जन्म: रेठरे बु.॥ जि. सांगली, माहेरचे नाव पटवर्धन
कार्यकाळ: १९८८-१९८३
गुरु: ब्रम्हनाड स्वामी
समाधी: १९८३
उतारवयात ज्ञानेश्वरीमय झालेल्या वाई येथील ताई दामले या प्रथम दत्तभक्त होत्या. यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक या गावी झाला. यांचे माहेराचे नाव पटवर्धन असे होते. यांचे वडील गर्भश्रीमंत व हरिभक्त होते. ताईंना लहानपणापासून पारमार्थिक विचारांची आवड होती. त्यांच्या चुलतीने त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले. लहानपणी एका संन्यासी मुनींनी त्यांना मार्गदर्शन केले. ताईंना प्रथमपासून ध्यानधारणेची आणि निसर्गाची आवड होती. ताईंना कृष्णा नदीची फार ओढ होती.
ताईंचे वडील स्नानसंध्या, ब्रह्मकर्म, वैश्र्वदेव इत्यादी कर्मांत रस घेणारे होते. ताईंनी संतचरित्रे वाचली होती. एकदा त्यांच्या घरी म्हणजे माहेरी ब्रह्मनाडचे अधिकारी पुरुष आले होते. त्यावेळी अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त असा पुकार झाला. स्वामींनी त्यांना उपदेश केला. नवविधाभक्ती आचरून ताईंची उपासना सुरू झाली. दत्तात्रेयांची तसबीर पाटावर मांडून ताई त्यांना प्रदक्षिणा घालावयाच्या. त्या गुरुवारचा उपवास करीत. लवकरच त्यांना दत्तकृपेचा अनुभव आला.
लहानपणी ताईंचे डोळे बिघडले होते. लोकांनी त्यांना नरसोबाच्या वाडीस जाण्याचा उपदेश केला. याठिकाणी दत्तात्रेय हे जागृत दैवत आहे. संथपणे वाहणारी कृष्णा नदी पाहून ताईंचे मन प्रसन्न झाले. औदुंबर वृक्षाखालच्या मनोहर पादुका पाहून त्यांचे मन तृप्त झाले. आपल्या चुलतीबरोबर त्या पहाटे नदीवर स्नानासाठी जात असत. एकदा त्यांनी दत्तपादुकांचे दर्शन घेतले. आणि त्यांना मनस्वी आनंद झाला. रात्री त्यांना स्वप्न पडलेले आठवले. वासुदेवानंदसरस्वती स्वामी कृष्णेच्या पाण्यावरून चालत गेलेले त्यांनी पाहिले. स्वामींच्या दर्शनाने त्यांची भावसमाधी लागली. स्वामींचे चरण जेथे उमटले, त्याला तीर्थाचे महत्त्व प्राप्त झाले.
पुढे ताईंचे लग्न वाई येथील शंकरराव दामले यांच्याशी झाले. सांसारिक सुखदु:खांचे अनुभव त्यांनी घेतले. ब्रह्मनाड स्वामींचे त्यांना पुन्हा दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी नियमितपणे ज्ञानेश्वरी वाचण्यास सुरुवात केली. अनेक वर्षे त्या बायकांना ज्ञानेश्वरी सांगत असत. ताईंचे चरित्र ‘कृष्णाकाठ ते इंद्रायणीघाट’ या नावाने नीलाताई जोशी यांनी लिहिले आहे.