुक्त होऊन न राहिले होते. भक्ष्य, भोज्य अथवा पेय यांचे फल अमुक असावे असा नियम नाही. देश व काळ यांची सुद्धा व्यवस्था केवळ दैवयोगावरच अवलंबून असते. तथापि हे व्रत अंत:करणास सुखदायक आहे म्हणून या व्रताचे अनुकरण त्यांनी केले होते. अनेक श्रेष्ठ लोकसुद्धा द्रव्य प्राप्तीच्या आशेने दीन होऊन अनार्यांची सेवा करतात हे पाहून त्यांचे वैराग्यावर प्रेम जडले त्याचा हा परिणाम होता. त्यामुळे त्यांना कशाचा आनंद मानायचा व कशाचे दु:ख करायचे असे कधी वाटेनासे झाले. या भ्रमंतीतच ते आंबोलीचे जंगलात गेले, तिथे त्यांनी घोर तप:श्र्चर्या केली. तपस्या पूर्ण झाल्यावर महाराज इ.स. १९१० चे सुमारास सावंतवाडी येथे फिरत फिरत आले. इ.स. १९१४ पासून सावंतवाडीतील लोक त्यांना ओळखू लागले. काही लोक त्यांना वेडा समजून मारहाण करू लागले. दोन तीन वर्षे सावंतवाडी येथे गाडीवान त्यांना जेवण देत असत. त्यावेळी महाराजांच्या अंगावर फाटकी वस्त्रे व हातात फुटकी थाळी असे. कधी कधी ते भिक्षा मागत असत. दोन ख्रिस्ती भिकारी जिरोड व इनुस आपल्या भिक्षेतील काही भाग त्यांना देत असत. इ.स. १९१४ ते १९१६ च्या दरम्यान ते वाडीहून दाणोलीस येऊन राहिले. निवाऱ्याचे अमुक एक निश्र्चित स्थान ह्या वेळपर्यंत तरी नव्हते. डोक्यावर जटाभार वाढलेला होता. कधी गटारात तर कधी गुरांच्या गोठ्यात अंतर्मूखावस्थेत पडून असायचे. कधी जंगलात डोंगरावर फिरत असायचे. या काळात आध्यात्मिक शक्तीचा संचार होऊन ते महान सिद्ध पुरूष असल्याची लोकांना प्रचिती येऊ लागली. सावंतवाडीचे राजे साहेब श्रीमंत बापूसाहेब यांनाही याची प्रचिती आली. १९२४ सालापूर्वी दोन तीन पिढ्या सावंतवाडीतील राज घराण्यातील पुरूषास राज्याधिकार मिळाले नव्हते. ते समर्थांची भेट झाल्यापासून अवघ्या एक वर्षांचे आत त्यांना मिळाले. हा समर्थांच्या कृपेचा प्रसाद मानून ते त्यांचे निस्सिम भक्त झाले. हळुहळु लोकांत त्यांची कीर्ति वाढू लागली. आता त्यांचे वसतीस्थान दाणोली गाव झाले. तेथे ते श्री. सखाराम अनंत केसरकर तथा बाबा मेस्त्री यांच्या घरी राहू लागले
श्री सदगुरु समर्थ साटम महाराज यांची खूर्ची
लागले. इ.स. १९१९ साली वसईत श्री. अण्णाबुवा वसईकर नावाचे भाविक गृहस्थ होते. त्यांस दाणोलीस येण्याविषयी दृष्टांत झाला. दृष्टांताप्रमाणे ते दोन तीन माणसें बरोबर घेऊन दाणोलीस आले. समर्थांस शोधून काढून त्यांचा डोक्यावर वाढलेला जटाभार काढविला. हे सर्व समर्थांनी करू दिले, नंतर त्यांना स्वच्छ स्नान घालून भस्माचे तिलक लावले व गळ्यात हार घालून त्यांचा फोटो काढविला. अण्णाबुवा दत्तभक्त होते, ते दत्त महाराजांच्या दृष्टांताप्रमाणे दाणोलीस आले होते. त्यांना दृष्टांतात दत्त महाराजांनी सांगितले की, दाणोलीस जा तेथे तुला दत्तस्वरूप पहायला मिळेल. अण्णाबुवांना पाहून समर्थ म्हणाले 'तू आलास तर ! आटोप तुझी पुजा झटपट !' मला दषवचनातून मुक्त होऊ दे!' समर्थांच्या तोंडून हे ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता समर्थांच्या चरणावर अण्णाबुवांनी आपले मस्तक ठेवले. ते समर्थांचे भक्त झाले. देह ठेवीपर्यंत महाराज दाणोली येथे श्री. मेस्त्री यांच्याकडे असायचे. त्या काळात दाणोलीला पंढरपुराचे महात्म्य प्राप्त झाले.
