श्रीगणेशदत्त मंदिर- सावई-वेरेम, फ़ोंडा, गोवा

shri Ganesh Datta
10 - 12 वर्षाच्या बालस्वरूपातील श्री गणेशदत्त

माशेल येथील दुर्गादत्त मंदिरात दर्शन झाल्यावर साखळीच्या दत्तवाडीला जाताना मध्ये सावईवेरे हे गाव लागतं. या सावईवेरे गावात श्री गणेशदत्त मंदिर आहे. हे दत्त मंदिर खाजगी असून अतिशय निसर्गरम्य असा या मंदिराचा परिसर आहे. 

श्री गणेशदत्त मंदिराची स्थापना ब्रम्हीभूत कै. श्री गणेश राम सावईकर यांनी केली. ते आणि त्यांच्या पत्नी सौ. कै. भागिरथी गणेश सावईकर ही दोघं श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे तीन वर्षे सेवेला होती. नृसिंहवाडीचे कै. नरहरी वासुदेव पुजारी यांच्याकडे ते रहात होते आणि माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करीत असत. एके दिवशी त्यांना श्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला व महाराजांच्या काळ्या पाषाणातील पादुका आणि पितळी नाग प्रतिमा प्राप्त झाली. 

श्री दत्त प्रभूंचा हा प्रसाद घेऊन ते सावई येथील त्यांच्या घरी परत आले. त्याच वेळी त्यांचे शेजारी असलेले कै नरसिंह शेट्ये यांनी श्री दत्त महाराजांची संगमरवरी मूर्ती दिली. आणि माघ शुध्द त्रयोदशी सन १९५१ मध्ये या मंदिरात त्या पादुकांची आणि श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची एकत्रित विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 

श्री गणेशदत्त मंदिरातील मूर्ती मला विलक्षण वेगळी वाटली. अगदी खरे वाटावेत असे पाणीदार डोळे, तरतरीत धारदार नाक आणि स्मितहास्य. श्री गुरुमहाराजांचं बालस्वरुप ! एखाद्या दहा बारा वर्षांच्या मुलासारखं. आणि माझ्या दृष्टीने हेच या मंदिराचं वैशिष्ट्य पण आहे. या मंदिरात श्री दत्त महाराजांबरोबरच श्री गणेश यांचीही स्थापना झालेली आहे. तसेच श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गुरु दत्तात्रेयांचा कलियुगातील आद्य अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे अवतार कार्य सुरु झाल्याने श्री गणेशतत्व देखील गुरुतत्वात सम्मिलित आहे म्हणून या मंदिराला श्री गणेशदत्त मंदिर असं नाव देण्यात आलेलं आहे. 

तसं पहायला गेलं तर हे मंदिर तसं छोटं, साधं आहे. फ़ार तामझाम, सजावट, आरास वगैरे इथे काही नाही. पण नारळी, पोफ़ळीच्या झाडांनी वेढलेल. निसर्गाच्या कुशीत वसलेलं असल्याने आणि इथे फ़ारशी माणसांची वर्दळही नसल्याने या ठिकाणी एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. समोर बालरुपातील श्री गुरुदेव दत्त उभे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथून प्राप्त झालेल्या काळ्या पाषाणातील पादुका, त्यावर वाडीला मनोहर पादुकांवर ठेवतात तसाच पितळी नाग. जरा शांतपणे मंदिराच्या या वास्तुत बसलो ना आपण की आपला स्थूल देह सावईवेरेला असला तरी आपला सुक्ष्म देह मात्र आपल्याही नकळत वाडीत पोचतो. तिथल्या महापूजेची अनुभूती घेतो, दक्षिण द्वारात उगाच रेंगाळतो, श्रींच्या मनोहर पादुकांना प्रदक्षिणा घालतो आणि असा वाडीचा सुंदर फ़ेरफ़टका मारुन झाला की श्रीगणेश दत्त गुरुभ्यो नम: म्हणत सावईला परत येतो ! 

हे मंदिर खाजगी असल्याने तिथे दर्शनाला जाण्यापूर्वी श्री गणेश सावईकर यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९५४५३२८१३२ वर संपर्क करावा.

||श्री गुरुदेव दत्त||

संकलन - सुधीर लिमये पेण