जन्म: अंदाजे १८००, मंगळवेढे (पंढरपूर), उपासनी कुटुंबात
कार्यकाळ: १८०० ते १९४७
स्पर्शदिक्षा: स्वामी समर्थ अक्कलकोट
समाधी: पुणे येथे, धनकवडी, २४/०४/१९४७
श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, माता-पिता, शिक्षण, गुरू, साधना, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही.
जन्म व पूर्व इतिहास
त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो!’ नावही ‘शंकर’! ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल!’ आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच! आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’
ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी त्यांची भटकंती असायची! सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही! म्हणजे शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे. कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते! म्हणूनच ‘शंकर’ होते!
श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वत: मात्र नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’ पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना ‘सिद्धी’ हवी असते ती ‘प्रसिद्धी’साठी! त्याने नावलौकिक वाढतो, धन-दौलत मिळते, शिष्य-परिवार वाढतो! म्हणून श्री शंकर महाराज म्हणत ‘सिद्धीच्या मागे लागू नये’ त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन-दौलत, नावलौकिक वा शिष्य-परिवारादि उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वत: खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानीत. हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते.
ते म्हणत, ‘मला जाती, धर्म काही नाही. ते स्वत: खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली. शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे? ‘अरे, तू नमाज पढत नाहीस. नमाज पढत जा. तुझी अडचण दूर होईल.’ ते काय शिकले होते कुणास ठाऊक! पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तरे दिली. त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे नि कुठे झाले, कुणास ठाऊक!
पुण्यात आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे. आप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता. बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या लढाईत लढले होते. त्यावेळी ‘अप्पा बळवंत’ हा केवळ बारा वर्षांचा होता. सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता म्हणून त्या चौकाचे नाव ‘आप्पा बळवंत चौक!’ मेहेंदळे यांच्या घराण्यातील ‘ताईसाहेब मेहेंदळे’ शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस आल्या.
एक दिवस शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्याला बोटाने स्पर्श केला नि सांगितले, ‘ज्ञानेश्वरी सांग.’ ताईसाहेब ज्ञानेश्वरीवर प्रवचने करू लागल्या.’
ताईसाहेब मेहेंदळे यांची प्रवचने
ताईसाहेब मेहेंदळे आपल्या वाड्यातच प्रवचने करीत. मेहेंदळे वाड्यात वरती माडीवर मोठा दिवाणखाना होता. तिथे ही प्रवचने चालत. तो मोठा दिवाणखाना श्रोत्यांनी भरून जात असे. त्यांच्या मुखातून साक्षात सरस्वती अवतरायची. त्या वेदोपनिषदांची, आचार्यांची अवतरणे देण्याच्या भानगडीत सहसा पडत नसत. पण वेदांत, योगशास्त्र अशा काही अभूतपूर्व रीतीने सांगत की, प्रगाढ पंडितांनी माना डोलवाव्या. त्या ज्ञानेश्वरी सांगत, पण ज्ञानेश्वरीची काव्यमयता, शास्त्रीयता, वैचारिक सुसंगती नि झेप त्यांच्या प्रवचनांतून अनायासे प्रकट होई. विशेष असे की, त्यांचे पतीही त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला बसत. ताईसाहेब मेहेंदळ्यांची प्रवचने ऐकायला काही वेळा शंकर महाराजही येत. मेहेंदळे पती-पत्नीची त्यांच्यावर प्रगाढ श्रद्धा होती.
श्री शंकर महाराजांची अतिशय साधी शिकवण : श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने, प्रवचने केली नाहीत. एखाद्या ग्रंथावर टीका लिहिली नाही. आलेल्या व्यक्तींना त्यांचे साधेसुधे मार्गदर्शन असे-
ते म्हणत, ‘अरे! आचरण महत्त्वाचे! ग्रंथांचे वाचन नि अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा!
ते म्हणत, ‘भावनेने भिजलेले असेल, ते भजन!’
त्यांनी अनेकांना सांगितले, ‘माता-पित्याची सेवा करा. कुलदेवतेची आराधना करा. यापेक्षा अधिक काही नको.’
श्री सद्गुरु शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मतः अष्टावक्र व आजानुबाहू होते. त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे. नेहेमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करून असत. खूप वाढलेले केस, दाढी मिशी आणि त्यातून डोकांवणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे. प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखादया लहान मुलाप्रमाणे वाटे. पण त्यांचे तेज आणि योग सामर्थ्य त्यांच्या चेहेऱ्यावरून ओतप्रोत ओसंडे. लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गांवढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्याभल्यांची तोंड बंद होत असत. स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशी भाषांवरपण होते,आलेल्या रशियन दांपत्याशी महाराजांनी अस्खलीत रशियन भाषेत संवाद साधला होता. हे न सुटलेले कोडे आहे. भगवंतच तो त्याला काय अशक्य! अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधीत. एक आख्याईका इकडे नमूद करावीशी वाटते.
आपल्या लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लू सुद्धा त्या देवळात आश्रयाला लपले.त्या पिल्लाला बाण मारणार एवढयात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आला. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले. आणि महाराजांना म्हणाला " कशाला मारतोस रे ह्याला, काय बिघडवले ह्याने तुझे". काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम "स्पर्शशिक्षा". महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हणतात.
पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजाच्या वया विषयी कुतूहल होते. कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत तर प्रसंगी गब्रू जवाना प्रमाने वागत. एक दिवस धीर करून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारलाच "महाराज! आपले वय काय असेल हो?"
महाराज उत्तरले "अंदाजे १५० वर्षे. मी शनिवारवाडयात पेशव्यांबरोबर पंगतीला बसलो आहे" ही घटना साधारण १९३५ ची आहे म्हणजे महारांजानी जेव्हा महासमाधी (१९४७) घेतली त्या वेळेस ते १६२ वर्षांचे होते.
पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर ह्यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टराना भोवळ आली. रिझल्ट मध्ये महाराजांचे वय १५२ वर्षे आले.
शंकर महाराजांचा आवडता नंबर होता १३. कारण विचारले असता ते म्हणत " सबकुछ तेरा, कुछ नाही मेरा" महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहेत.
सातपुड्यात सुपड्या बाबा, खानदेशात कुर्वास्वामी, वाघोद मध्ये गौरीशंकर, मध्यप्रदेशात लाहिरी बाबा. एवढेच काय पण परदेशात पण ते प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत.
संजीवनी मेडिकल कंपनीचे मालक परांजपे ह्यांच्याकडे शंकर महाराजांचे एक छायाचित्र आहे. जे एका जपानी चित्रकाराने काढले आहे. प्रापंचिकांना त्यांचा परखड उपदेश असे. ‘प्रपंचातील अडीअडचणी तुमच्या तुम्हीच सोडविल्या पाहिजेत. त्याच्यासाठी कोणाकडे जाणे योग्य नाही.’
श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेश: श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे. अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले.
एकदा ते म्हणाले होते, “परमार्थात अहंकार टाकणे महत्त्वाचे. ध्यानात घ्या, प्रापंचिकात अहंभाव असतो. ही माझी पत्नी, ही माझी मुले, हे माझे घर, मी एवढे कमावले, मी एवढा शिकलेला आहे, मी अमक्या-तमक्या स्थानी अधिकारी आहे, असे ‘मी – माझे’ हा प्रापंचिक अहंकार होय. पण परमार्थातही अहंकार असतो. मी धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे, मी नित्य उपासना करतो. मी एवढा, एवढा जप केला आहे. मला अमक्या – अमक्या गुरूचा अनुग्रह प्राप्त झाला आहे; आता मीही अनुग्रह देतो. माझे एवढे एवढे शिष्य आहेत इ. इत्यादी. हा पारमार्थिक अहंकार! खरे म्हणजे अहंकाराचे पूर्ण विसर्जनच व्हायला हवे!
खरे सांगू का? परमार्थाची साधना म्हणजे काय? हृदयात आईचे बालकावर जसे प्रेम असते, तसे निर्माण होणे, हीच साधना! ज्ञानदेवांना ‘माउली’ म्हणतात. ‘आई’ शब्दाने ‘आपल्या बाळावर प्रेम करणारी ‘व्यक्ती’ सूचित होते, तर ‘माउली’ या शब्दाने चराचरावर प्रेम करणारी व्यक्ती सूचित होते. ‘आई’ बनणे ही साधना, तर ‘माउली’ बनणे ही सिद्धी! त्यांनी एकदा परमार्थ-साधनेबद्दल म्हटले, जीवन नदीच्या प्रवाहासारखे हवे! वाहते असावे! झाडाचे वाळके पान प्रवाहात पडते; प्रवाह नेईल तिकडे ते शांतपणे वाहात जाते. बस्, तसे असावे. अहंकार गेला की, आपण ‘वाळके पान’ झालो; आता त्या भगवंताने कुठेही न्यावे!’
श्री शंकर महाराजांची मनोभूमिका
श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्य-संपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती, ते त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते. ते म्हणाले होते- ‘मला काही कमी नाही, कारण मला कमावण्यासारखे काही नाही. आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही.’
१) सुख-शांती हवी असेल, तर इच्छा, इर्षा, असुया, महत्त्वाकांक्षा, हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल.
२) सामाजिक-धार्मिक-नैतिक अधिष्ठान गुरुंमुळे प्राप्त होते. पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरुस ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे.
३) गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी.
४) जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात. त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो.
५) देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात. पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत. प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल.
६) साधनमार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्त्वाची असते. पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी. विद्वत्तेने देवाला जोखू नये. विद्वान मंडळींना शंकाच फार येतात. त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगात डोकावून पाहावे. त्यायोगे शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते.
७) स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे. त्यातूनच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी मित्राला मदत, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की, लगेच राग येतो. तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो.
८) आशा, इच्छा, हव्यास, वित्त यांची हाव कधीच संपत नाही. मग त्यापोटी दु:ख-वेदना होणारच. बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच. मूल हवे तर प्रसूतीचा त्रास सोसलाच पाहिजे. शरीर म्हटले की व्याधी आलीच.
९) जे आत्मदर्शन प्राप्ती करुन घेतात त्यांना जन्म-मृत्यू नसतो. ते जगद्उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात.
१०) सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ,
११) सद्गुणांची वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होते.
१२) आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत. लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो. मनुष्य जन्म असेतोवरच हे समजून घ्या. आत्मकल्याण करुन घ्या. जीवनाचे सार्थक करा.’
श्री शंकर महाराज चरित्र चिंतन
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।
दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।
यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।
पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।
हे शब्द आहेत शंकर महाराजांचे. इ.स. १७८५ च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर पती-पत्नीस बालक सापडले. श्री. व सौ. नारायण अंतापूरकर यांना संतती नव्हती व ते शिवभक्त असल्याने त्यांनी या बालकाचे नाव शंकर ठेवले. पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले. भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतारकार्याचे स्वरूप दर्शवून दिले. सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्याबाबा म्हणून मानू लागले, तर खान्देशात कुँवरस्वामी, गौरीशंकर, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महंमदखान, मध्य भारतात लहरीबाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना
मानीत.
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत. ते भक्तांना स्वामीसेवा जप करावयास लावत. सोलापूर येथील शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ ऊर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉ. धनेश्वर, नारायणराव राजहंस (बालगंधर्व), प्रल्हाद केशव अत्रे, अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले. त्या भक्तपरिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्या शब्दांत- माझी जात, धर्म, पंथ कोणता? हे शोधू नका. माझ्या बाह्यरूपाला पाहून तर्क-वितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात, अशी शिकवण त्यांची भक्तांसाठी असे. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले. परंतु सगळ्यांनी त्याच्या नादी लागू नये, असेही स्पष्ट केले.
भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी २६ एप्रिल १९४७ रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या-त्या भागात दर्शन दिले तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे श्री शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आज रोजी साजरा होतो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून, हे स्थान लाखो भक्तांचे श्रध्दा स्थान आहे.
सदगुरू शंकर महाराजम्हणत असत मी आणी माझा गुरु वेगळा नाही. श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे. त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते. जो खुदको जानता है, वो हि मुझे पहचानता है! हे त्यांचे वचन. स्वामी समर्थांना सदगुरु शंकर महाराज "मालक " म्हणत असत.
सदगुरू श्री शंकर महाराज म्हणायचे,' त्या उदबत्तीच्या किंवा सिगारेटच्या धुरातून मी त्र्यलोक्यही भटकून येतो, धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करीत असतात. श्री शंकर महाराज विश्वभर संचार करत असतात. आज देशात सर्वत्र आणि विदेशातही कित्येक भक्त साधक श्री शंकर महाराजांचं प्रत्यक्ष्य अनुभव दर्शन घेत असतात सिगरेटचा धूर किवा सुगंध अनुभवत असतात.' मी तुमच्या बरोबर चोवीस तास आहे या त्यांच्या वचनाचा ते अनुभव देत असतात. आपली श्रद्धा आपला भाव महत्वाचा.
कर्नाटकातील हिप्परगी गावातील श्री भागवत यांनी शंकर महाराजांचे चरित्र लिहिले. सत्यनारायणाची पूजा घालून महाराजांना प्रकाशनाला बोलविले. शंकर महाराजांनी चरित्राची सर्व पाने सत्यनारायणाचा प्रसाद बांधून संपवली. श्री भागवत नाराज झाले तेव्हा महाराज म्हणाले "जेव्हा दासबोध ज्ञानेश्वरी कमी पडेल तेव्हा माझे चरित्र लिहून काढ " माणसाने आपले धर्मग्रंथ वाचले तर तो सुखी होईल म्हणून महाराज गावोगाव उत्सव सण प्रवचने कीर्तने पारायणे करीत. महाराज कमी बोलून कित्येक वेळा अधिक काम करीत. भक्त संकट मुक्त कसा होईल हा एकमेव ध्यास घेवून शंकर महाराजांनी आपली जीवनयात्रा पूर्ण केली. ढोंगी बुवांना सरळ केले. महिलेची छेड काढणाऱ्या गुंडाला चाबकाने फोडले. नाठाळांचे कर्दनकाळ झाले. भक्ती संगीताच्या तालावर नाचले. भजनात दंग झाले. महाराज भक्ती मार्गावरील एक महान तेजस्वी तारा होऊन गेले. त्यांच्या महान उपदेशाने व कार्याने आज अनेक भक्त प्रेरित झले आहेत. "आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी" या अभंगाच्या ओळी त्याच्या कार्याला समर्पक आहेत.
अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधीत.
कैक करिती मनी हा विचार
शंकर महाराज काय हा प्रकार
स्वानुभव घ्या खुला दरबार
दूर राहून ते नाही कळणार ।।धृ.।।
भक्ती केली भक्तांनी जैसी
कृपा करतात बाबाही तैसी
गुरुभक्ती ती व्यर्थ न जाणार
दूर राहून ते नाही कळणार ।।१।।
करिता बाबा मदिरा धुम्रपान
शोधिले याचे लोकांनी कारण
ज्यांनी केले विषाचे प्राशन
त्यांना मदिरा ती काय बाधणार ।।२।।
ज्याला दिली बाबांनी दिव्य दृष्टी
त्याला दिसतात ते समाधीवरती
गुरुभक्तीवीन नाही कळणार
अनुभव ज्याला त्यालाच मिळणार ।।३।।
भक्तांना नित्य अनुभव येतात
बाबा नाना रुपात भेटतात
श्रद्धा भक्तिविना नाही कळणार
दूर राहून ते नाही कळणार ।।४।।
मागावे काय आम्ही सदगुरूंना
सर्व ठावे ते माझ्या शंकराला
गुरुभक्तांचा गुरुचरणी भार
बाबा घेतील त्यांचा कैवार ।।५।।
श्री शंकरगीता कशी तयार झाली
सुमारे १९७३ च्या सुमारास एकदा श्री भस्मे व श्री अघोर शास्री हे अक्कलकोटच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. तेव्हा श्री अघोर शास्त्री श्री भस्मेंना म्हणाले की,“श्री शंकरमहाराजांचे चरित्र लिहावे, अशी माझी इच्छा आहे.” डोळे मोठे करून भस्मेंनी त्यांचे म्हणणे एकून घेतले आणि त्यावर विचार केला. पण, श्री भस्मे काहीही बोलले नाहीत. त्यांच्या मनात नसेल म्हणून श्री अघोर शास्त्री यांनीही हा विषय पुन्हा त्यांच्याजवळ काढला नाही.