श्री सदगुरु समर्थ साटम महाराज यांचा कूर्ता
समर्थांचा मुक्काम जरी दाणोलीस होता तरी अधून मधून मोटारीने तर कधी चालत ते सावंतवाडी, वेंगुर्ले, गोवा, मालवण, मुंबईकडे भक्तांच्या आग्रहास्तव जात. त्यांचा वर्ण तांबुस होता, पिळदार शरीरयष्टी, तेजस्वी डोळे, ४-५ फुट उंची जणु वामनमूर्तीच वाटायची त्यांचा आवाज मधुर होता. ते सर्व भाषांतून बोलायचे, कवाली तर फार सुंदर गात. प्रथम दर्शनी त्यांची कोणावरही छाप पडत असे. राजा, भिकारी, श्रीमंत, गरीब, स्त्री पुरूष असा भेदभाव त्यांना रूचत नसे. सर्वांशी समानतेने वागायचे. त्यांचा आहार निश्र्चित नव्हता. बिनशाकाहारीहि अन्न घेत कधी कधी काही न खाता चार चार दिवस झोपून रहात. विश्र्वामध्ये घडणारी कोणतिही घटना दाणोलीस बसून ते सांगत. कोणाही व्यक्तीचे दुष्कर्म त्यांचा दिव्य दृष्टीतून कधीच लपत नसे. इच्छा नसेल तर छायाचित्रकारांची फिल्म कोरी निघे. याचा अनुभव ख्यातनाम कलामहर्षी कै. बाबुराव पेंटर यांनी घेतला होता. ते लोकाभिमुख झाल्यावर त्यांच्या अवस्थेत बदल होत गेला. मौनावस्था संपून ते बाल उन्मन व पिशाच अवस्थेत नेहमी असत. ते कधी उंच दिसत तर कधी ठेंगू दिसत. कधी वजनाने जड होत तर कधी फुलासारखे हलके होत. त्यांच्या अनेक आठवणी आणि चमत्कार कोकणातील घराघरातून ऐकायला मिळतात. श्री. र. ग. वायंगणकर यांनी लिहिलेल्या प्रासादिक रसाळ चरित्र ग्रंथात त्या आल्या आहेत. ते दषावतारी सत्पुरूष होते. दाणोलीस समर्थांच्या मंदिरात समर्थांच्या पश्र्चात वास्तव्य करून रहाणारे सदगुरु श्री समर्थ सदानंद सरस्वती महाराज त्यांना पूर्णावतार मानीत. तेही दत्त आज्ञेवरून दाणोलीस
येऊन समर्थांना गुरूस्थानी मानून सेवत राहीले होते. मी तुमचे कल्याण करतो असे समर्थांनी कधी कोणाला सांगितले नाही. ते म्हणत, 'पुता देवाची सेवा करावी देव भले करतो. सेवा करतो तो मेवा खातो." दाणोली येथे सेवापरायण भक्ताला ईश्र्वरकृपेचा मेवा मिळतो, प्रचिती येते. देह ठेवतानाही या सिद्ध सत्पुरूषाने अनेक चमत्कार केले. डॉक्टर भडकमकरांसारख्या जेष्ठ डॉक्टरांनीही हात टेकले. महाराज गेले म्हणून जाहीर करावे तर महाराज बोलू लागत. असे तीन वेळा घडले आणि शेवटी त्यांनी सर्वांना सांगितले की "रडू नका ! मी देह ठेवला तरी कुठे जात नाही जिथे माझे कराल स्मरण तिथे मी आहे, मी येतो.' दिनांक २८ मार्च १९३७ रोजी महाराजांनी देह ठेवला. महाराज नागझरीवर स्नान करत. येणारा भक्त प्रथम नागझरीवर जातो, स्नान करतो व मंदिरात येऊन समाधी दर्शन घेतो. हे तीर्थ म्हणजे साक्षात गंगातीर्थ आहे.
