प. पू. गुरुनाथ मुंगळे

Content
प. पू सद्गुरु श्रीमुंगळे सर
प. पू सद्गुरु श्रीमुंगळे सर

प. पू सद्गुरु श्रीमुंगळे सर हे पावसनिवासी सद्गुरु स्वामी श्रीस्वरूपानंद यांचे शिष्य होते. दत्तसंप्रदायातील एक अधिकारी सत्पुरूष म्हणून प.पू. सरांची ख्याती सर्वदूर आहे. 

कोल्हापूरचे रहिवासी असलेले मुंगळे सर हे तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. उत्तम प्रपंच करतांनाही परमार्थ साधता येतो याचा वस्तुपाठ, उदाहरण म्हणजे सरांचे आयुष्य आहे. कोल्हापुरातील दत्तावतार सद्गुरु श्री चिले महाराज हे अनेक वेळा मुंगळे सरांकडे वास्तव्यास असायचे. सकाळी श्रीमुंगळे सर गुरुचरित्र वाचायला बसले की चिले महाराज बाजूला बसुन त्याचे श्रवण करीत असत. प. पू. श्रीमुंगळे सरांवर श्रीचिले देवांची पूर्ण कृपा होती. चिले महाराज त्यांना एकदा बोलले होते की “तुझ्या घराचे वासे ही वेद बोलतील”. चिले महाराजांचे हे शब्द तंतोतंत खरे ठरले. श्रीमुंगळे सर हे नंतरच्या काळात दत्तसंप्रदायातील एक अधिकारसंपन्न व अधिकारी सत्पुरुष म्हणून प्रसिद्ध झाले. हजारो लोकांना मुंगळे सरांनी कृपा आशिर्वाद देऊन कृतार्थ केले. त्यांना दत्त उपासनेला, नामसाधनेला लावले. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हे सरांचे अत्यंत प्रिय स्थान व त्याठिकाणी आपल्या भक्तांसोबत ते नेहमी जात असत. दत्तप्रभुंची अलिकडच्या काळात प्रत्यक्ष सगुण प्रचिती घेतलेले श्री मुंगळे सर म्हणजे हजारो भक्तांचे, शिष्यांचे प्रिय सद्गुरु. सरांच्या घरी दत्तावतार श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज अर्थात कुंभार स्वामींची म्हणजेच आमच्या आबासाहेबांची उपासना होती. प. पू. सरांनी आबासाहेबांची पोथी, आरती ही लिहिली आहे. तसेच त्यांनी अनेक प्रासादिक अध्यात्मिक ग्रंथ ही लिहीले आहेत. प. पू. मुंगळे सरांनी हजारो लोकांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले.प्रापंचिक लोकांना प.पू सरांनी दुःख, कष्टातून दूर करण्यासाठी आजिवन मार्गदर्शन केले, त्यांना दुःख मुक्त केले. हजारो लोकांनी प. पू. सरांच्या कृपेची व दिव्य मार्गदर्शनाची अनुभूती घेतली होती. पुण्यातील पाषाण-सूस रस्त्यावर एक अत्यंत पवित्र व प्रसादिक दत्त मंदिराची वास्तू पुण्यवान दत्तभक्त सरांचे शिष्य असलेले दाम्पत्य श्री व सौ मानकर यांच्या प्रयत्नातून व् प. पू श्री गुरुनाथ मुंगळे महाराज यांच्या आशीर्वादाने  इ. स. २००६ मध्ये उभी राहिली. या मंदिराचे निर्माण परमपूज्य सद्गुरू गुरुनाथ मुंगळे यांच्या मार्गदर्शना खाली झालेले आहे.आज हे पुण्यातील एक दिव्य दत्तस्थान म्हणून प्रसिद्ध पावले आहे. या मंदिरात श्रीक्षेत्र पिठापूर प्रमाणे दत्तप्रभु,श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभु व भगवान श्रीनृसिंह सरस्वती देवांचे दर्शन आपल्याला गाभाऱ्यात घडते. ध्यान गृहात भगवान अक्कलकोट स्वामी महाराज व प. प. सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचेही दर्शन घडते. 

 

अशा या दत्तसंप्रदायातील विभूतीस. आजच्या या दिवशी प. पू. सरांच्या चरणी विनम्र अभिवादन व श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम.
           
अक्षय जाधव, आळंदी

प. पू सद्गुरु श्रीमुंगळे सर 

 

श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे

 

Sadguru Gurunath Mungle