यालाही जवळपास १२ वर्षे उलटून गेल्यावर, साधारण १९८५ साली तेथेच दर्शनासाठी रांगेत उभे असताना. श्री भस्मेंनी श्री अघोर शास्त्रींचा उजवा हात धरला आणि म्हणाले, “तुम्ही इतकी संत चरित्र लिहिलीत. श्री गजाननमहाराजांचे चरित्र लिहिलेत. आमच्या गुरूंचे चरित्र तुम्ही का लिहित नाही?” श्री अघोर शास्त्री म्हणाले की, “ भस्मे, १२ वर्षापूर्वी याच ठिकाणी, याच कार्याकरता रांगेत आपण दोघे उभे असताना, ‘श्री शंकरमहाराजांचे चरित्र लिहिण्याची माझी इच्छा आहे’ असे मी तुम्हाला विचारिले होते. त्यावेळी तुम्ही गप्पच बसलात.”
भस्मे म्हणाले, “त्यावेळेस महाराजांचा आदेश नव्हता. आता महाराजांचा आदेश झाला आहे.” श्री अघोर म्हणाले,“ठीक आहे. मी चरित्र लिहितो.” याप्रमाणे चरित्र लिहिण्याचे ठरले. श्री अघोर शास्त्रींनी अक्कलकोटला जाऊन श्री गजानन महाराजांना, श्री शंकरमहाराजांचे चरित्र लिहिण्याची परवानगी मिळण्याबद्दल निवेदन केले. श्री गजानन महाराजांनी मोठया आनंदाने परवानगी दिली व आशीर्वादही दिला.
पुढे माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले व अश्या प्रकारे श्री भगवंत वासुदेव अघोर शास्त्री यांनी ‘श्री शंकरगीता’ लिहिली.
श्री शंकर महाराजांचा उपदेश (समजावून सांगण्याची पद्धत)
एकदा सद्गुरु शंकर महाराजांकडे स्वतःला ज्ञानी समजणारा माणूस आला होता. तो वेगवेगळे शास्ञ, त्यातील सूञे कंठस्थ करुन स्वःताला मोठा ज्ञानी, शास्ञांचा मोठा पंडित समजत होता. स्वतःला किती ज्ञान आहे याचा अहंकार त्या माणसाच्या नजरेतून प्रकट होत होता. तो ज्ञानी माणूस आला आणि शंकर महाराजांबरोबर बोलू लागला. महाराजांनी त्याला पहाताच ओळखले. महाराज चहा पीत होते. इतरही लोकांना महाराजांनी चहा दिला होता. तो बोलू लागल्यावर त्याच्या बोलण्यात तो स्वतः किती ज्ञानी आहे हेच त्याला भासवायचे होते. त्याने भगवद् गीता, ऋगवेद, सामवेद इ. वेगवेगळ्या शास्ञांवर चर्चा केली. तो म्हणाला, मला कळलं आहे कि तूम्हीही ज्ञानी आहात. तुमच्याकडून नवीन ज्ञान मिळालं तर आनंद होईल. मी, त्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. शंकर महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, " आधी चहा तर घ्या, नंतर आपण बोलू या.' महाराजांनी कप बशी त्याच्या हातात दिली आणि त्यांच्याजवळील किटलीतून त्याच्या कपात चहा ओतायला सुरवात केली. चहाचा कप भरला त्यातून चहा बशीत सांडू लागला. तरी महाराज चहा ओततच राहिले. बशीपण भरली व बशीतून चहा खाली सांडायला लागला. तसा तो माणूस चिडला आणि म्हणाला, अहो करताय काय तुम्ही? कपात केवढी जागा आहे तेवढाच चहा द्यायचा, एवढं साध ज्ञान तुम्हाला नाही आणि तुम्ही कसले ज्ञानी? शंकर महाराज हसून म्हणाले, खूपच समजदार दिसता, पण तुम्हाला एवढं ज्ञान, हवे की तूम्ही आधीच ठासून ठासून ज्ञान भरुन घेऊन आलाय. तुझ्यात काही रिकामी जागा असेल तर मी तूला काही देऊ शकेन. पण मला तर तू भरलेला दिसतोस. माझ्याजवळ यायचं असेल तर आधी रिक्त होऊन यावं लागेल.
मल्हारी मार्तंड चरित्रात असाच प्रसंग आला तेव्हा खंडेराय म्हाळसेला म्हणतात तू माझी शिष्या बन तेव्हा म्हाळसा खंडेरायांना म्हणते मी तूमची पत्नी आहे. मग मी तूमची शिष्याच झाली नाही का? तेव्हा खंडेराय म्हाळसेला म्हणतात. माझी तशी शिष्या नको बनू ज्या प्रमाणे एखाद्या पदार्थाने पूर्णपणे भरलेल्या भांड्यात दूसरा पदार्थ रहात नाही. भांडे पूर्ण पणे रिक्त असेल तरच त्याच्यात एखादा पदार्थ रहातो त्या प्रमाणे तू बानूचा द्वेष, राग तूझ्या मनात ठासून भरला आहे. तो जो पर्यंत जात नाही तो पर्यंत तू माझी शिष्या नाही होऊ शकत. तो जर तूझ्या मनातून राग, द्वेष, मत्सर निघून गेला तर तूला खरी ज्ञानाची प्राप्ती होऊन खरे शिष्यत्व प्राप्त होईल.
खरा गुरु तुम्हाला ज्ञान देत नसतोच तो तुम्ही ज्ञान म्हणून जे जे गोळा केलेलं आहे तेच आधी हिरावून घेत असतो. तसेच आपल्यात काम, क्रोध, द्वेष, मत्सर, राग, लोभ इत्यादी षढविकांरानी आपण भरलेले असतो. ते एकदा नाहीसे होऊन आपण रिक्त झालो. कि सद्गुरुकंडून आपोआप प्रेरणा मिळून शिष्याला खरे ज्ञान प्राप्त होते. कोणत्याही सद्गुरुकडे तूम्ही गेलात तर स्वतःला असलेले ज्ञान पाघळू नये. आधी स्वतःचं अज्ञान स्वीकारावं लागत. ज्यावेळी आपण कबूल करतो आपण अज्ञानी आहोत, तेच खरं ज्ञानाच्या दिशेने उचलेलं आपलं पहिलं पाऊल ठरतं. साई सच्चरिञ आपण वाचलेले असेल. श्री साईबाबांनचे बहूतेक शिष्य उच्चविद्याविभूषित होते. कोणी डाँक्टर, वकील, तहसिलदार, पण साईबाबांनसारख्या परब्रम्हासमोर त्यांच्या तोडूंन एकही शब्द यायचा नाही.
धनकवडीचा एक अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
योगिराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोट ला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. त्यांच्या सोबत शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा व जानुबुवा असत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. आपल्या सद्गुरु माऊलीच्या दिव्य समाधीवर माझ्या हातून अनेक चमत्कार घडतात. अक्कलकोटातील अनेक मान्यवर व्यक्ती महाराजांच्या भेटीला येत.; महाराजांची विभिन्न नयनरम्य रूपे पाहून नम्रतापूर्वक लीन होत असत. अशावेळी अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री स्वामींची पुण्यतिथी व प्रगट दिन महाराज साजरे करायला विसरले नाहीत. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी म्हणत असत, "पानी पीना छान के और गुरू करना जान के" पाणी जसे गाळून प्यावे. तसेच सद्गुरुची खरी परीक्षा शिष्याने घेऊनच त्याला ओळखावा. आपल्या मतलबापोटी, भक्तांना माळ घालून नारळ हातात देऊन, त्याच्या कडून पैसा उकळून त्यांना शिष्य करणारे, व आपल्या सर्व रोगांवर उपाय सांगणारे, भक्तांचे बदलायचे ढोंगी नाटक करणारे, खोट्या आशा दाखवणार्या गुरूंबद्दल महाराजांना अतोनात चीड होती. आपल्या आयुष्यात दहा हजार शिष्य करून चौदाशें वर्ष जगलेले चांगदेव आयुष्यभर कोरेच होते हे महाराजांना ज्ञात होते. आपण गुरूकडे धाव न घेता गुरूच शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पहात होते. गरज दोघांना होती. जगाच्या कल्याणाची !
एक अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराजांच्या लीला
सद्गुरू श्री शंकर महाराज हे थोर अवलिया होते हे नव्याने सांगायची गरज नाही. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंब्यकेश्वर येथील पुजारी कै रामभाऊ अकोलकर यांना शंकर महाराजांचा सहवास लाभला. शंकर महाराज हे रामभाऊंचे दैवत बनले होते. रामभाऊंच्या घरी शंकर महाराज राहत असत. त्यांच्या वाड्यात महाराजांची मूर्ती आणि फोटो आहे पण बऱ्याच भक्तांना आजही त्याठिकानी गेल्यावर सिगारेटचा वास येतो.
महाराजांच्या अनेक भक्तांची जन्म आणि मृत्यूची तारीख १३ आहे. महाराजांना १३ हा अंक विशेष प्रिय आहे. याचा अर्थ सांगताना महाराज सांगत असत; "सब कुछ तेरा, कुछ नही मेरा" हे जीवन व तुझे सारे ऋणानुबंध तुझेच आहेत. तू तुझ्या मागील जन्माचा कर्मभोग घेऊन आला आहेस. तो तुला भोगलाच पाहिजे. कर्मभोगातून मोकळा झाल्याशिवाय तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही."
महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक आणि महाराजांचे निस्सीम भक्त कै. प्र. के. अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी महाराजांनी त्यांच्या दारावर १३ वेळा थाप मारून त्यांना मृत्यूची चाहूल दिली होती. त्यांना १३ जून १९६९ रोजी देवाज्ञा झाली आणि ते महाराजांच्या चरणी विलीन झाले. पाथर्डीच्या माधवनाथ बाबाना समाधीनंतर ५४ वर्षानंतर पावागडचा डोंगर चढताना महाराज भेटले. त्यांनी माधवनाथांना पाच हॉटेलमध्ये चहा पाजला. प्रत्येक वेळी हॉटेलचे बिल १३ रुपये झाले. हॉटेलचे बिल देताना महाराज १०० ची नोट देत असत पण उरलेले पैसे परत घेत नसत.
सदगुरूनाथा योगिराजा भवसागरी तू धाव !
शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा !!
हे भगवंता दीनदयाळा शरण मी आलो तुला !
शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा !!
श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना सद्गुरुचा महिमा सांगत असत
योगिराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. त्यांच्या सोबत शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा व जानुबुवा असत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. आपल्या सद्गुरु माऊलीच्या दिव्य समाधीवर माझ्या हातून अनेक चमत्कार घडतात. अक्कलकोटातील अनेक मान्यवर व्यक्ती महाराजांच्या भेटीला येत.; महाराजांची विभिन्न नयनरम्य रूपे पाहून नम्रतापूर्वक लीन होत असत. अशावेळी अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री स्वामींची पुण्यतिथी व प्रगट दिन महाराज साजरे करायला विसरले नाहीत. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी म्हणत असत, "पानी पीना छान के और गुरू करना जान के" पाणी जसे गाळून प्यावे. तसेच सद्गुरुची खरी परीक्षा शिष्याने घेऊनच त्याला ओळखावा. आपल्या मतलबापोटी, भक्तांना माळ घालून नारळ हातात देऊन, त्याच्या कडून पैसा उकळून त्यांना शिष्य करणारे, व आपल्या सर्व रोगांवर उपाय सांगणारे, भक्तांचे बदलायचे ढोंगी नाटक करणारे, खोट्या आशा दाखवणार्या गुरूंबद्दल महाराजांना अतोनात चीड होती. आपल्या आयुष्यात दहा हजार शिष्य करून चौदाशें वर्ष जगलेले चांगदेव आयुष्यभर कोरेच होते हे महाराजांना ज्ञात होते. आपण गुरूकडे धाव न घेता गुरूच शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पहात होते. गरज दोघांना होती. जगाच्या कल्याणाची !!
संकटसमयी धावून जाई
सोलापूरला जक्कलांच्या मळ्यात श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी होत असता खिरीच्या टोपात चिमणी पडून मेली. खीर पंगतीला कशी देणार असा आचाऱ्याला प्रश्न पडला. त्याच क्षणी महाराज तेथे आले व मृत चिमणी हातात घेतली चिमणी उडुन गेली. त्यांनी आचाऱ्याला सांगितले "आता कोणाची तक्रार आहे? आता जेवण पंगतीला वाढ." माळीनगर शुगर फॅक्टरीतील आशर भाईंना महाराजांनी मॅनेजर म्हणून अर्ज करावयास सांगितले. त्यांना तेथे महाराजांच्या कृपेने नोकरी लागली. त्याच फॅक्टरीतील दत्ता मेस्त्रीच्या मेलेल्या आईला जिवंत केले. प्रधानांच्या भावला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणले व प्रधानांची इच्छा पूर्ण केली. एका संस्थानिकाने वेश्यांच्या तर्फे महाराजांना दारू पाजली. त्यावेळी त्या वेश्या महाराजांच्या भक्त बनल्या व तो संस्थानिक दारू न पिता तर्र झाला व वेश्यांच्या मागे लागला. बडोद्याच्या गादीवर राजे सयाजीराव गायकवाड यांना श्री शंकर महाराजांनी आपल्या हाताने गादीवर बसवले. बडोद्याच्या राजवाड्यात श्री शंकर महाराजांचा पुतळा आहे व त्यांचे कित्येक फोटो आजही तेथे पहावयास मिळतात. एका बाईचे पाय आखडले व चालणे बंद झाले. तेव्हा ती साईबाबांच्या कडे गेली बाबांनी तीला श्री शंकर महाराजांच्या कडे पाठविले . महाराजांनी तिला कायमचे व्याधिमुक्त केले. महाराजांनी ११ भक्तांना दिलेल्या वचना प्रमाणे एकाच वेळी त्यांच्या घरी जाऊन चकित केले.
दत्तात्रय गणेश अभ्यंकर हे नऊ वर्षांचे असल्यापासुनच वडिलांसोबत महाराजांकडे येत असत, महाराजांची सेवा करीत असत. अभ्यंकरांना महाराजांचा सहवास खुप लाभला. महाराज अभ्यंकरांना घेऊन अनेक ठिकाणी फिरायला गेले. महाराज घरी रात्री अपरात्री केव्हा ही येत चहा, खिचडी बनवायला सांगता किंवा कोणतेही काम करायला सांगत. एकदा महाराज अभ्यंकरांच्या घरी चादर ओढून झोपले होते. महाराजांचे नुकत्याच जन्मलेल्या बाळाप्रमाणे रुप झाले. हे पाहून अभ्यंकर आश्चर्यचकित झाले आणि आपल्या वडिलांना बोलवायला गेले. वडील आल्यावर त्यांनी महाराजांची चादर काढली तर महाराज आपल्या रूपातच होते.
महाराज म्हणाले 'माझे ऐका | मोठ्याचे लहान होता येईल का'?
प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का? | भांबावून गेले दोघेही
महाराजांना अभ्यंकर म्हणतात महाराज मला आपले मुळ रुप दाखवा ना. महाराज म्हणाले वेळ आल्यावर निश्चितच दाखवेल बेटा. समाधी नंतर काही वर्षांनी शुध्द अष्टमीच्या दिवशी चमत्कार झाला. रात्री अडीच वाजता महाराजांच्या समाधी वर पंचवीस फुट उंची असणारी सुंदर तेजस्वी पुरुष व्यक्ती प्रकटली. पुढच्याच अष्टमीला रात्री त्याच वेळेला आणि तेवढ्याच उंचीची तेजस्वी सुंदर स्री प्रकटली. त्या स्त्रीने चुल पेटवली व त्यावर कढई ठेवून शेंगदाणे भाजले. तसेच गरम गरम आपल्या तोंडात घातले. ती स्त्री बोलते मी आदिशक्ती आहे. मी महाराजांचे दर्शन व प्रसाद घेऊन जाणार आहे. समाधी वर उजव्या बाजूला पुरुष रुप व डाव्या बाजूला स्रीरुप अदृश्य झाले.
अशाच एका अष्टमीला समाधी मठाच्या मंडपात एक भव्य, दिव्य, तेजःपुंज रुप मारूतीराया समोर प्रकटले. तेथुनच त्यांनी आपले पाय लांबवले. व सरळ समाधी वर ठेवले. बाबुराव रूद्र व अभ्यंकर हे पहातच होते. तेवढ्यात त्या पुरुषाने 'बाब्या' म्हटले. बाबुरावांनी लगेच ओळखले हे शंकर महाराजच आहेत. कारण महाराज रुद्रांना बाब्या म्हणत. त्या पुरुषाने एका हातात बाबुरावांना तर दुसर्या हातात अभ्यंकरांना धरले. अभ्यंकरांना तो पुरुष म्हणाला, तुला माझे मुळ रुप पहायचे होते ना? मी तुला शब्द दिला होता. आता पाहून घे माझे मुळ रुप. तेथुन तो मनुष्य निघाला आणि समाधी च्या उजव्या बाजूला अंतर्धान झाला. नंतर एक स्रीरुप शक्ती प्रकटते.ती सुद्धा समाधी च्या डाव्या बाजूला जाते 'अल्लख' असा पुकारा करून तेथे गुप्त झाली. अभ्यंकरांच्या लक्षात येते व डोक्यात प्रकाश पडतो की हेच शंकर महाराज आहेत.
(शिव आणि शक्ती हे महाराजांचे मुळ रुप आहे. प्रकृती निर्माण करण्यासाठी शिव आणि शक्ती एकत्र येतात हेच महाराजांनी या लीलेत स्पष्ट केले आहे.)
समाधी नंतर तीन वर्षांनी अष्टमीच्या दिवशी महाराज समाधी वर प्रकटले. महाराज समाधी वर निजलेले होते आणि महाराजांचे पाय वर लांबवलेले होते. महाराज पायानेच वर टांगलेल्या हंड्या हलवत होते. हे प्रत्यक्ष अभ्यंकरांनी पाहिले.
अभ्यंकरांची मुलगी एकदा आजारी पडते. महाराज त्यांच्या घरी अवतरतात. महाराज टोपी, चप्पल दुर काढून संडासात लघवीला गेले. अभ्यंकरांनी महाराजांच्या टोपी व चप्पल घरात आणल्या आणि पेटीत लपवून ठेवल्या. बराच वेळ झाला महाराज अजुन बाहेर येत नाहीत म्हणून अभ्यंकर संडासाचा दरवाजा उघडून पाहतात तर महाराज तेथुन गुप्त झाले होते. आत येऊन पेटीतील सामान पाहिला तर तो ही गुप्त झाला. ही लीला महाराजांच्या समाधी नंतर घडुन आली.
अभ्यंकरांच्या अघोरशास्त्रींसोबत गप्पा रंगल्या होत्या. अभ्यंकरांच्या मस्तकावर महाराजांची चरणकमले दिसुन आली. अघोरशास्त्री अभ्यंकरांना म्हणतात, तुम्ही नशिबवान आहात. तुमच्या मस्तकावर साक्षात महाराजांची पाऊले उमटली आहेत. यावर अभ्यंकर म्हणतात मी, महाराजांसोबत लहानपनापासुन खेळत आहे. महाराज माझ्या डोक्यावर नेहमी पाय ठेवायचे. म्हणून त्याचाच परिणाम म्हणून माझ्या मस्तकावर महाराजांची चरणकमले आहेत. महाराजांनी एका भक्तास सांगितले की, ज्या भक्तांच्या मस्तकावर गुरुंचे पाऊल असतात तो त्यांच्यासाठी 'गुरुप्रसाद' असतो. यावर अघोरशास्त्री म्हणतात,
भस्मे आणि अभ्यंकर | या दोघांच्या मस्तकावर
महाराजांची पाऊले सुंदर | मी आहेत पाहिली
महाराजांनी अभ्यंकरांना अक्कलकोट स्वामी समर्थांचा फोटो आपल्या घरात लावायचा आदेश दिला. अभ्यंकर महाराजांना सांगतात, तुम्ही स्वतः जेव्हा फोटो द्याल तोच मी लावेल. नाहीतर लावणारच नाही.
बेळगावच्या गंधे महाराजांना हगवण सुरू झाली. अनेक प्रयत्न करुनही गुण येत नव्हता. गंधे महाराज म्हणाले, यावर एकच उपाय आहे. मला शंकर महाराज समाधी मठात सोडा माझे काय व्हायचे ते तेथेच होईल. गंधे मठात आले. गंधे महाराज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांसारखे दिसत. गंधे महाराजांची हगवण सुश्रुषा अभ्यंकर करत होते. नगरहुन एक शेतकरी मठात आला. तो दिसायला अगदी शंकर महाराजांसारखा होता. शेतकरर्याच्या भावाने महाराजांना नवस केला होता की मला मुलगा झाल्यावर दर्शनाला येईल. भाऊ मुलाला घेऊन येत आहे. मी दर्शनासाठी आधीच येऊन गेलो असे त्या शेतकर्याने सांगितले. शेतकरी मठात आल्यापासून गंधे महाराजांची हगवण बंद होते. त्यांना बरे वाटायला लागले. गप्पांच्या ओघात शेतकरी गंधे महाराजांना अभ्यंकरांचा पूर्ववृत्तांत सांगतात. व मीच शंकर महाराज आहे हेही सांगतात. महाराज स्वामी समर्थांच्या फोटोच्या विषयी सांगतात. ऐकुन गंधे महाराज थक्क होतात. शंकर महाराज या विषयी अभ्यंकरांना काही सांगू नये असेही सांगतात. भाऊ येत नाही म्हणून शेतकरी निघून गेला.
गंधे महाराज अभ्यंकरांच्या सोबत घरी नैवेद्याचा डबा घेण्यासाठी येतात. दोघेही समाधी मठात परत येतात. गंधे महाराज अभ्यंकरांना स्वामी समर्थांचा फोटो देतात व सांगतात की, शंकर महाराजांनी हा फोटो तुम्हाला द्यायला सांगितला आहे. फोटो देण्यासाठी महाराज स्वतः आले होते. अभ्यंकरांना पूर्वी ची घटना आठवली. व त्यांचे मन भरुन आले. आजही अभ्यंकरांच्या घरी स्वामी समर्थांच्या बाजूला शंकर महाराजांचा फोटो शोभत आहे. महाराजांनी समाधी घेतली तरीही ही भक्तांना दिलेला शब्द (वचन) खरे कोणत्याही रुपात येऊन करतात.
महराज एकदा निवांत बसले होते. महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी जमली होती. प्रसादाच्या अपेक्षेने एक हरिजन तेथे आला होता. तो महाराजांपासुन बराच दूर होता. लांबुनच प्रसाद मिळेल की नाही याचा विचार करत होता. महाराजांनी बसल्या जागेवरून हात लांबवुन 'हा घे प्रसाद' म्हणून' त्याला प्रसाद दिला. पुढे काही वर्षांनी महाराजांनी येथेच समाधी घेतली.
सयाजीराव गायकवाडांना महाराजांनी स्वहस्ते मोठ्या थाटात बडोद्याच्या राजगादीवर बसवले होते. आजही बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा पुतळा आणि फोटो अत्यंत प्रेक्षणीय आहे.
महाराज नेहमी हिमालयात जात. तेथे अनेक जण समाधी घेऊन बसले आहेत. काहींनी चार हजार वर्षांपूर्वी जीवंत समाधी घेतली आहे. काहींची दाढी तर काहींचे भुवयांचे केस जमिनीपर्यंत वाढलेले आहेत. महाराज अशा लोकांची दाढी ओढून बघत समाधी खरी आहे की खोटी.
पुण्याच्या लकडी पुलावर एक गृहस्थ रोज महाराजांच्या सोबत गप्पा मारत बसायचा. दोघांची चांगली मैत्री जमली. गृहस्थाने महाराजांना एके दिवशी त्यांचे नाव व कोठे राहतात हे विचारले. महाराजांनीही त्याला आपले नाव शंकर महाराज आहे व मी धनकवडी मठात राहतो असे सांगितले. पुढे दोन दिवस महाराज पुलावर आले नाहीत म्हणून तो मनुष्य धनकवडी मठात येतो.व विचारतो शंकर महाराज कोठे आहेत? बाबुराव रूद्र त्यांना सांगतात की ही शंकर महाराजांची समाधी आहे. ऐकुन गृहस्थ थक्क होतो. तो रुद्रांना सांगतो, की महाराज रोज लकडी पुलावर येतात. ते आज आणि काल आले नाहीत म्हणुन चौकशी करायला आलो. रूद्र त्यांना सांगतात की महाराजांनी आठ वर्षांपूर्वीच समाधी घेतली आहे. हि महाराजांची लीला ऐकून तो गृहस्थ व रुद्र दोघेही थक्क होतात.
समाधीनंतर महाराजांनी एका भक्ताच्या लग्नाला हजेरी लावली व तेथे जाऊन महाराजांनी कोठीही सांभाळली. लग्नात काढलेल्या फोटोत महाराज दिसतात. महाराजांना कोणीही कोणत्याही कामासाठी मुहूर्त विचारला तर महाराज त्याला अमावस्येचा मुहूर्त सांगत. महाराज हजामतीस बसले की हजामत होईपर्यंत सर्वच केस पुर्वी सारखे होत.
महाराजांना एकदा नवले म्हणाले, महाराज मला विष्णुपद दाखवा. महाराज नदीत उभे राहिले आणि नवलेंना म्हणाले पहा विष्णुपद. नवलेंना पाण्यात विष्णुपद दिसले. नवलेंनी त्यावर हात फिरवत सरकवत पाहु लागले. विष्णुपद एवढे लांब होते की, ते संपता संपत नव्हते नवलेंना आश्चर्य वाटले. नवलेंनी वर मान करून पाहिले तर विष्णुंचा मुगुट आकाशापर्यंत पोहचला होता. या लीला करून महाराजांनी भक्तांना आपल्या एकेका रुपाची जाणीव करून दिली.
वाशिम च्या जानू महारचा मुलगा हरवला. चारही बाजूंना शोध घेतला पण मुलगा सापडला नाही. तीन महिन्यांनी मुलगा परत आला. त्याच्या हातात खाऊ होता. त्याचे वडील विचारतात एवढे दिवस कोठे होता? तेव्हा तो मुलगा म्हणातो, मी एवढे दिवस शंकर महाराजांच्या सोबत फिरत होतो. त्यांनीच मला खाऊ घेऊन दिला व आताच आणून सोडले.
पुण्याच्या शांताबाई पुणेकर यांचे पती वारले. महाराज बरोबर विसाव्या दिवशी त्यांच्या घरी आले. महाराज म्हणतात की, मी विसावा देण्यासाठी आलो आहे. शांताबाई तुझे सर्व व्यवस्थित होईल असे महाराजांनी म्हटले. शांताबाईना सहा मुले होती. त्यांच्या भावाने त्यांचा व्यवस्थित सांभाळ केला. महाराजांच्या आशिर्वादाने शांताबाईचे खरेच चांगले झाले.
महाराजांचा मुक्काम नाशिकच्या काबुलीबाबा कडे होता. महाराजांच्या दर्शनासाठी नागपूर चे ताजुद्दीनबाबा नाशिकला आले होते. शंकर महाराज झोपत तेव्हा ताजुद्दीनबाबा पहारा देत. मुसलमानांना हे मुळीच आवडत नव्हते. महाराज झोपले की ते त्रास देण्यासाठी येत. जेव्हा मुसलमान येत तेव्हा ताजुद्दीनबाबा चा पहारा असे आणि ताजुद्दीनबाबा त्यां लोकांना साक्षात हनुमंत दिसत. आणि ते मुसलमान पळुन जात. ज्यांच्या साठी साक्षात हनुमंत पहारा देतात यावरून त्यांचा अधिकार किती प्रचंड होता दिसुन येतो.
महाराजांच्या समाधीवर प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर हे दर्शनासाठी गेले. त्यांना दर्शनाची हुरहुर होती. त्यांनी समाधीचे दर्शन घेताच समाधी तुन J११११ (जे अकराशे अकरा) हा ध्वनी घुमतो. समाधीवरच अर्थ बोध झाला. जे म्हणजे ज्ञानेश्वरांचे इंग्रजीतील आद्याक्षर. पुढचे चार वेळा एक म्हणजे ज्ञानेश्वरी चा पहिला अध्याय, ओवी पहिली, ओवीचे पहिले अक्षर म्हणजे ॐ. चार एकचा हा अर्थ. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ॐ चीच साधना मिळाली होती. तीच साधना शंकर महाराजांकडे प्रकट झाली. त्यांना खूप आनंद झाला. स्वामी समर्थ महाराज, माणिक प्रभू, साईबाबा, शंकर बाबा हे चौघे काही वर्ष एकत्र फिरत.
१९२८ सालीच पाकिस्तान होणार असे महाराजांनी सांगितले होते, त्याप्रमाणे घडुन आले. कोणता पुढारी कसा मरणार हे ही महाराजांनी सांगितले होते. कुणावर गोळ्या झाडल्या जातील, विष प्रयोग कोणावर होणार? खुन कोणाचा होणार? विमान पडुन कोण मरणार ? यांची नावे, दिनांक महाराजांनी सविस्तर सांगितले होते.
एकदा श्री शंकर महाराज कलकत्ता येथे गेले असता घडलेला प्रसंग. ऊन, वारा, पाऊस या कशाचीही पर्वा न करता ते एका ठिकाणी बसून होते. हे दृश्यएक श्रीमंत गृहस्थ वारंवार पहात होता. एकदिवस तो महाराजांच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करू लागला. तोच त्याला महाराज त्याला म्हणाले "मी तुझ्या घरी जेवायला येऊ का?" हि कोणी तरी असामान्य विभुतीआहे हे जाणून तो म्हणाला. "अवश्य यावे महाराज" असेसांगितले. व तो महाराजांना घेऊन घरी गेला. त्याने पत्नीला महाराजांविषयीसांगितले. व पंचपक्वान्न भोजनाचे ताट बनविण्यास उभयता आत मध्ये गेले, हे गृहस्थकलकत्त्यातील एका मोठ्या कत्तलखान्याचे मालक होते. वृत्तीने मात्र ते श्रद्धाळू होते. ते उभयता पूजेचे साहित्य घेऊन आनंदात बाहेर आले, आणि पाहता तो काय? महाराजांच्या देहाचे तुकडे इतस्ततः पडले होते. त्यांचे पाय तुटलेले, डोके धडापासून वेगळे, हात देखील फेकलेले. हे दृष्य पाहून अतीव दु:खाने ते दोघे ही बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने ते शुद्धीवर आले. तेव्हा महाराज त्यांना सावध करीत होते. हे पाहून ते हबकलेच. ते म्हणाले की, म्हणाले कि, महाराज किती भयंकर स्वरुप आपण दाखविले. यावर महाराज म्हणाले का "तुझ्या कत्तलखान्यात रोजचं असेच घडत असते. तेव्हा तुला. त्याची भिती वाटत नाही. मग आज का वाटावी?" एवढे बोलून महाराज न जेवताच ते तेथून निघाले. हे झणझणीत अंजन डोळ्यात पडल्याने त्या गृहस्थाने कत्तल खाने बंद करून नवीन व्यवसायात शिरकाव केला.
महाराजांना एकदा नवले म्हणाले, महाराज मला विष्णुपद दाखवा. महाराज नदीत उभे राहिले आणि नवलेंना म्हणाले पहा विष्णुपद. नवलेंना पाण्यात विष्णुपद दिसले. नवलेंनी त्यावर हात फिरवत सरकवत पाहु लागले. विष्णुपद एवढे लांब होते की, ते संपता संपत नव्हते नवलेंना आश्चर्य वाटले. नवलेंनी वर मान करून पाहिले तर विष्णुंचा मुगुट आकाशापर्यंत पोहचला होता. या लीला करून महाराजांनी भक्तांना आपल्या एकेका रुपाची जाणीव करून दिली.
धनकवडीचे शंकर महाराज- प्र. ल. गावडे
संत समागम फळला बा मला! सन्मानाचा झाला लाभ मोठा! या संत नामदेवमहाराजांच्या वचनाची प्रचिती यावी आसा योग माझ्या जीवनात वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी आला होता. सन १९३७ - ३८ चा तो कालखंड होता! अहमदनगर येथील सुप्रसिध्द सरदार मिरीकर यांच्या वाड्यांत मी त्यावेळी रहात होते.नगरच्या सोसायटी हायस्कूल मध्ये मी शिक्षण घेत होतो. सरदार नानासाहेब मिरीकरांचा तो खानदानी वाडा विविध साधुसंतांच्या मधून मधून होणाऱ्या वास्तव्याने भक्तप्रसाद बनला होता. कधी कुई भीकमहाराज कधी उपासनीमहाराज तर नगरचे बालाजीबाबा यांच्या पदस्पर्शाने त्या वाड्याची पुण्याई वाढतच होती. अक्कलकोट स्वामींचे सप्ताह त्याच वाड्यात थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लहान मुले उत्साहाने साजरे करीत असू. अक्कलकोटात हिरवा मका! स्वामी सुखा विसरु नका अशा पालूपदाचा ताल धरीत आम्ही महाराजांचे सप्ताह साजरे करीत असू. अशा त्या वाड्यात एक दिवस आम्हांस श्रीशंकर महाराजांचे दर्शन झाले.
मिरीकरांच्या वाड्यातील आम्ही मुलांनी प्रथम जेव्हा महाराजांना पाहिले तेव्हा काहीसे बावरुन गोंधळून गेलो होतो.कारण महाराजांचा देह अष्टवक्र होता.ते अजानुबाहू असल्याने त्याचे दोन्ही हात गुडघ्याच्याही खालपर्यत आलेले दिसायचे! इतर साधू संन्याशाप्रमाणे त्यांच्या अंगात भगवी कफनी नव्हती, तर पुढे सोगा सोडलेले पांढरे स्वच्छ धोतर व अंगात सैलसर सदरा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, दाढी व केस वाढलेले, डोळे किंचित मोठे, बोलण्यातही क्वचित अस्पष्टता असे शंकरमहाराजांचे ते सोवळे रुप पाहून प्रथमतः आम्ही सर्व मुले मनोमनी काहीसे घाबरुन भेदरुनच गेलो होतो. पण ही भीती महाराजांशीअधिक जवळीक झाल्यावर पूर्ण नाहीशी झाली आणि महाराजांचे सवंगडी होण्याचे महत्भाग्य आम्हा सर्व मुलांना लाभले.
स्वतःशंकरमहाराजांनी मै कैलासका रहनेवाला, मेरा नाम है शंकर! असे आपले मूळ स्थान व नाम सांगितले होते, नाशिक जिल्ह्यांत अंतापूर नावाचे गाव आहे. तेथे श्री चिमणाजी आणि त्यांची पत्नी या दोघांची शिवाची उपासना चालू होती. एका साधूने त्यांना भविष्य सांगून असा दृष्टांत दिला की रानाच्या गर्द झाडीत जा तिथे तुला एक बालक दिसेल. दृष्टांता प्रमाणे ते दोघे पती-पत्नी रानात गेले. तिथे वृक्षाखाली वाघाच्या सान्निध्यात एक बालक खेळताना दिसले. ते त्यांनी घरी आणले. शंकराचा प्रसाद म्हणुन, त्यांनी बालकाचे नाव शंकर ठेवले.
शंकर महाराज यांच्या बाललीलांतून त्यांच्यातील दैवी गुणांची कल्पना त्यांच्या माता-पित्यांना येत होती. महाराजांना भजन कीर्तनाची गोडी होती. हिस्त्रपशूंच्या सान्निध्यात ते क्रिडा करीत. त्यांना वाचासिध्दीही प्राप्त झाली होती. त्याच वाचासिध्दीच्या बळावर त्यांनी आपल्या मातापित्यांना आशीर्वाद दिला की, तूम्हाला जुळी संतत होईल! तो आशीर्वाद पुढे खराही ठरला. नंतर शंकर महाराजिंनी सर्वत्र भ्रमंती सुरुकेली. हिमालयातील केदारेश्वर प्रयाग! इत्यादी तीर्थ क्षेत्रांतुन त्यांचा प्रवास झाल्यावर त्यांच पहिलं प्रकटन सोलापूर येथे शुभराय महाराजांच्या मठांत झालं तत्पूर्वी अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक हैद्राबाद तुळजापुर, औदुंबर, श्रीशैल अशा स्थानी त्यांनी भ्रमंती केली.
श्रीशंकरमहाराज योगिराज होते याचा अनेकांनी विविध प्रकारे अनुभव घेतला आहे. तथापि ते स्वतः मात्र वारंवार सांगत "सिध्दिच्या मागे लागू नका". ते स्वतः खऱ्या अर्थाने सिध्दिच्या मागे लागले नाहीत. पण त्यांच्या ठायीचे अलौकिकत्व चिकित्सक बुध्दिवानांनाही मान्य होते. स्वतः जे कृष्णमुर्ती हे त्या दृष्टीने त्यांच्याकडे आकृष्ट झाले होते. तसेच न्यायरत्न धुंडिराजशास्री विनोद, आचार्य प्र. के. अत्रे, बालगंधर्व इत्यादी मान्यवरांना त्यांच्या ठायीचे योगसामर्थ्य प्रचीत होते. शंकर महाराजांचे शिक्षण, अध्ययन किती झाले होते हेही ज्ञात नाही.पण काही दीडशहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजी भाषेतून उत्तरे दिली. महाराजांच्या अनेक चमत्कारांची अनुभूती काही भक्तांना आली आहे. माझे भाग्य असे की, त्यांच्या सहवासात राहण्याची, त्यांच्याबरोबर बोलण्या चालण्याची, त्यांच्याशी खेळण्याची, भोजन करण्याची सुसंधी मला मिळाली मला मिळाली होती.
श्रीशंकरमहाराज व सरदार नानासाहेब मिरीकर यांची प्रथम भेट झाली. ती चंद्रभागे च्या वाळवंटात! हा मोठा विलक्षण योगायोग होता. या भेटीचे तपशीलवार वर्णन सेवाव्रती सरदार नानासाहेब मिरिकर या ग्रंथात कै. रा. गो. तथा बाबासाहेब मिरिकर यांनी पुढील शब्दांत केले आहे. एक वेडसर दिसणारा, शरीर अष्टवक्र असलेला, बावळट चेहऱ्याचा मनुष्य नानासाहेब मिरिकरांच्या जवळ हसत उभा होता. नानासाहेबांना वाटलं, 'हा कोण वेडा? त्यांनी आपल तोंड दुसरीकडे वळविलं. ती व्यक्ती नाना साहेबांकडे पाहून पोरकट पणे हसत होती. तोच पाचपंचवीस माणसे त्या व्यक्ती कडे धावतच आली व त्यांच्या पाया वर डोकं ठेवण्यासाठी त्यांची झुंबड उडाली. त्यांतील एका माणसानं नानाहेबांना सांगितलं, 'हे महान योगी शंकरमहाराज आहेत'. पुढं या वेडसर दिसणाऱ्या माणसानं "आम्हाला मिरिला यायच आहे" अशी इच्छा व्यक्त केली. मग नानासाहेबांनी आपल्या गाडीत बसवून त्यांना मिरिला आणलं. त्यांनी त्या वेडसर दिसणाऱ्या व्यक्तीचा जवळून अभ्यास करुन ते महाराजांना सद्गुरु मानावयास लागले. त्यांनी महाराजांवर एक अभंग रचला -
वेष घेतला बावळा, अंतरी शुध्दज्ञानकळा | ऐसा सद्गुरु लाघवी, नानारंगी जन खेळवी |
बाल पिशाच्य उन्मत्त, लीला दावी तो विचित्र | लूळा पांगळा, जडमूढ,सांगेना अंतरीचे गुढ |
शंकरदासाचे लक्षण, तेथे राहे नारायण ||
अशा योगिराज महाराजांना मी नगर येथील मिरिकरांच्या वाड्यात लहानपणी पाहिले होते .महाराज आम्हा मुलांशी शिवाशिवी खेळतांना परब्रह्म निष्काम या अभंगातील बालकृष्णाच्या बालक्रिडेची आठवण देत नाना साहेब आम्हा मुलांना प्रोत्साहान देत. त्या काळात महाराजांनी आम्हा मुलांना सांगितलेले काही विचार अजून स्मरतात. महाराज म्हणाले 'देवाला प्रसन्न करण्यापेक्षा तुमच्यातील देवत्व प्रकट करा. तुमच्यातील काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यांना तिलांजली दिलीत, की तुमच्यातील देवत्व प्रगट होईल. देव बाहेर शोधण्यास आपली शक्ति वाया घालवू नका. या शक्तिचा उपयोग आपल्यातील दुर्गुण घालविण्यासाठी करा. म्हणजे आतूनच देवत्वाची प्रभा बाहेर पसरु लागेल. अरे, आचरण महत्वाचं. ग्रंथवाचन निअभ्यास आचरणात येईल तेवढाच करा. माता-पित्यांची सेवा करा. कुलदेवतेची आराधना करा. यापेक्षा अधिक काही नको.'
इंग्रजी दिनांक २४ एप्रिल १९४७ (वैशाख शुध्द अष्टमी) रोजी श्रीशंकर महाराजांनी समाधी घेतली. भारतीय कालगणने नुसार वैशाख शूध्द, अष्टमी शके १८६९ हा त्यांचा समाधीचा सोहळा दीन साजरा केला जातो. श्रीशंकरमहाराजांचा थोडा सहवास घडला. शब्द कानी पडले. त्यांचे आचरण पाहावयास मिळाले. म्हणूनच "संत समागम फळला बा मला ! सन्मानाचा झाला लाभ मोठा !" असे जे म्हटले आहे त्याचा प्रत्यय घेण्याचे भाग्य मला कळले.
हैद्राबादच्या नवाबाची अखेर
हैद्राबादचा पहिला निजाम महाराजांचा भक्त होता. त्यानंतर त्याच्या गादीवर आलेल्या दुसऱ्या निजामाने आपल्या दिवाणाकरवी महाराजांना हाकलून दिले. त्यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी गावाबाहेर नदीकिनारी आपला मोर्चा वळवला. गावात पाऊस वादळ सुरू झाले. नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. गावात पाणी वाढू लागले. निजाम घाबरला. त्याचा दिवाण सालारजंग याच्या सांगण्याने निजामाला आपली चुक समजली. निजामाने गावाबाहेर जाऊन श्री शंकर महाराजांना राजवाड्यात आणले. अपमानाबद्दल क्षमा मागितली. राजसिंहासनावर बसवून पूजा केली. तेव्हा महाराज शांत झाले. खणानारळाने नदीची ओटी भरल्यावर पाणी ओसरले. आणि तसे खरेच झाले. श्री शंकर महाराज निजामाला म्हणाले "गुरूचरित्रातील तू धोबी. मीच तुला राज्य दिले. तू मला विसरलास? तुझ्या वैभवाचा अंत जवळ आला आहे. तुझे राज्य लवकरच संपेल. ते वाचवण्यास आलो होतो. पण आता ते शक्य नाही." असे बोलून महाराज तडक पुण्याला आले.
श्री शंकर महाराज- एक अनाकलनीय गूढ सत्पुरूष
शंकर महाराजा बाबा बाबत दुर्गाअष्टमीचे एक विशेष महत्व आहे. शंकर महाराजां बद्दल शंकर महाराज कळण्यासाठी कित्येक जन्म घेतले तरी महाराज काय आहेत कुणाला ही कळणार नाहीत. महाराज म्हणजे सिगारेट पिणे, चहा पिणे, किंवा दारु पिणे, चमत्कार करणे, हे नाही. महाराजांनी काय सांगितले 'मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है' याचा अर्थ काय होतो? आपण शंकर महाराजांच्या समोर ऊभे राहुन जर पाहिले तर आपले मन काय म्हणते? विचारा मनाला महाराज सिगारेट दारू चहा पितात का? ऊत्तर नाही म्हणून येईल. कारण आपण महाराजांना आतुन पहातो. महाराज सांगतात तुम्ही माझे बाह्यवर्तन पाहु नका, आतला शंकर ओळखा. अहो महाराजांना फक्त प्रेम पाहीजे. शंकर महाराज म्हणजे प्रेम फक्त प्रेम. महाराज नापासांची शाळा चालवतात. पहील्या रांगेतील व शेवटच्या रांगेतील सर्वांवर महाराजांचे सारखेच लक्ष असते. महाराजांना वशिला चालत नाही. जो फार पुजा-अर्चा करतो व जो काहीच करित नाही, दोघेही महाराजांना प्रिय. अहो महाराजांना अंतकरणा पासुन हाक मारा, महाराज हजर. महाराज प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान आहेत हाक मारुन पहा.
श्री शंकर महाराज म्हणजेच साक्षात दत्तगुरुंचा अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ मीच आहे हे त्यांचे अवताराचे स्वरूप (श्री शंकर लीलेमध्ये अध्याय ४ मध्ये दिलेला संदर्भ) याची प्रचिती आजही भक्तांना येते. ज्या भक्तांना शक्य होईल त्यांनी "श्री शंकर महाराज स्तवन" पठण करावे व संकट मुक्त व्हावे हि नम्र विनंती.
श्री शंकर महाराज स्तवन
संतवर्य श्री योगिराज प्रभु शंकरमहाराज
वंदन करुनी चरणि अर्पितो भक्तीचा साज।।१।।
अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी
सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी।।२।।
इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही
सर्व देवता आमच्या अगदी आहेत हो तुम्ही।। ३।।
सकलहि देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत
अधिकार हा प्रचंड तुमचा कळूनिया येत।।४।।
अशक्य जे जे जगी, सहज ते तुम्हालाच शक्य
तुम्ही कोण? हे ओळखणे ही मानवा न शक्य।।५।।
जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता
जे जे तुमच्या मनात येईल, करून दाखविता।।६।।
भूत भविष्य नि वर्तमान हे तुमच्या हातात
महाकाळ हा तुम्हापुढे हो होई भयभीत।।७।।
तुम्हा पाहणे, तुम्हांस स्मरणे, घेणे दर्शन
भाग्यविण या गोष्टी साऱ्या, येती ना घडुन।।८।।
तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा
अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा।।९।।
धरले आम्ही भावे तुमचे, जगी घट्ट चरण
सोडणार कधि नाही आम्ही, आले जरी मरण।।१०।।
नित्य घडावे स्मरण नि पूजन, देहच रंगावा
शंकर महाराजांचा जयजयकार मुखी व्हावा।।११।।
अकरा कवनांचे हे स्तोत्र
पठण करता दिनरात
विजयी होईल सर्वत्र
कामना पूर्ण होतील।।१२।।
।। संतवर्य योगीराज सद् गुरु राजाधिराज शंकर महाराज की जय ।।
सद्गुरू दादामहाराज जगताप
श्री दत्ता महाराज जगताप (दादा महाराज) हे श्री सद्गुरु शंकर महाराज दगडे यांचे आवडते शिष्य. आपल्या नित्य साधनेमुळे शंकर महाराज यांच्या कृपाशिर्वादांने त्यांचे जनकल्याणाचे कार्य श्री दत्त मठ राजेवाडी सासवड येथे सुरु केले. नाशिक मध्ये त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यांना तेथे शंकर महाराज अवतार मानले जाते. तसेच पुण्यात चाकण मध्ये ही त्यांचा भक्त परिवार आहे. अत्यंत प्रेमळ स्वभावाने भक्तांना बोलतात. नेहमी आनंदाने भक्तांच्या समस्या समजून निवारण करतात. श्री सद्गुरु शंकर महाराज दगडे यांनी जेव्हा त्यांना सिध्दी प्रधान करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी त्या सिध्दी बाबांच्या चरणावर अर्पण केले. जसे स्वामीसमर्थ व शंकर महाराज अगदी तसेच नाते त्यांचे म्हणावे लागेल. दर अष्टमीला श्री दादा महाराज हे धनकवडी येथील श्री शंकर महाराज मठ येथे येत असतात. अंत्यंत साध्य पोशाखात येतात. त्यांना चहा आणि सिगारेट अंत्यंत प्रिय आहे. त्याच्या सहवासात एकदा त्याच्या मठात असताना एक सिगारेट संपली, दुसरी सिगारेट पेटवित असत. ते पाहुन मी थक्क झालो. एवढे सिगारेट पिल्यास कँसर होऊ शकतो असे मी सहकारी मित्रांना म्हणालो. तेव्हा ते म्हणाले डॉक्टरांनी त्यांच्या छातीचा एक्सरे काढण्यात आले. त्या एक्सरे मध्ये ॐकार दिसला असे म्हणतात. पण त्यांची सिगारेट ओढण्याची क्षमता अतिदिव्य आहे! हि सद्गुरुंची लिला आहे. त्यांचा सहवास आम्हाला लाभले. जेष्ठ भक्ति गीत गायक श्री अजित कडकडे हे पुण्यात आल्यास त्यांचे दर्शन घेतल्या शिवाय जात नाहीत! व्यक्तीमत्व अगदी साधे व सतत साधनेत लिन असतात. ते मठात जेव्हाही येत तेव्हा बाबांच्या चरणाजवळ बसुन सेवा करत असत. बाबांना ते दिसले कि बाबांना खुप आनंद व्हायचा, जशी माय लेकराची संगत! बाबा म्हणत माझे कार्य अनेक मठामधून चालते आहे! त्यातील एक मठाधिपती श्री दत्ता महाराज जगताप होत. त्यांचा मठ हा राजेवाडी सासवड पुणे येथे आहे!
श्री शंकरमहाराज व स्वामीसमर्थ, एक हृदयस्पर्शी प्रसंग
उठल्यापासून शंकरला उदासीन वाटायला लागलं. साधनेत मन लागेना. ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण अर्थ लागत नव्हता. स्वामींची सारखी आठवण यायला लागली. अनामिक हुरहूर लागायला लागली. असं का होत आहे ते काळात नव्हतं, स्वामींच्या भेटीसाठी जीव कासावीस होत होता. शेवटी स्वामींनाच आवाहन करून विचारलं "स्वामी आज काय होतंय मला कळत नाही, माझं काही चुकल का?"
"नाही बेटा". हे शब्द कानावर ऐकायला आल्यवरती शंकरने पाहिलं एका वटवृक्षाखाली स्वामी पद्मासनात बसले होते. मुखावर कोटी सूर्याचं तेज होते, नजर नेहेमीसारखी करडी नव्हती त्यात आईचे प्रेम झिरपत होते. शंकर आनंदाने पुढे गेला आणि स्वामींना नमस्कार करू लागला. स्वामींनि त्याला आपल्याकडे ओढून घेतलं ,आपल्या हृदयाशी बसवलं. शंकरच सर्व अंग कंपित होत गेलं. स्वामींनी शंकराकडे पाहिले आणि एक लखलखणारी ज्योत स्वामींच्या डोळ्यातून बाहेर आली आणि शंकरच्या हृदयात स्थिर झाली. शंकरला कळलं "देहाचं सगुण सरलं, देहाचं अनुबंधन तुटलं." शंकर कळवळून ओरडला" स्वामी मला पोरकं करून असे कसे जाऊ शकता?" "पोरकं?" आकाशातून उत्तर आलं.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।
"अनन्यभावाने शरण येऊन जो आमची भक्ती करतो, नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम आम्ही चालवतो. आम्ही आहोत तुझा सांभाळ करायला.वडाची मूळ धरून राहा आणि आम्ही कुठेही गेलेलो नाहीत आम्ही तर तुझ्यामध्येच आहोत. हम गया नही जिंदा है."
शंकरने डोळे पुसले. आणि हळू हळू सावरायला लागला. तो दिवस होता, मंगळवार चैत्र वद्य त्रयोदशी.शके १८००. ३० एप्रिल १८७८. आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन अक्कलकोट स्वामींनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानंदी निमग्न झाले. तो शिष्योत्तम शंकर म्हणजेच "श्री शंकर महाराज".
श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
उजळल्या पंचप्राण ज्योती ! सहजचि ओवाळू आरती !
मिटवूनी क्षणिक नेत्र पाती ! हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती !
श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी ! जणू का भाविकास जननी !!
संस्कृती पाश, सहज करी नाश, मुक्त दासास !
करी कामधेनु आमुची ! करू या ज्ञानसागराची !! १!!
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
ध्यान हे रम्य मनोहर से ! ध्यान धृड जडले नयनिसे !
भक्त हृदयाकाशी विलसे ! तेज ब्रम्हांडी फाकतसे !
पितांबर शोभवित कटीला ! भक्त मालिका हृद पटला !!
भक्त जन तारी, नेई भवतीरी, पतित उद्धरी !
करू नित्य सेवा चरणांची ! करू या ज्ञानसागराची !! २ !!
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
लक्षी जग प्रचंड नीज नयनी ! लक्षी ब्रम्हांड हृद्य भुवनी !!
हरिहर विधी, दत्त त्रिगुणी ! आठवी नित्यभूवन सुमनी !!
दत्तमय असे योगिराणा ! ओम कारीचे तत्व जाणा !!
धारा दृढचरण, दास उद्धरण, जनार्दन शरण !
आस पुरवावी दासांची ! करू या ज्ञानसागराची !! ३ !!
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
!! अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज कि जय !!
श्री शंकर महाराजांचे परमभक्त श्री बाबुराव रुद्रकर
पाश-विमुक्त बाबुराव रुद्रकर हे शंकरगुरूंच्या समाधीचे परमसेवक ठरले. महाराजांच्या समाधीनंतर समाधीवर त्यांनी पंचवीस वर्षे निस्सीम सेवा केली. त्या पश्चात एक तप त्यांनी व्यक्तिगत सेवा करून देह ठेवला. देवाने दिलेल्या वैभवात कोणीही लोळेल, पण प्रतिकूलतेच्या खाईमध्ये न खंतावता वैभवात असल्याप्रमाणे भक्तीमध्ये मग्न राहणार्याला "रुद्र" म्हणतात!
धनकवडीचा हा भाग किर्द, घनदाट झाडींनी भरलेला जंगलाचा भाग होता. या भागात दिवसा फिरायचे तरीही धाडस ठरावे अशी स्थिती होती. तेव्हा श्वापदांचे भयही होते. तरीही त्या स्थितीत बाबुराव समाधीपाशी थांबून राहिले. कुटुंबाची ओढ वा जवाबदारी त्यांना किंचीतही विचलीत करू शकले नाही. त्याला कारणही तसेच घडले. परिसरात रानटी कुत्र्यांच्या वावर होता. समाधीनंतर रात्रीच्या वेळी त्यांचा तिथे वावर आणखीनच वाढला. मातीचा ढिगारा, त्यावर असंख्य हार, त्या खाली महाराज विसावले आहेत. रात्री कुत्र्यांनी तिथे जमीन उकरायला सुरुवात केली. त्यांना दगडाने हाकलत रुद्रकरांनी पहारा केला. कित्येक महिने ते याच धनकवडीत कुठेतरी दूर असणार्या मोजक्याच घरांपैकी पाच घरी जाऊन भिक्षा मागायचे. जे मिळेल ते आणून देवास नैवेद्य दाखवून उर्वरित भिक्षान्न प्रसाद म्हणून भक्षण करायचे. बाबुराव घरी न गेल्यामुळे घरच्या लोकांची मोठीच तारांबळ उडाली. शेवटी माग काढत त्यांची पत्नी समाधीवर पोहचली. परंतू नवर्याला परत नेण्यास अपयशी ठरली. शेवटी काही दिवसांनी त्यांच्या पत्नीनेही समाधीवर येवून राहण्याचा निर्णय घेतला. आज जिथे ट्रस्टच्या खोल्या आहेत, तिथे तात्पुरता आसरा बांधून ते राहू लागले.
यापेक्षा आणखी काही प्रसंग असे आहेत की त्याविषयी वाचताना भक्तांच्या अक्षरशः थरकाप उडावा. आजहि तुम्ही पाहाल तर लक्षात येईल की महाराजांची समाधी उतारावर आहे. पावसात पाण्याचे लोट येऊ लागले की समाधीवरची माती निघून जायची. सकाळचे संरक्षण होत असले तरी रात्रीचे काय करणार? अशावेळी बाबुराव आपल्या शरीराचा बांध करून समाधीच्या वरच्या अंगास आडवे पडून राहत. पुढे काही भक्तांनी विटांचे बांधकाम समाधीवर केले. तेव्हाही आपल्या परमसदगुरुंना पावसाळ्यात पावसाचा त्रास होऊ नये म्हणून छत्री, तर उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून धरता येईल तसे आच्छादन धरून हा पांडुरंगाच्या पुंडलिकासारखा निस्सीम भक्त तिथे अथक उभा असायचा. विटांच्या समाधीवर नंतर झोपडी झाली. बांधकाम होत गेले. सेवाधारी बाबुराव आपल्या समर्पित भावनेने समाधीवरच जीवन कंठायचे.
सुरुवातीच्या काळात समाधीवरील दिवाबत्ती नैवेद्यासाठी सोलापूरची भक्तमंडळी तत्पर होती. विशिष्ट वर्गणी गोळा करून ती भस्मेकाका, फुलारी, कोराड मास्तर, पेंटरकाका आदी मंडळी पुण्याला बाबुरावांकडे पाठवू लागली. काही वेळा आळीपाळीने ते फेर्या मारीत. धनकवडीच्या समाधीपुढे चैतन्य नगर मठ, बालाजी नगर, धनकवडी येथे त्यांच्या नावे असलेला रुद्र शंकर मठ आजही त्यांची आठवण जागवतो. पाश-विमुक्त बाबुराव रुद्रकर हे शंकरगुरूंच्या समाधीचे परमसेवक ठरले. महाराजांच्या समाधीनंतर समाधीवर त्यांनी पंचवीस वर्षे निस्सीम सेवा केली. त्या पश्चात एक तप त्यांनी व्यक्तिगत सेवा करून सन १९८५ ला देह ठेवला.
श्री संजय नारायण वेंगुर्लेकर यांनी अथक परिश्रम घेऊन महाराजांच्या संबंधीत त्या त्या स्थळांना तसेच व्यक्तिंना भेटून ही माहिती गोळा केली आहे.
शंकरभक्तांचे गुरुचरीत्र ॥ श्री शंकर गीता ॥ मूळ पारायण पोथी. गद्य भावानुवाद. कृपांकीत घराण्यांचा शोध या पोथीत ही सर्व माहिती आपणास वाचायला मिळेल.
श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज भेट
आणि कित्येक दिवसांनी त्यांच दर्शन त्याला झालं. पण अगदी वेगळ्या ठिकाणी. वेगळ्या प्रसंगानं! त्या वेळी शंकर दगडू साळी या तमासगीराच्या गुरूच्या तमाशात काम करित होता. त्याच्याकडे सोंगाड्याचं काम होतं. त्या दिवशी चिलयाबाळाचा वग चालला होता.त्यात शिवशंकराच काम करणार्या नटानं नेहमीप्रमाणे आदन्या केली. म्हणाला," मार त्या चिलयाला. उडव त्याचं मुंडक." आणि हा वगातला शंकर आहे याच भान न राहून नवशिक्या शंकरने खरोखरच त्या मुलावर तलवारीचा वार करून सपकन त्याचं डोकं उडवलं! ते पाहताच एकच गोंधळ उडाला. खून.... खून... करून लोकांनी शंकरला पकडलं. कुणीतरी पोलीस पाटलाला आणलं. शंकर अतिशय घाबरला. मनात देवाचा धावा करू लागला. म्हणाला, "देवा, तू सांगितलंस म्हणून ना मी त्याला मारलं? यात माझं काय चुकलं? मला का ही शिक्षा? ही हत्या तुझ्याच पायी घडलीय. आता तूच मला यातून सोडवल पाहिजेस. शिवशंकरा, धाव. वाचव मला."
तेवढ्यात तिथे तोच जंगलात भेटलेला भव्य पुरुष अवतरला. त्यानं पोराचं उडवलेलं मुंडकं धडाला चिटकवलं. बघता बघता पोरगं उठून बसलं. लोकांनी जयजयकार करीत त्या पुरुषाला गराडा घातला. या सार्या गडबडीत शंकर तिथून बाहेर पडला. या लोकांपासून जितकं दूर जाता येईल तितकं दूर जावं म्हणून जीव घेऊन पळत सुटला. "थांब. थांब." मागून कुणीतरी त्याला थांबवीत होत. त्या आवाजात जबर होती. शंकरनं वळून पाहिलं तर तोच तो जंगलातला माणूस, ~ त्या तमाशातल्या पोराला वाचवणारा. हा नक्कीच आपल्याला मारायला आला आहे, या विचारानं घाबरून शंकर थांबायच्या एवजी अधिकच जोरात पळू लागला. रस्ता खाचखळग्यांचा, त्यातून सगळीकडे अंधार गुडूप. शंकरला धड पळता येईना. तेवढ्यात कशाची तरी ठेच लागून तो सपशेल खाली पडला. आणि त्याचा पाठलाग करणार्या त्या माणसानं त्याला गाठलंच. त्याला उठवीत तो म्हणाला, "भिऊ नकोस, बेटा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. ऊठ. हे बघ, आपण पळायचं नसतं. इथेच, या संसारातच पाय घट्ट रोवून उभं राहायचं असतं. दीपस्तंभासारखं. इतरांना योग्य वाट दाखवण्यासाठी. तू या असल्या मायाजालात गुंतू नकोस. तुझ्या वेड्यावाकड्या देहाचा हे लोक करमणुकीसाठी वापर करतात. सोड त्यांचा नाद. तुझा अवतार आहे आंधळ्यांना वाट दाखवणार्या डोळसाचा. द्रष्ट्याचा."
शंकर त्यांच्याकडे विस्मयांन पाहातच राहिला. मनात म्हणाला, "म्हणजे हे आपल्याला मारायला नाही आले तर! शिकवायला आले आहेत. आजपर्यंत असं हक्कानं काही सांगणारं, शिकवणारं वडीलधारं माणूस आपल्याला भेटलच नाही. किती मायेनं सांगताहेत!' शंकरच मन भरुन आलं. त्याचे मोठे मोठे निरागस डोळे भरभरून वाहू लागले. त्यानं त्यांचे पाय धरले. त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचा उध्दारकर्ता म्हणाला, "जा बेटा, हिमालयात जा. केदारेश्वरी जाऊन स्वतःचा शोध घे."
"इतक्या दूर, मी एकटाच !", "नाही. तू एकटा नाहीस. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आठवण काढलीस की, तुझ्यासमोर उभे राहू. स्मरणात दर्शनम!"
आम्ही यजुर्वेदी ब्राम्हण । आमुचे नाव नृसिंहभान ।
मूळ पुरुष वटवृक्षस्थान । दत्तनगर निवासी हो ॥
शंकरला यातलं एक अक्षरही कळलं नाही. त्याच्या बावरलेल्या चेहर्याकडे पाहत ते यतिवर स्मित करीत म्हणाले, "तू आम्हाला नुसतं स्वामी म्हण. स्वामी समर्थ."
श्री शंकर महाराज व डॉ धनेश्वर- श्री शंकर महाराजांचे परम शिश्य डॉक्टर नागेश रा. धनेश्वर यांचा साधना कालातील अनुभव
आप्पां जवळ एक शाडूचा बालकृष्ण होता. ते त्याची नित्यनेमाने षोडशोपचारे पूजा करीत. मनोभावे केलेल्या त्यांच्या पुजेने काही दिवसा नंतर बालकृष्ण आप्पांशी बोलू लागला. त्याला ठेवलेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तो देव्हाऱ्यातून खाली ऊतरून खाऊ लागला. त्याच्या या बाल लीला पाहुन आणी मधुर बोल ऐकून आप्पांना अत्यंत आनंद झाला. त्याना वाटू लागले, 'आपण नामदेवाच्या योग्यतेचे झालो. ही शाडूची निर्जीव जड मुर्ती भक्तिने सजीव झाली आहे. पण लगेच त्यांची चिकीस्तक बुद्धी म्हणु लागली, तुझ्या कल्पनेचे खेळ नसतील कशावरून? हे जर खरच घडत असेल तर कृष्णानं काहीतरी खूण दाखवली पाहिजे. दुसऱ्याच दिवशी तशी खूण मिळाली. नैवेद्य खाऊन त्या गोंडस करकमलातलं सोन्याचं कडं बाळकृष्णानं ताटात ठेवून दिलं. प्रत्यक्ष वस्तू देऊन प्रचिती आणून दिली. तरीही आप्पांचं समाधान झालं नाही. ते विचार करू लागले. घडल्या घटनांचा शोध अंतर्यामी घेऊ लागले. आणि त्यांना एकदम जाणवल की हा सारा आपल्या प्रगाड ईच्छा-शक्तिचा खेळ आहे दुसरं काही नाही. झालं! लगेच ते उठले आणि त्यांनी त्या कृष्णमुर्तीचे तुकडे तुकडे करुन खिडकीतून फेकून दिले. आणि नवल असं की, त्याच वेळी शंकर महाराज त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. लहान मुलासारख्या टाळ्या पिटीत आनंदानं म्हणू लागले, "डाँक्टरचा देव मेला, डाँक्टरचा देव मेला!!" आप्पा म्हणाले, "सत्य आहे महाराज. देव मेला आणि मरताना तो डाँक्टरचा अहंकार बरोबर घेऊन गेला. किंबहूना बाळकृष्ण नव्हे, अहंकारच मेला."
सदगुरू शंकर बाबा महाराज की जय
अष्टमहासिद्धीचा लाभ
डाॅ धनेश्वरच्या जन्माअगोदर महाराजांनी त्यांच्या वडिलांना आशिर्वाद दिला. तुझ्या पोटी शिकलेला योगी जन्माला येईल. तेच डाॅ. धनेश्वर होत ! ते प्रथम श्रेणीतील MBBS पास होते. डाॅ धनेश्वरांच्या दवाखान्यात महाराज येऊन बसत. एक खेडवळ माणूस बाकावर पाय ठेवून बसून असतो. म्हणून काही पेशंटनी डॉक्टरांकडे तक्रार केली व ह्या माणसाला घालवून द्या म्हणून सांगितले. त्यावर डॉक्टर म्हणत, 'अहो ते माझे गुरू आहेत. ते येतात म्हणून माझा धंदा चालतो व तुम्हाला गुण येतो. माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर!' महाराजांवरील डॉक्टरांची भक्ती दिवसेंदिवस वाढत होती. एक दिवस त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा ठरला. महाराजांना त्यांना काहितरी द्यायचे होते. त्या दिवशी बाजारही होता. महाराज दवाखान्यात आले. त्यांनी डाॅ धनेश्वरना सांगितले, "गावाबाहेर वेश्यांची वस्ती आहे. तेथे शांताबाई नावाची वेश्या श्री स्वामी भक्त आहे. तीला भरलेल्या बाजारातून हाताला धरून आण. मी दवाखान्यात थांबतो." "संताच्या घरची उलटी खुण" हे डॉक्टर साहेबांना माहीत होते. त्यांनी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे केले. वेश्यावस्तित तिच्या माडीजवळ जाऊन शांताबाईंना हाक मारली. ती बाहेर आल्यावर तुला शंकर महाराजांनी बोलवले म्हणुन सांगितले. तिने कुंकवाचा करंडा पदरात घेतला व डॉक्टर साहेबांबरोबर हात धरून निघाली. गावाचा बाजाराचा दिवस. प्रचंड गर्दी अशा परिस्थितीत लोकांच्या नजरेतून डॉक्टर सुटले नाहीत. लोक टिंगल करू लागले. "शांताबाई वेश्या व डॉक्टरांचे लफडे आज समजले" अशी वाक्ये लोक बोलू लागले. ती दोघे दवाखान्यात आली. महाराजांनी दोघांना दवाखान्यात बसवले. डॉक्टर घनेश्वरांच्या डोक्यावर हात ठेवला व त्यांना अष्टमहासिद्धी बहाल केल्या. त्याचबरोबर शांताबाईंना सद्गुरु भक्तीचा प्रसाद दिला. दोघे धन्य झाले. हे झाल्यावर डॉक्टरांनी महाराजांना स्पष्ट विचारले "महाराज एवढे आज मला दिले, धन्य धन्य झालो. पण उद्या पासून मला गावात दवाखाना चालवायला नको. माझी सर्वत्र टिंगलटवाळी सुरू आहे." त्यावर महाराज म्हणाले "वेड्या तु संपूर्ण आयुष्यभर जेव्हढ्या टिंगलटवाळ्या केल्यास त्या शिल्लक होत्या. त्या जोपर्यंत जात नव्हत्या तोपर्यंत तू निष्कलंक होत नव्हतास. त्या आता मी लोकांना परत केल्या. तुला मुक्त केले. आजपासून तुला जे प्राप्त झाले ते संभाळ आणि यापुढे कोणाची टिंगलटवाळी करू नकोस"
ह्या महाराजांच्या उपदेशाची त्यांनी आयुष्यभर जपणूक केली.
शंकर महाराज समाधीस्थान, एक अद्भुत व अनोखा प्रासादिक स्थान
पुण्यातील स्वारगेटकडून कात्रज कड़े जाताना रस्त्यावर, स्वारगेट पासून दोन अडीच किलोमीटर वर डाव्या हाताला एक मठ लागतो. हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा मठ!
शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दर उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तर घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील. आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात . ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर व पद्मावती या श ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला , डॉक्टर घनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारीना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला निट धर. फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते बजरंगबलीच्या रुपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय ? सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. अनंतकोटी ब्रह्म्हांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय अश्या घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला. (वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे.)
समाधीत ठेवल्यावर बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्रो त्या घनदाट अंधारात भयाण जंगलात न घाबरता समाधी सोबत राहिले. सारी भक्त मंडळी घरी निघून गेली. महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली. प्रथम समाधी बांधली गेली नंतर एक पत्र्याची शेड असे करता करता असे आजचे भव्य दिव्य समाधी मंदिर उभे राहिले. आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
शंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व
शंकर महाराज समाधी घेतल्या नंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले. स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले. एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले. व एका भक्ताला समाधी मठात विराट रुपात दर्शन दिले. १९४५ साली दिगंबर सरस्वती राजयोगी अन्ना महाराजांच्या दर्शनास गेले असता मी २१ वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईन असे सांगितले होते. १९६६ साली वाघोड ला उत्सवात शंकर महाराज भेटले त्यांना घेवून रावेर येथे आले. तेथे सर्वांनी पाद्यपूजा केली. नैवेद्य दिला. वाजंत्री आणली. अन्ना महाराज व वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला. नंतर त्याच्या घरी मुंबईला महाराजांना आणले. त्याच्या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्याच्या सासर्याला टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली. आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी जपून ठेवला आहे. सौ. उमाताई व श्री शंकरराव नेरुरकर (आयडियल बुक डेपो कंपनी चे मालक ) हे दोघे १९८९ साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी रात्रो २ वाजता बोरीवली येथे L. I .C. कॉलोनी येथून घरी येत असता दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले. सिगारेट व माचीस घेवून झाडीत अदृश्य झाले. असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होवून पहात राहिले. धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता. वाघ नेहमी येत. पण कोणाला कसलीही इजा झाली नाही. एका भक्ताला रात्रो समाधीतून बाहेर येउन दर्शन दिले. महाराज समाधीतून बाहेर आले व आपला पाय हंडीपर्यंत नेउन हंडी हलवली. हे अभ्यंकरानी समाधी नंतर ३ वर्षाने अष्टमीच्या रात्री पहिले. अभ्यंकरांची मुलगी आजारी असताना महाराज घरी आले व अभ्यंकराना भेटले. टोपी चपला सोडून संडासात गेले. लगेच त्यांनी चप्पल टोपी पेटीत लपवून ठेवल्या बराच वेळाने संडासात पहिले तर महाराज तिथे नव्हते. व पेटीतील लपवून ठेवलेली चप्पल टोपी नाहीशी झाली. पुण्याच्या लाकडी पुलावर एका माणसाला शंकर महाराज नावाने एक माणूस भेटत असे. गप्प चालत असे. मी धनकवडी ला राहतो म्हणून सांगत असे दोन दिवस शंकर महाराज आले नाहीत म्हणून तो शोधत धनकवडीला मठ्ठात आला. बाबुराव रुद्रानी महाराजांची समाधी दाखवली. तो गृहस्थ समाधी समोर पाया पडून निघून गेला. सोलापूर दक्षिण कसबा पेठेत राहणारे श्री दादा फुलारी सौर्गावकर यांना महाराजांनी समाधी नंतर त्याच्या घरी जावून चहा व सिगारेट अंगावरचा सदरा व पायजमा मागितला तो दिल्यावर चल माझ्या बरोबर असे सांगितले. सौर्गावकर गेले नाहीत. पण त्या नंतर ८ दिवसांनी सौर्गावकरांनी देह ठेवला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा महाराज म्हणत माझ्या गुरूचा जप आहे. माझा गुरु व मी वेगळा नाही. जो माझ्या गुरुचा जप करेल त्याचे सर्वच मनोरथ पूर्णच करावयाची जबाबदारी माझी राहील. माझे स्मरण करा. व माझा अनुभव घ्या. महाराजांची वक्तव्ये आजही खरी ठरतात.
श्री स्वामी समर्थ व श्री शंकर महाराज भेट
त्या वेळी शंकर (श्री शंकर महाराज) दगडू साळी या तमासगीराच्या गुरूच्या तमाशात काम करित होता. त्याच्याकडे सोंगाड्याचं काम होतं. त्या दिवशी चिलयाबाळाचा वग चालला होता. त्यात शिवशंकराच काम करणाऱ्या नटानं नेहमीप्रमाणे आज्ञा केली. म्हणाला, "मार त्या चिलयाला. उडव त्याचं मुंडकं." आणि हा वगातला शंकर आहे याच भान न राहून नवशिक्या शंकरने खरोखरच त्या मुलावर तलवारीचा वार करून सपकन त्याचं डोकं उडवलं! ते पाहताच एकच गोंधळ उडाला. खून! खून! करून लोकांनी शंकरला पकडलं. कुणीतरी पोलीस पाटलाला आणलं. शंकर अतिशय घाबरला. मनात देवाचा धावा करू लागला. म्हणाला, "देवा, तू सांगितलंस म्हणून ना मी त्याला मारलं? यात माझं काय चुकलं? मला का ही शिक्षा? ही हत्या तुझ्याच पायी घडलीय. आता तूच मला यातून सोडवल पाहिजेस. शिवशंकरा, धाव. वाचव मला."
तेवढ्यात तिथे तोच एक भव्य पुरुष अवतरला. त्यानं पोराचं उडवलेलं मुंडकं धडाला चिटकवलं. बघता बघता पोरगं उठून बसलं. लोकांनी जयजयकार करीत त्या पुरुषाला गराडा घातला. या साऱ्या गडबडीत शंकर तिथून बाहेर पडला. या लोकांपासून जितकं दूर जाता येईल तितकं दूर जावं म्हणून जीव घेऊन पळत सुटला. "थांब. थांब." मागून कुणीतरी त्याला थांबवीत होत. त्या आवाजात जबर होती. शंकरनं वळून पाहिलं तर तोच तो माणूस, त्या तमाशातल्या पोराला वाचवणारा. हा नक्कीच आपल्याला मारायला आला आहे, या विचारानं घाबरून शंकर थांबायच्या एवजी अधिकच जोरात पळू लागला. रस्ता खाचखळग्यांचा, त्यातून सगळीकडे अंधार गुडूप. शंकरला धड पळता येईना. तेवढ्यात कशाची तरी ठेच लागून तो सपशेल खाली पडला. आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या त्या माणसानं त्याला गाठलंच. त्याला उठवीत तो म्हणाला, "भिऊ नकोस, बेटा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. ऊठ. हे बघ, आपण पळायचं नसतं. इथेच, या संसारातच पाय घट्ट रोवून उभं राहायचं असतं. दीपस्तंभासारखं. इतरांना योग्य वाट दाखवण्यासाठी. तू या असल्या मायाजालात गुंतू नकोस. तुझ्या वेड्यावाकड्या देहाचा हे लोक करमणुकीसाठी वापर करतात. सोड त्यांचा नाद. तुझा अवतार आहे आंधळ्यांना वाट दाखवणाऱ्या डोळसाचा. द्रष्ट्याचा."
शंकर त्यांच्याकडे विस्मयांन पाहातच राहिला. मनात म्हणाला, "म्हणजे हे आपल्याला मारायला नाही आले तर! शिकवायला आले आहेत. आजपर्यंत असं हक्कानं काही सांगणारं, शिकवणारं वडीलधारं माणूस आपल्याला भेटलच नाही. किती मायेनं सांगताहेत!' शंकरच मन भरुन आलं. त्याचे मोठे मोठे निरागस डोळे भरभरून वाहू लागले. त्यानं त्यांचे पाय धरले. त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचा उध्दारकर्ता म्हणाला, "जा बेटा, हिमालयात जा. केदारेश्वरी जाऊन स्वतःचा शोध घे."
"इतक्या दूर, मी एकटाच!" "नाही. तू एकटा नाहीस. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आठवण काढलीस की, तुझ्यासमोर उभे राहू. स्मरणात दर्शनम!"
आम्ही यजुर्वेदी ब्राम्हण ।
आमुचे नाव नृसिंहभान ।
मूळ पुरुष वटवृक्षस्थान ।
दत्तनगर निवासी हो ॥
शंकरला यातलं एक अक्षरही कळलं नाही. त्याच्या बावरलेल्या चेहऱ्याकडे पाहत ते यतिवर स्मित करीत म्हणाले, "तू आम्हाला नुसतं स्वामी म्हण. स्वामी समर्थ."
"सुख नि शांति म्हणजे काय आणि ते मिळवण्याचा सोप्यात सोपा उपाय किंवा मार्ग कोणता ?" प. पु. शंकर महाराज मार्गदर्शन.
(संदर्भ - साद देती हिमशिखरे... बाबा प्रधान)
त्याचे श्रींनी दिलेलं एक सुंदर विवेचन !
"जगात सुख नि शांति मिळवण्याकरिता प्रत्येक जण प्रयत्नाधीन आहे." या सुख समाधानाला झाकोळून टाकणाऱ्या, काय नि कोणकोणत्या गोष्टी आहेत, हा ज्याचा त्याने विचार करायला हवा. आपल्या इच्छा, ईर्षा किंवा महत्वकांक्षा, वासना, अतृप्ती किंवा हावरेपणा, असूया वगैरे गोष्टींनी सारे जीवन गढ़ूळते नि असुख आणि अशांती निर्माण होऊन केविलवाणी मन:स्थिती उत्पन्न होते. यांना जर कोणत्या रीतीने टाळता आले, किंवा त्याची योग्य ती वासलात लावता आली, तर सुख, शांती, समाधान उत्पन्न होऊ शकेल.
जे आपले नाही ते मिळविण्याचा हव्यास, आपण जसे नाही तसे होण्याची महत्वाकांक्षा, जे आपले नाही ते धरून ठेवण्याची आणि आपण कोणी तरी आहोत ते सतत दाखविण्याची धडपड आज काल प्रत्येकाची चालू आहे. जीवनावश्यक गोष्टींशिवाय आपण कितीतरी इतर गोष्टी मिळविण्याकरिता उगाच धड़पडत असतो. हा जो पसारा आपल्याभोवती आपण निर्माण करुन ठेवतो, तोच जीवनात अपेक्षित सुख व समाधानाच्या वाटा रोखून धरीत असतो. जगात रहायचे, तर जगरहाटी प्रमाणे वागायला हवे, असा मूर्ख पणाचा मुद्दा पुष्कळदा पुढे करण्यात येतो. आजचे जग कसे आहे हे पाहिले तर जिकडे-तिकडे निरनिराळे धर्म-पंथ-जाती-उपजाती नि निरनिराळे 'वाद' व मतप्रणाली यांचा नुसता गोंधळ माजला आहे. मी जी मते मानतो तीच खरी, मी आचरीत असलेली जीवनसरणीच काय ती खरी नि विचारपूर्वक आखलेली नि तिचा अवलंब प्रत्येकाने करायलाच हवा, हाच आग्रह पावलोपावली चाललेला असून, आपली मते दुसऱ्यावर लादण्याचाच आटोकाट प्रयत्न सगळीकड़े चाललेला आजच्या जगात दिसतो. त्यामुळे होते असे की, आपले प्रभुत्व, किंवा पुढारीपण, आपली प्रभावळ वा अनुयायी, आपले व्यक्तित्व, आपली सत्ता नि मत्ता इ. कायम टिकवण्याकरिता अव्याहत चाललेला झगडा हेच जणू जीवन, अशी चुकीची विचारसरणी बद्धमूल होऊन बसली आहे. भोवताली चाललेल्या धुमश्चक्रीत तुम्हाला सुख हाती लागायचे कसे? तुम्हाला नीरव शांतता हवी असली, तर ती या बाजारी गलबल्यात मिळायची कशी? इथे देणे नि घेणे - माझे नि तुझे याशिवाय भाषा नाही, हालचाल नाही, कर्तव्य नाही! तुम्ही येथे बहुसंख्येने जमला आहात, 'ऐका हो, ऐका!' असे एकमेकांना सुनावत जर सगळेच ओरडू लागलात, तर मी काय बोलतो ते कुणाला तरी नीट ऐकू येऊ शकेल का ? कधीच नाही. प्रत्येक जण स्वतः शांत राहिला, तरच या जगात शांतता राहू शकेल. नि तेव्हाच सर्वांना ऐकण्याचा आनंद मिळू शकेल. त्याचप्रमाणे आपली जीवनसरिता ज्यामुळे गढ़ूळ होत आहे, त्या त्याज्य गोष्टींपासून जेव्हा आपण दूर असू वा त्यांचा अडथळा जेव्हा आपण आपल्या हाताने बाजूला करू, तेव्हाच जीवन, सुख- शांतिपूर्ण होईल. नीरव शांततेचा लाभ बाजारातल्या गोंगाटात कधी तरी होईल काय?
श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची महासमाधी
सप्तमीच्या दिवशी महाराज मौन सोडून बोलले. मामींना म्हणाले, 'आम्हांला फक्त एक कपभर चहा करून दे. या समोरच्या फडताळात एक लहानशी गादी घाल. एक तक्क्या ठेव. आंघोळ करून आम्ही तिथे बसणार आहोत. तू दार लावून घे. आमच्याशी कुणी बोलायचं नाही. कुणीही आलं तरी. लक्षात ठेव. आम्ही कुणाशीही बोलणार नाही. आणि तुम्ही कुणी दार उघडायचं नाही. कळलं ? ही आमची आज्ञा समजा." मामींनी चहा करून महाराजांना पाजला. मग पाणी तापवलं. त्यात विसावण घालून ते महाराजांना हवं तसं बेताचं गरम केलं. महाराज न्हाणीत जाऊन दगडावर बसले. आज मामींनी त्यांच्या अंगाला तेलाची दोन बोटं लावली. त्यांना वाटलं, यांना पुन्हा कधी असं स्नान घालता येईल की नाही कोण जाणे. आज नीट चोळूनमाळून आंघोळ घालावी. महाराज कशालाच हो-ना करीत नव्हते. मामा-मामींच्या फाटक्या संसाराला, आणि हरेक कठीण प्रसंगात त्यांच्या दुबळ्या मनाला पाठीराख्या भावासारखा आधार देणाऱ्या, त्या गुडघ्यापर्यंत पोचणाऱ्या हातांवरून मामींनी हळुवारपणानं हात फिरवला. त्यांचं अवघं जीवन धन्य करणाऱ्या महाराजांच्या कोमल चरणांना स्वच्छ धुतलं. आणि आईच्या मायेनं त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत त्यांनी त्यांच्या मस्तकावर पाणी घातलं. प्रत्येक तांब्या ओतताना त्या एकेका नदीचं नाव घेत होत्या. गंगामाई-गोदामाई-यमुना-सरस्वती-नर्मदा-सिंधू-कावेरी-चंद्रभागा- अगदी मुळामुठेचं सुद्धा त्यांनी स्मरण केलं.
त्यांनी नाव घेतलं नाही, पण या सर्व अभिषेकात महाराजांवर निरतिशय माया करणाऱ्या मामींच्या डोळ्यांतल्या गंगाजमुनांचं प्रेमजळही मिसळत होतं!
मामांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वाड्याच्या रुंद भिंतीत असलेलं मोठं फडताळ मोकळं करून झाडून स्वच्छ केलं. आत एक लहानशी गादी घातली. उशाशी काळ्या-पांढऱ्या चौकटी असलेला तक्क्या ठेवला.
मग त्यांनी महाराजांना त्यांनी दाखवलेला पायजमा आणि सदरा घातला. मामींनी परत एक कप चहा दिला. आणि महाराज आत प्रवेश करू लागले. ते आता आपल्या दृष्टीआड होणार या दु:खद जाणीवेने मामामामींना राहावलं नाही. महाराज काय म्हणतील याचा कसलाही विचार न करता त्यांनी महाराजांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला.
महाराज गादीवर बसले. मामींनी त्यांची मूर्ती डोळ्यांत साठवून घेतली आणि फडताळाचं दार बंद केलं. दार बंद झालं. आता हे मामांच्या घरातलं फडताळ नव्हतं. ही होती केदारेश्वराची कुटी. त्रिजुगी नारायणाची मठी. वृध्देश्वराचं गर्भागार. माउलीचं विश्रांतीस्थान. महाराज दृष्टीआड गेल्यापासून मामा-मामी कपाटावर लक्ष ठेवून होते. घरात स्वयंपाक झाला पण मुलांपुरता. त्यांनी काही खाल्लं नव्हतं. रात्री कपाटाजवळ घोंगडी घालून त्यावर दोघेही जागत बसले होते. आतून काही आदेश येतो का, महाराजांच्या हालचालींचा काही आवाज येतो का इकडे लक्ष लावून होते. पहाटे चार-साडेचारला आतून संदेश आला. महाराजांच्या अवतारसमाप्तीची सूचना आली. त्यांचे शब्द ऐकताच मामींना हुंदका आला. महाराजांचे कानावर आलेले हे अखेरचे शब्द! खरंच का पुन्हा ऐकू येणार नाहीत ? या विचारानं मामींना दु:खावेग आवरेना. पण मामांनी त्यांना थोपटीत हलक्या स्वरात म्हटलं,"महाराजांना हे आवडणार नाही. उगी राहा." मामींनी मान हलवली. हुंदका आतल्या आत गिळला आणि त्या कपाटापासून दूर झाल्या. मामांनी दार उघडलं. महाराज समाधिअवस्थेत असल्यासारखे शांत दिसत होते. मुखमंडलाभोवती तेजाची आभा होती. वैशाख शुद्ध अष्टमी - दुर्गाष्टमी.सोमवार. सूर्योदयाबरोबर महाराजांच्या देहावसानाची वार्ता सर्वत्र पसरली. घरोघरी निरोप गेले. गावोगावी तारा गेल्या.
मामांच्या घरी स्त्रीपुरुषांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनास येऊ लागल्या होत्या. त्या गर्दीतून वाट काढीत डाँक्टर विनोद महाराजांच्या जवळ गेले. त्यांनी महाराजांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. महाराजांचा देह अजून गरम होता. डॉ. विनोदांनी तारेचे एक टोक महाराजांच्या हृदयावर ठेवलं आणि दुसरं टोक स्वतःच्या कानाला लावलं. थोड्या वेळात डॉ. विनोद एका विशिष्ट अवस्थेत गेले. त्यांच्या मुखातून शब्द उमटू लागले. रावसाहेबांना नेहमी त्यांच्या अशा अवस्थेतील बोलणं ऐकण्याची सवय असल्यामुळे त्यांना ते समजत होते. त्यांनी ते भराभर टिपूनही घेतले. डॉ. विनोदच्या मुखातून महाराज सांगत होते,
"आत्मकलेपैकी एक कला, जनकल्याणासाठी समाधिस्थानात सदैव राहिल. माउलीचा आशीर्वाद,
"जो जे वांछील तो तें लाहो-प्राणीजात॥"
ही सर्व प्रक्रिया ज्ञाननाथ बाजूला एका भिंतीला टेकून उभा राहून पाहत होता. त्याचे डोळे आसवांनी भरले होते. अचानक त्याचे डोळे मिटले गेले आणि त्याला आतून महाराजांचा संदेश आला. महाराज म्हणाले,"आळंदीची माऊली, जंगलीमहाराज, माळीमहाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर आणि पद्मावती या सहा ठिकाणांहून निर्माल्य आण आणि तू स्वतः ते माझ्या समाधिस्थानात घाल. भानावर येताच त्यानं हा संदेश रावसाहेबांना सांगितला. त्याच वेळी जगन्नाथमहाराज पंडित हार घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी आले. रावसाहेबांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घालताच त्यांनी या सर्व ठिकाणी जाण्यासाठी आपली गाडी आणि ड्रायव्हर ज्ञाननाथांच्या स्वाधीन केला. मंडळी लागलीच निघाली. आणि दोन-अडीच तासांत निर्माल्य घेऊन आली.
सोलापूरहून ओमकारनाथ भस्मे आले. त्यांनी आणलेला रेशमी कद महाराजांना नेसवला. अंगावर एक उबदार शाल पांघरली. प्रेमळ भक्तांनी आणलेल्या फुलांच्या आणि तुळशीच्या माळांनी महाराजांचा देह फुलून गेला. ताळ-मृदुंगाच्या गजरात महायात्रा निघाली. खांद्यावर भगव्या पताका घेऊन, रामनामाचा घोष करीत असंख्य भाविक भक्त आपल्या आवडत्या महाराजांना समाधिस्थानाकडे घेऊन निघाले. जागोजागी यात्रा थांबत होती. भस्मे महाराजांच्या मस्तकावर छत्री धरून त्या रणरणत्या उन्हात अनवाणी पावलांनी चालत होते. महाराजांच्या सहवासात वर्षानुवर्षे राहिलेल्या त्यांच्या अन्तर्निष्ट भक्तांना आणि महाराजांची सेवा करणाऱ्या भाविकांना दु:खावेग आवरत नव्हता. तो असह्य झाला की ते मोठ्यामोठ्यानं महाराजांच्या नावानं जयजयकार करीत होते.
महाराजांनी नुसतं समाधिस्थानच सुचवलं नव्हतं, तर तिकडे जाणाऱ्या यात्रेचा मार्गही आखून दिला होता. त्यांच्या इछ्येप्रमाणे मामांच्या घरापासून यात्रा निघाली ती काका हलवायांचं दत्तमंदिर, ग्लोब सिनेमा, समर्थ अक्कलकोट स्वामी मठ, मंडईतला लोकमान्य टिळकांचा पुतळा, शनिपार, भिकारदास मारुती, पर्वतीवरून अरण्येश्वर या वाटेनं समाधिस्थानाकडे जात होती. पाचच्या सुमाराला, उन्हे थोडी कलती झाल्यावर महाराजांचा देह समाधिगुंफेत ठेवताना आता पुन्हा हे सगुण दर्शन होणं नाही या जाणिवेने सर्वांचं हृदय भरून आलं. डोळे पाझरू लागले. पण आपल्या प्राणप्रिय सदगुरुंच्या विरहदु:खानं विदीर्ण झालेल्या अंत:करणाचे उसासे महाराजांना समजू नयेत, ऐकू येऊ नयेत म्हणूनच की काय सर्वांनी मोठ्यानं जयघोष केला-
"अनंतकोटी ब्रम्हांडनायक सदगुरू शंकरमहाराज की जय!"
स्वामी समर्थ महाराज की जय!!
ज्ञानेश्वरमाऊली - तुकाराम !!!"
जड अंत:करणांनी सर्व माणसं परत फिरली. त्या निर्जन माळरानात श्री बाबुराव रुद्र मात्र राहिले.
आपल्या महाराजांचा समाधिभंग होऊ नये, त्यांना कसला त्रास होऊ नये म्हणून त्यांचा हा 'बाब्या' उन्हापावसांत रात्रंदिवस त्यांच्यावर छत्री धरून त्यांच्या सोबतीला राहिला.
सद्गुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु l गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरुर्साक्षात परब्रम्ह l तस्मैश्री गुरुवे नमः ll
जय शिव शंकर शुभंकरा l श्री दत्ताच्या अवतारा ll
भव भय हारक हरिहरा l विनम्र वंदन स्वीकारा llधृ.ll
वाघांच्या सहवासात l बाळ प्रकटले रानात ll
चिमणाजीला दृष्टांत l देवूनी स्वगृही आलात ll१ll
असंख्य केल्या कृष्ण लीला l अंतापुरच्या गावाला ll
जो तो धावे बघण्याला l छकुल्या शंकरच्या लीला ll२ll
हिमनग शिखरावर फिरले l विश्वामधुनी संचारले ll
अक्कलकोटी श्री आले l विनम्र गुरुचरणी झाले ll३ll
शुभरायांच्या मठातून l किर्तन करिती जनार्दन ll
दत्तरूप त्या दाखवून l प्रकट झाले जनातून ll४ll
तेथे रंगता ते भजनी l प्रत्येकास दिसे नयनी ll
जिकडे तिकडे भक्तगणी l शंकररूपे ये दिसुनी ll५ll
मेहेंदळेच्या वाड्यात l उत्सव शिवरात्री करीत ll
वर्णपालटे शरीरात l शिवशंभूसम श्री दिसत ll६ll
श्रीपादवल्लभ दिसती कुणा l कुणा पंढरीचा राणा ll
कुणा भवानी कृष्ण कुणा l दर्शन देती भक्तांना ll७ll
जरी पुण्यातून नच जाती l असंख्य पत्रे तरी येती ll
हजार उत्सवाला असती l अनेक गावी श्री दिसती ll८ll
अल्लख वदता मुखातून l पिंड निघाली भूमीतून ll
पाथर्डीस हे शिवस्थान l भोवती नाथांचे ठाण ll९ll
नाथ समाधी मढीतली l तेथील शांत धुनी झाली ll
अल्लख देवूनी आरोळी l क्षणात प्रज्वलित केली ll१०ll
मेहेंदळे सौभाग्यवती l जीवन संपवण्या जाती ll
पूर्णत्वाला तिज नेती l रसाळ ज्ञानेश्वरी कथिती ll११ll
गिरीनारीच्या गिरी जाती l वायुभक्षण जे करिती ll
भोजन साधुना देती l संगती प्राणीही असती ll१२ll
कुरुक्षेत्रावर जी घडिली l मनास घटना ना पटली ll
गीता कैसी सांगितली l शंका कोणीतरी विचारली ll१३ll
बघता रोखुनी त्यावती l दिसली ज्योतिर्मय मूर्ती ll
कृष्णापरी त्या श्री दिसती l तत्क्षण ज्ञानगीता प्राप्ती ll१४ll
सोमवातीच्या शुभ दिवशी l स्वरूप लिंगात्मक दिसती ll
उत्कट प्रीती ज्या पाशी l तोच बघे त्या तेजाशी ll१५ll
महाराजांच्या जिभेवर l लिंग वसतसे खरोखर ll
समर्थ स्वामी गुरुवर l पूजन करिती सत्वर ll१६ll
समर्थ स्वामी माउलीने l तृप्त केले स्तनपाने ll
ऐसे सांगती अभिमाने l शिरसावंद्य गुरुवचने ll१७ll
प्रधान लंडनला जाती l तेव्हा मातापिता जाती ll
सदगुरुला मनी स्मरीती l तत्क्षण सन्मुख श्री येती ll१८ll
पर्वत गिरीनारी नेती l दत्त्प्रभुना बोलाविती ll
समक्ष अंत्यविधी करिती l शिष्य मनोरथ पुरविती ll१९ll
प्रधान झाले शिष्ठा प्रधान l लाभे गुरुभक्तीचे ज्ञान ll
उत्कट भक्ती प्रीती महान l गुरुह्रीद्यांचे प्रपंच प्राण ll२०ll
गाणगापूरला श्री जाती l रुद्रा घाटावर श्री बसती ll
निर्गुण पादुकांवरती l ब्राम्हण पूजा जी करती ll२१ll
महारांजाच्या पडे शिरी l जो तो मनी आश्चर्य करी ll
सन्मानाने मठांतरी l घेऊन येती श्री स्वारी ll२२ll
भस्मे वरती अति माया l पदपंकज शिरी ठेवूनिया ll
स्वरूप गुरुचे जाणाया l दृष्टी दिव्य दिली सदया ll२३ll
गुरूने आपला मज म्हणून l जवळी घ्यावे आवळून ll
ऐसी इच्छा प्रकटून l फुलारी दादा घे वचन ll२४ll
तत्क्षण शरीरी संचरून l आपणासारखे त्या करून ll
केले आश्वासन पूर्ण l कृतार्थ दादांचे जीवन ll२५ll
गणेश अभ्यंकर यांना l युद्धावरती असतांना ll
असंख्य गोळ्या पायांना l चाटुनी गेल्या खुणाविना ll२६ll
विजार चाळण सम झाली l तरीही जाणीव नच झाली ll
लीला कोणी ही केली l अंतरी जान कृपा झाली ll२७ll
सद्गुरू असता काशीत l ब्राम्हण वैदिक हिणवीत ll
भोंदू अजागळ अशिक्षित l जाणे काय कसे वेद ll२८ll
सागरगोटे झेलीत l कन्या खेळतसे तेथ ll
तिच्या मुखातून बोलवीत l बृह्स्पतीसम श्री वेद ll२९ll
नवरात्रीच्या अष्टमीस l शरीरी दुर्गेचा वास ll
करिती तांडव नृत्यास l अनंत नमने मातेस ll३०ll
सप्तचिरंजीव जे असती l त्यातील श्रेष्ठ असे विभूती ll
तो मी मारुती या जगती l स्वये मुखाने श्री वदती ll३१ll
नवले विनवी सदगुरुला l दावा विष्णूपद मजला ll
सागर तीरावर नेला l सुवर्ण पदपंकज दिसला ll३२ll
लांब चरण ते स्पर्शून l उर्मी उसळल्या मनातून ll
व्योमी बघता यर दिसून l किरीटी चमके लखलखून ll३३ll
तात्यावारती अति प्रीती l अनन्य शरणागती असती ll
तात्या जणू की प्रतिकुती l दुसरी सद्गुरूंची मूर्ती ll३४ll
परस्परांची बदलून l कामे करिती समजून ll
कुणा न ये हे कळून l कोण शिष्य नि गुरु कोण ll३५ll
समाधीतुनी प्रकटती l मिठीत रुद्रांना घेती ll
पृथ्वीभोवती फिरविती l साक्षित्वाची दिली प्रचिती ll३६ll
मी शंकर कैलासपती l अवतरलो या भूवरती ll
समज द्यावया जगाप्रती l कार्य असे हे ममचित्ती ll३७ll
विविध रंग या जगतात l इथले मात्र नसे तेथ ll
ज्ञात न कोणा हे होत l ज्ञान असे हे अतिगुप्त ll३८ll
स्वतःस कोणी ओळखिल l तो मज निश्चित जाणेल ll
धनदौलत जरी उधळील l तरीही त्याला नुमजेल ll३९ll
घे घे जाणुनी तू मजला l अथवा पश्चाताप भला ll
कार्यभाग न मम अडला l अडेल माझ्यावीन तुझला ll४०ll
कांचनसम हे अक्षरबोल l कोरूनी दगडावरती खोल ll
सुवेळी तुझला स्मरतील l शब्द सुधेसम हे अनमोल ll४१ll
केले तुझला गुह्य खुले l साधुनी अपुले घेई भले ll
शरणांगत मज जे आले l ते मी निश्चित उद्धारीले ll४२ll
अशक्य काम करी शक्य l ऐसे ज्याचे ब्रीदवाक्य ll
भक्तांशी जो करी सख्य लिलया देई सदा मोक्ष ll४३ll
भिऊ नको मी पाठीशी l असता भीती तुला कैशी ll
वचनबद्ध जो भक्तांशी l का नच त्यावर विश्वाशी ll४४ll
योगक्षेम मी चालविण l ऐसे दिद्धले न वचन ll
त्याचे चिंतन मनी करून l चिंता द्यावी अर्पून ll४५ll
सद्गुरू येथुनी नच गेले l चिरंजीव ते असती भले ll
अनेक वेळा श्री उठले l समाधीतुनी प्रकटले ll४६ll
अंत जगाचा होईल l सुभक्त तितुके रक्षील ll
ऐसे ज्याचे दृढबोल l प्रीती अपेक्षी बहुमोल ll४७ll
ऐसा समर्थ स्वामीला l भव मनीचा सांगितला ll
भक्ती प्रीती दे मजला l परमार्थाचा मार्ग भला ll४८ll
मिठीत मजला घेवून l आईपरी घे चुंबन ll
माझा याळ असे म्हणून l कृतार्थ करी हे जीवन ll४९ll
बावन्नी भाऊदासाची l प्रीतीसुद्धा जणू भक्तीची ll
प्राशन करता मिळायची l मधुरा भक्ती सद्गुरूंची ll५०ll
बावन्नी ज्याच्या स्मरणात l अमलभाव हा हृदयात ll
सद्गुरूंच्या तो सावलीत l हिच फल श्रुती पदरात ll५१ll
जय शिव शंकर शुभंकरा l श्री दत्ताच्या अवतारा ll
भव भय हारक हरिहरा l विनम्र वंदन स्वीकारा ll५२ll
ll जय शंकर ll
ll श्री गुरुदेव दत्त ll
श्री शंकर महाराजांची अगम्य लीला- सर चुनीलाल मेहता व मामा ढेकणे
मामा ढेकणे या नावाचे महाराजांचे एक निस्सीम भक्त होते. महाराजांचं त्यांच्यावर फार प्रेम. ते केव्हातरी म्हणायचे, "मामाचं आम्ही पूर्वजन्मातलं देणं लागतो. ते फेडायचं आहे आता." मामा खडकीच्या अँम्युनिशन फॅक्टरीत नोकरीला होते. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी एवढं त्यांचं कुटुंब पुण्याला बाबू गेनू चौकात असलेल्या शिवराम महादेव परांजपे यांच्या वाड्यात बिऱ्हाडानं राहत. सांपत्तिक स्थिती तशी साधारणच. घर लहानसं. रस्त्याच्या बाजूला भिंतीला दोन खिडक्या. त्यांतून आत येईल तेवढाच उजेड. जमीन ओबडधोबड. शेणानं सारवलेली. त्यावर अंथरलेली सतरंजीही जुनीच. भिंतीला टेकून ठेवलेला एक फाटका मळका लोड. भिंतीतल्या कोनाड्यांत आणि खुंट्यांवर बाकीचं सामान ठेवलेलं.
पण ह्या बाह्य गोष्टींचा विचार महाराजांच्या मनाला कधी शिवायचाही नाही. ते रावसाहेब मेहेंदळ्यांच्या वैभवसंपन्न दिवाणखान्यात ज्या सहजतेनं बसायचे, मोतीवाल्या लागूंच्या घरी पांढऱ्याशुभ्र बैठकीवर ज्या प्रेमानं पहुडायचे त्याच प्रेमानं आणि तितक्याच सहजतेनं ते मामांच्या घरी फाटक्या सतरंजीवरही आरामात बसायचे. लहर लागेल तेव्हा त्यांच्या घरी राहायलाही जायचे.
असेच एकदा ते अंगात लांब खिसे असलेला सैल कोट, डोक्यावर सोलापुरी फरकँप, पायांत मोजडी पध्दतीचे बूट अशा वेषात मामांकडे आले. आले ते दारातून 'मामी, मामीऽ आम्ही आलो, आम्ही आलोऽ' असं म्हणतच आले. मुद्रेवर मोहक बालहास्य. मामामामींनी त्यांचं आनंदानं स्वागत केलं. त्यांना बसवलं. त्यांच्यापुढे चहाचा कप ठेवताना मामींच्या मनात नेहमी येणारा विचार पुन्हा आला. त्यांना वाटायचं, 'आपलं जन्मोजन्मीचं पुण्य म्हणून हे आपल्याकडे येतात. घरच्यासारखे वागतात. आपल्या अडीअडचणीला आपणहून धावून येतात. मायबाप करणार नाहीत अशी माया करतात. नाहीतर त्यांनी प्रेम करावं असं आपल्याजवळ काय आहे ? नाही पैसा. नाही प्रतिष्ठा. नाही बुध्दी. नाही भक्ती. जप नाही. तप नाही. ध्यान नाही. धारणा नाही. काहीही नाही. पण ह्यांचं हेच तर वैशिष्ट्य आहे. यांच्या मनात जात-पात, राव-रंक, लहान-थोर असा कुठलाच भेद नाही. त्यांचा नेमका ठावठिकाणा कुणाला कळत नाही. असे अवचित 'आलो, आलो' म्हणत येतात नि चटकन उठून निघूनही जातात. 'सडे' उठतात आणि निघतात. जवळ ना अंथरुण, ना पांघरूण, ना कपडे!'
महाराजांच्या आगमनाची वार्ता कळताच त्यांच्या दर्शनासाठी माणसं येऊ लागली. दाटीवाटीनं बसू लागली. महाराज खुषीत होते. कुणाला गुद्दे घालीत होते, कुणाला चापट्या मारीत होते, हसत होते. बोबड्या बोलांत काही बोलतही होते. तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, "मामा! अहो, रस्त्यावर गाडी थांबलीय." मामांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तो थांबलेल्या गाडीतून रावसाहेब खाली उतरत होते. त्यांच्यामागून आणखी एक अपरिचित गृहस्थही उतरले.
मामांनी चटकन कोट घातला, डोक्यावर टोपी ठेवली आणि ते या लोकांच्या स्वागतासाठी वाड्याबाहेर आले.
रावसाहेबांच्याबरोबर आलेल्या गृहस्थाचं नाव होतं सर चुनीलाल मेहता. ते मोठ्या हुद्य्यावर असलेले अधिकारी होते. रावसाहेबांचे मुंबईचे मित्र. सात्त्विक वृत्तीचे गुजराती वैष्णव. त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरीत होती. सुशील सहर्धमचारीणी होती. सदगुणी मुलं होती. लौकिक दृष्टीनं संसार अत्यंत सुखाचा होता. पण त्यांना आता ओढ लागली होती अलौकिकाची ! जीवनाचं रहस्य जाणून घेण्याची!! त्यासाठी त्यांनी अनेक यात्रा केल्या. साधूसंतांच्या भेटी घेतल्या. आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन केलं आणि तरीही ते अशांत होते. अतृप्त होते. आत्मसुखाची अनुभूती यावी म्हणून तळमळत होते.
त्यांची ही तळमळ बघूनच रावसाहेब त्यांना महाराजांच्या दर्शनाला घेऊन आले होते. मामांनी त्या सर्वांना 'यावं, यावं' असं म्हणत आदरानं घरात आणलं. समोर महाराज पहुडले होते. हातवारे करीत स्वतःशीच काहीतरी बोलत होते. त्यांच्याजवळ जाऊन रावसाहेबांनी प्रणाम केला. महाराज किंचित हसले. रावसाहेबांनी हलकेच म्हटलं, "माझे मुंबईचे मित्र सरसाहेब आपल्या दर्शनासाठी आले आहेत." महाराजांनी जमिनीवर अवघडून बसलेल्या सरसाहेबांकडे आणि ताईसाहेबांच्या जवळ बसलेल्या त्यांच्या पत्नीकडे पाहिलं. पण तिकडे दुर्लक्ष करून ते हसत हसत दुसऱ्याच कुणाशीतरी बोलू लागले. थोडी वाट पाहून रावसाहेबांनी धीर करीत त्यांना सरसाहेबांच्याविषयी सुचवलं, पण महाराजांनी तिकडे काणाडोळाच केला. रावसाहेब, ताईसाहेब कुणालाच काही सुचेना. काय करावं? महाराज असं का करताहेत? सरसाहेब तर फारच अस्वस्थ झाले. महाराजांना नमस्कार करण्यासाठी जोडलेले त्यांचे हात थरथर कापू लागले. त्यांना आतून उमाळा येऊ लागला. भावनावेग अनावर झाला. आणि त्याच क्षणी त्यांच्या मुखावर महाराजांनी आपली दिव्य दृष्टी रोखली. दृष्टीला दृष्टी भिडली. नुसती भिडलीच नाही, तर सरसाहेबांची दृष्टी तिथेच खिळून राहिली. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. अंगावर रोमांच उभे राहिले. ते सर्वांगानं डोलू लागले. थोडा वेळ अशा विलक्षण अवस्थेत गेल्यावर एकदम एक मोठा हुंकार देऊन ते महाराजांच्या पायावर जाऊन कोसळले. त्यांच्या चरणावर आसवांचा अभिषेक करू लागले.
एकाएकी त्यांचं गौर मुखमंडल अत्यानंदानं उजळून निघालं. कारण त्यांना महाराजांच्या ठिकाणी महाविष्णूचं दर्शन होत होतं. आणि त्या वैष्णवाच्या मुखातून त्याच्याही नकळत पुरूषसूक्ताचं आवर्तन होऊ लागलं. सर्व मंडळी अवाक् होऊन ऐकत राहिली. सरसाहेब हात जोडून त्या विराट पुरूषाचं वर्णन करीतच होते,
"हरी: ओम सहस्त्रशीर्षा पुरूष: सहस्त्राक्ष: सहस्त्रपात्।
स भूमिं विश्वतो वृत्वाऽत्यतिष्ठतदशाङगुलम्।
पुरूषं एवेदं सर्वं यदभूतं यच्च भव्यम्।
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥२॥
एतावानस्य महिमाऽ तो ज्यायाँश्च पुरूष:।
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥३॥"
मग गहिवरून म्हणाले, "महाराज, आपणच ते... आपणच
"सर्वत: पाणिपादं तत् सर्वतोऽक्षिशिरोमुखम्।
सर्वत: श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति॥"
सरसाहेब कृतार्थ झाले. पदपिंडाची भेट घडली होती. वस्तुत: त्यांच्यातच असलेलं आत्मधन महाराजांच्या कृपेनं त्यांना लाभलं होतं. सरसाहेब घरी गेले तरी दोन दिवस अशा उन्मनी अवस्थेतच होते !
सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे वचन, "रंग क्या जाने, रंगारी भडवा क्या जाने पिंजारी"
शंकर महाराजांचे वचन याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना कदाचित असे म्हणायचे असेल की,माझ्या रंगात रंगणार तोच मला ओळखणार. असे अनेक भक्त होते की त्यांच्या रंगात रंगून गेले होते. आजही अशी अनेक लोक आहेत त्यांना महाराजांनी आपल्या रंगात रंगवून घेतले आहे.
डॉक्टर धनेश्वर पेशावर डॉक्टर पण त्यांची भेट महाराजांशी झाली आणि डॉक्टर त्यांच्या रंगात रंगूनच गेले. महाराजानी त्यांना सोळा, सतरा विद्या शिकवल्या पण त्यांनी कधीच त्याचा उपयोग स्वतःसाठी केला नाही. कारण त्यांनी महाराजांची लीला अगाध आहे हे जाणले होते.
प्रधान हे उच्चशिक्षित होते. त्यांना महाराजानी आस्तिक केले. महाराजानी प्रधानांना आपल्या सारख बनवलं. त्यांना अनेक देवी देवतांची दर्शने महाराजानी घडवली होती. आळंदीमध्ये प्रधान गेले असता अल्लख म्हणता समाधीतून माऊली प्रकट होऊन त्यांनी प्रधानांना दर्शन दिले होते. म्हणजे भक्तांना आपल्या रंगात रंगवून आपल्यासारखे करणारे महाराजच.
बाबुराव रुद्र हे महाराजांचे निस्सीम भक्त.आज त्यांच्यामुळे धनकवडी समाधी मंदिर आपणास दिसते. त्यावेळी त्या समाधीचे वन्य प्राणी, पाऊस यांच्यापासून तिथे दिवस रात्र राहून संरक्षण केले. त्यांना महाराजानी समाधीतून प्रकट होऊन पृथ्वी प्रदक्षिणा करवून आणले होते.
राजाभाऊ अकोलकर त्र्यंबकेश्वरचे यांच्या घरी महाराज राहायचे. यांच्याकडे त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजा असल्याने त्यांना बाहेर कुठे तीर्थयात्रेसाठी जाता येत नसे. यांना महाराजानी काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यन्त भारत भ्रमण करवून संध्याकाळी सातच्या आरतीला परत त्र्यंबकेश्वर मंदिरात आणले होते.
या सर्व लीला पाहता आपणास समजेल की महाराज म्हणतात माझी अंतरंगातून भक्ती करेल त्यांना मी नक्कीच कळणार ,ज्यांना विश्वास,श्रद्धा,प्रेम याची सांगड घालता आली नाही. त्याला कधीच मी समजणार नाही.