श्रीमंत बापू साहेब महाराजांनी समाधी बांधून त्यावर एक मंदिर उभारले. मुंबईत श्री. वडेर यांनी माटुंगा येथील गणेश बागेत साटम महाराजांच्या पादुका स्थापन करून तिथेच मंदिर बांधले. तेथेही मोठ्या प्रमाणावर लोक जात येत असतात. श्री. वडेर हे समर्थांचे भक्त होते. या मंदिराने मुंबईकरांची मोठी सोय करून ठेवली आहे. दि. ८ मार्च १९८५ रोजी समर्थांच्या पुण्यतिथीला दाणोली येथे समर्थांचा ब्रॉंझचा पुतळा विधिपूर्वक जयजयकारात बसविण्यात आला. हा पुतळा मूर्तिकार श्री. शामराव सारंग यांनी बनविला आहे.
योगियांचे योगी श्रीदत्तावतार “श्रीसमर्थ साटम महाराज विजयगाथा’ ओवीबद्ध चरित्र आणि कथासार
आंबोलीच्या घाटातून गोव्याकडे जाताना सावंतवाडीजवळ “दाणोली” नावाचे एक गाव आहे. “ दैन्य दुःख लया नेते । पाप ताप निवारिते ॥ ” अशी साक्षात अनुभूती देणारी श्रीसमर्थ साटम महाराजांची समाधी येथे आहे.
श्रीसमर्थ साटम महाराजांचे जीवन म्हणजे अतर्क्य आणि अदभुत अशा प्रसंगांची मांदियाळी आहे. त्यांचा जीवन संघर्ष, त्यांची वाटचाल, त्यांची साधना, त्यांचे भक्त, त्यांची कृपा आणि लाखो भाविक भक्तांच्या जीवनामध्ये त्यांनी घडविलेली विलक्षण क्रांती. श्वास रोखून धरायला लावणारी, सहजा सहजी विश्वास बसणार नाहीत अशा घटना आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या गोष्टी यांची अत्यंत अदभुतरम्य कहाणी. नागडेबाबा उर्फ भालचंद्र महाराज, श्री. सदानंद सरस्वती (सावंत) महाराज, श्री पेडणेकर महाराज अशा शिष्यांमध्ये आपली दैवी शक्ती संक्रमित करून चालविलेली त्यांची परंपरा.
महाराजांच्या समाधीला ८० वर्षे होऊन गेली तरी अजूनही शरण येणाऱ्या प्रत्येक भक्ताची सर्व संकटे आपल्या शिरावर घेऊन त्याचे कल्याण करणारा हा संत सत्पुरूष. शंकर महाराज आणि साईबाबांच्या लिलांची आठवण करून देणारी ही भावपूर्ण कहाणी. भक्त भागवतांच्या रसाळ आणि नादमधुर लेखणीतून उतरलेली ही ओवीबद्ध विजयगाथा आपणा प्रत्येकाला श्रीसमर्थ साटम महाराजांच्या कृपा प्रसादामध्ये चिंब भिजवून टाकील. तुमच्या जीवनामध्ये एक विलक्षण आनंदानुभूती निर्माण करेल. श्रद्धेने पारायण करणाऱ्याची सर्व संकटे हरण होतील आणि ईश्वरी कृपेचा रोकडा अनुभव मिळेल. जो हा ग्रंथ एकदा वाचेल त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही